Friday, 28 April 2023

धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा

 धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.


            धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना जलद व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विभागाने धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप प्राधान्याने तयार करावे. तसेच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असे असावे. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.


             धर्मादाय रुग्णालयात आरोग्य सेवक पदाची भरती आरोग्य विभागाकडून तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवाकामार्फत योग्य ती मदत अधिक तत्परतेने मिळेल. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले

 महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारेसुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल.

            नवी दिल्ली, 27 : सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.


थोडक्यात तपशील


            ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.


महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु


             परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


            सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.


            सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात१६० तक्रारींचे निराकरण.

            मुंबई, दि. २७ : जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तसेच माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले. 


         दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले की, सन २००७ पासून माहिम येथील कापडबाजार, ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी जागेची दीर्घ कालावधीपासूनची मागणी लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.       


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.      


            भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवार दिनांक २८ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठीhttps://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येऊ शकते

समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य

 समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            श्री. सदानंद महाराज तीर्थक्षेत्र तुंगारेश्वर डोंगर (वसई) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कोविड काळात बालयोगी सदानंद महाराज संस्थेने या परिसरातल्या लोकांसाठी उत्तम कार्य केले आहे. सर्वसामान्यांच्या दुःखात धावून जाणे ही परंपरा त्यांनी जोपासली आहे. राज्य सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी जे निर्णय घेणे आवश्यक आहे, ते आम्ही आतापर्यंत घेतले आहेत. भविष्यातही सर्वसामान्यांचा विचार करूनच आवश्यक ते निर्णय घेतले जातील. सदानंद महाराजांचे कार्य निरंतर चालू राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.


             या आश्रमामध्ये दिघे साहेबांसोबत येत असल्याच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्र्यांनी आश्रम संस्थेकडून भविष्यातही अध्यात्मिक मानवी उन्नतीसाठी आवश्यक असणारे सर्व कार्य व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.


            यावेळी बालयोगी सदानंद महाराज, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई - विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार आदी उपस्थित होते

.


*********

कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार -

 कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धती व संशोधन केंद्र उभारणार -             



 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील कॅन्सर रुग्णांना मुंबईसह देशाच्या अन्य भागात उपचारासाठी जावे लागत असे. यावर कायम तोडगा काढण्यासाठी 30 वर्षांपासून पाहिलेले स्वप्न एनसीआयच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ, महाराष्ट्रासह मध्य भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना स्वस्तात उत्तम उपचार उपलब्ध होणार आहेत. हे कार्य पुढे घेऊन जात रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहे. पूर्व विदर्भात थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून या आजारावर संशोधन व उपचार करण्यासाठी येत्या काळात एनसीआयमध्ये संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


एनसीआय हा कॅन्सर उपचारासाठी एक उत्तम संस्था - सरसंघचालक डॉ मोहन भागवत


               कॅन्सर हा दुर्धर आजार असून कॅन्सरग्रस्तांना आपलेपण व हिंमतीची गरज असते. नागपुरात उभी राहिलेली एनसीआय ही संस्था कॅन्सरग्रस्तांना हिंमत देणारी व त्यांच्या उपचारासाठी एक उत्तम संस्था ठरली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले. डॉ आबाजी थत्ते यांच्या नावाशी