Tuesday, 23 May 2023

पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव

 पुस्तकांचे गाव ‘भिलार’ हे देशासाठी आदर्श गाव


- राज्यपाल रमेश बैस


            सातारा दि. 22 : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.


                   महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


      पुस्तकांचे गाव भिलार पहायला मिळाले हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे. पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळी-वेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


                 यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकांचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.


००००

जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे

 जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे


- मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. 22 : जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासन आणि एफ सी बायर्न, महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टीव्ही 9 यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 14 वर्षाखालील फुटबॉल खेळाडू जर्मनीत गेले आहेत. या खेळाडूंनी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.


            जर्मनीत निवड होवून प्रशिक्षणासाठी आलेल्या फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, क्रीडा उप सचिव सुनील हंजे तसेच एफसी बायर्न क्लबचे भारतातील प्रतिनिधी कौशिक मौलिक आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ राज्यात रुजावा. राज्यातील खेळाडूंना या खेळामध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासनाचा क्रीडा विभाग व एफसी बायर्न म्युनिक फुटबॉल क्लब, जर्मनी यांच्यामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र करंडक नावाने 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये राज्यातील जवळपास 1 लाख मुलांनी सहभाग घेतला.


            म्युनिक - जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी, एफसी बायर्न फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकांनी या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट 20 फुटबॉलपटूंची निवड केली. जर्मनीतील बायर्न राज्यातील म्युनिक येथे दि. 19 ते 26 मे 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.


            राज्यात फुटबॉल खेळास चालना मिळावी, तसेच राज्यातील खेळाडूंना या खेळातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्य तंत्र आत्मसात करता यावे व प्रशिक्षण मिळावे आदी बाबींचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे शिष्टमंडळ जर्मनी येथे गेले आहे. हे शिष्टमंडळ म्युनिक येथे गेले असता या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देणारे इंटरनॅशनल यूथ एक्सचेंज फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मीरजम एसिले, वरिष्ठ सल्लागार पीटर लीबल, युवा प्रशिक्षक डॅनिअल व ॲलेक्स यांचा राज्य शासनाच्यावतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते स्‍मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्तानेपर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज

 आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्तानेपर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज


- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव


            मुंबई, दि. 22 : आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.


            मुंबईत आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


            यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या सचिव लीना नंदन, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचे अध्यक्ष सी. अचलेंद्र रेड्डी, केंद्र आणि राज्य शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले, आपण नेहमी पर्यावरणातून सर्वोत्तम गोष्टी उचलतो आणि कचरा परत देतो, विकासाबरोबरच आपला वापर देखील वाढला आहे.


            जर आपण अनावश्यक वापराला प्रोत्साहन देत राहिलो तर एक पृथ्वी देखील पुरणार नाही. आगामी काळात विकासाबरोबरच जैवविविधतेचे संवर्धन करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी मिशन लाइफअंतर्गत प्रत्येक गावात जैवविविधता नोंद पुस्‍तक तयार करण्याची कल्पना मांडली.


            महाराष्ट्र शासनाच्या अनोख्या ‘जीन’ बँक उपक्रमाचे अभिनंदन करून मंत्री श्री यादव म्हणाले की, “महाराष्ट्रात वसलेला पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, 48 वन्यजीव अभयारण्ये आणि तीन रामसर स्थळे आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यासाठी यापेक्षा उत्तम जागा असूच शकत नाही.”


            या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या संकल्पनेबद्दल बोलताना मंत्री श्री. यादव म्हणाले, पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मिशन लाइफ (LiFE) बरोबर जोडण्याची मंत्रालयाची योजना आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. मिशन लाईफ अंतर्गत, ‘संपूर्ण समाज’ हा दृष्टिकोन अंगीकरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे श्री. यादव म्हणाले.


            भरड धान्यांचे महत्व सांगताना केंद्रीय मंत्री श्री. यादव म्हणाले की, “भरड धान्ये ‘व्होकल फॉर लोकल’ च्या भावनेला चालना देतात. हे पीक भारतीय हवामान आणि मातीसाठी अनुकूल आहे. दुष्काळ प्रतिरोधक असण्याबरोबरच, भरड धान्ये पोषणाची कमतरता कमी करण्यासाठी महत्त्वाची आहेत. जैवविविधता मंडळाने भरड धान्यांना विशेष महत्व दिले आहे. असुरक्षित समुदायाला सहज उपलब्धता आणि लाभ मिळावा, हे याचे उद्दिष्ट आहे.” 


            पर्यावरण रक्षण हा देशासाठी श्रद्धेचा विषय असल्याचा मंत्री श्री. यादव यांनी पुनरुच्चार केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आपल्या आधीच्या पिढीने संरक्षण केल्यामुळे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे”.


            यावेळी पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले की, “जर आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर त्या बदल्यात पर्यावरण आपले रक्षण करेल. आपण पर्यावरणाकडून जेवढे घेतो तेवढे परत दिले नाही तर निसर्गाचा समतोल बिघडेल आणि आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल. निसर्ग जगला, तर आपण जगू आणि पृथ्वी जगेल.”


            भरड धान्यांचा संदर्भ देत मंत्री श्री. चौबे पुढे म्हणाले की, “भारताच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जग भरड धान्याकडे आकर्षित झाले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून आपल्याला भरड धान्य विषयीचे ज्ञान, मागणी आणि पुरवठा वाढवायचा आहे. आपण एक लोकचळवळ निर्माण करून भरड धान्य विषयीचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे.” यावेळी मंत्र्यांनी ‘निसर्ग, संस्कृती आणि साहित्याला उज्वल भविष्याकडे नेण्याचा मंत्र दिला.


            पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सचिव लीना नंदन म्हणाल्या की, आपले जीवन मुख्यत्वे जैवविविधतेवर अवलंबून आहे हे आजच्या दिवशी आपण मान्य करतो.


            राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या ‘जैवविविधता हेरिटेज साइट्स ऑफ इंडिया’ आणि ‘अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड मॅनेजमेंट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.


            केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भरड धान्यावर आधारित विशेष लक्ष केंद्रित करून भरवण्यात आलेल्या जैवविविधता प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प, भारतीय वनस्पती सर्वेक्षण आणि इतर अशा विविध संस्थांचे कार्य प्रदर्शित करण्यात आले. भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी असलेल्या विविध सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी देखील या प्रदर्शनाचा सहभाग घेतला होता.


००००


वृत्त 

ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार

 'ईएसआयसी' रुग्णालयांसाठी जागा, आवश्यक सुविधा देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत


राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक


            मुंबई, दि. 22 : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून 'ईएसआयसी' (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील 'ओएनजीसी' संकुल येथे महाराष्ट्र आणि पश्चिम विभागीय राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाल शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार माधुरी मिसाळ, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव आरती आहुजा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवित आहे. श्रम प्रतिष्ठेला महत्व देण्यात येत आहे. कामगार क्षेत्रासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ई-श्रम पोर्टल यामध्ये अत्यंत महत्वाचे ठरत आहे. या नोंदणीमुळे कामगार विविध योजनांचा लाभ घेवू शकतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रिकरण व समन्वय साधून कामगारांना लाभ देण्यावर भर देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


'ई-श्रम कार्ड'साठी शिबीर आयोजित करावेत - केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव


            केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे. यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत महत्वाचे असून ते उपलब्ध करून देण्यासाठी शिबीर आयोजित करावेत. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,अटल पेन्शन योजना यांसारख्या योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. यादव यांनी सांगितले.


            कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले, असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी ई-श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त असून या माध्यमातून कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. यावेळी नियोक्ता आणि कर्मचारी प्रतिनिधी यांचेसोबत त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


‘ई-श्रम’ कार्ड


            केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जातो. ‘ई-श्रम’ कार्डच्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळत आहे. असंघटित कामगार, फेरीवाले, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ होत आहे.

नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

 

नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            ठाणे, दि. 22 (जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


            कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाल्याची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


            कॉनवूड जंक्शन येथील रस्त्याच्या कामापासून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी दौरा सुरू केला. येथील काम रेंगाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून काम का रेंगाळले याचा संबंधितांकडून खुलासा घ्यावा व खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी या कंत्राटदाराला तत्काळ ही सामुग्री देण्याबाबत सांगितले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.


            यावेळी घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील स्वामी समर्थ मठात भेट देऊन दर्शन घेतले. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण कोरम मॉल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


सफाई कामगाराशी साधला संवाद


            ठाण्यातील नालेसफाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार नगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधून कामाची माहिती घेतली. तसेच येथील रस्त्याच्या कामाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.


... तर एक लाखांचा दंड


            यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीची कामे पाहण्यासाठी हा दौरा केला आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 134 किमीच्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी आयआयटीला त्रयस्थ संस्था म्हणून परिक्षण करण्याचे काम दिले आहे. रस्त्यांच्या कामांचे नमुने त्यांच्याकडे पाठविण्यात येतील. नवीन रस्त्यांमध्ये खड्डे पडले तर एका खड्ड्याला एक लाख रुपये दंड अशी टेंडरमध्ये अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला जाईल. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी पाठपुरावा करत आहेत.


            पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळेल व नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ठाणे महापालिका क्षेत्रात मास्टिकचे, काँक्रिटीकरणाची, सुशोभिकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. उद्याने चांगली राहावीत, यासाठीही सूचना दिल्या आहेत. महापालिकेला राज्य शासनाकडून जवळपास 600 कोटी रुपये दिले आहेत. ठाणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गुरुकुल वैदिक विद्यालय

 


जर कोणत्याही हिंदू बांधवाला आपल्या मुलाला हरिद्वार गुरुकुलममध्ये शिकवायचे असेल तर आचार्य पाणिग्रही चतुर्वेदा संस्कृत वैदिक विद्यालय हरिद्वार येथे 15 मार्च ते 15 जुलै 2023 या कालावधीत मुलाखत होईल.  "मुलगा सहावी पास झाला असावा."  गुरुकुलममध्ये निवास, जेवण आणि पेये सर्व मोफत आहेत.  आणि दरमहा 8000 रुपये शिष्यवृत्ती देखील दिली जाते!  चार वेद, व्याकरण, साहित्य, इंग्रजी इत्यादी आधुनिक विषयांतही मुलांना शिक्षण दिले जाते.  आणि माणूस वेदांमध्ये पारंगत होतो.  आचार्य (M.A.) पर्यंतचा अभ्यासही निर्देशित केला जातो.  हा संदेश तुमच्या सर्व हिंदू गटांमध्ये टाका आणि तुमच्या अद्भुत सनातन धर्म शाळेचा जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.

  आता आमच्याशी संपर्क साधा!

   हिरालाल जी 9654009263


  हा संदेश फक्त हिंदूंसाठी आहे, तो "प्रत्येक हिंदू" पर्यंत पोहोचू द्या.


  *सनातन धर्माच्या सत्याला वंदन* 🙏🏻

Monday, 22 May 2023

सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे

 सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे


                                                                 - राज्यपाल रमेश बैस


मेजर कौस्तुभ राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार मरणोत्तर प्रदान

            मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच 'ने मजसी ने' व 'जयोस्तुते' या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केल्या.


            स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे 2023 वर्षाचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार' राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) स्मारकाच्या दादर येथील सभागृहात प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना यावेळी 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' मरणोपरांत प्रदान करण्यात आला. मेजर राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपालांकडून स्वीकारला.   


            राज्यपालांच्या हस्ते आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार' देण्यात आला, तर नागपूर येथील 'मैत्री परिवार' या संस्थेला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार' देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी प्रदीप परुळेकर यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती चिन्ह' पुरस्कार देण्यात आला.


            स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनी प्रास्ताविक केले तर स्मारकाचे अध्यक्ष व निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आभार मानले. ज्योती राणे यांनी यावेळी कृतज्ञता सोहळ्याला उत्तर दिले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मंजिरी मराठे व स्वप्निल सावरकर आदी उपस्थित होते.


0000


 


Shahid Major Kaustubh Rane presented Swatantryaveer Savarkar Award posthumously


            Mumbai Date 22 : Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Swatantryaveer Savarkar Award for Bravery' to Major Kaustubh Rane posthumously. The award instituted by the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak was accepted by Major Rane's mother Jyoti Rane in Mumbai on Sunday (21 May).


            The Governor also presented the 'Swatantryaveer Savarkar Smriti Chinha' award to Pradeep Parulekar for his work of promotion and propagation of the thoughts of Savarkar. The 'Swatantryaveer Savarkar Award for Social Service' was given to 'Maitri Parivar Sanstha' for its work of tribal welfare. The Director of IIT Kanpur Dr Abhay Karandikar was presented the 'Swatantryaveer Savarkar Science Award'.


            President of the Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak and former DGP Pravin Dixit, Executive Chairman Ranjit Savarkar, trustee Manjiri Marathe and Swapnil Savarkar and invitees were present. Veermata Jyoti Rane replied to the felicitation. 


 


 

Featured post

Lakshvedhi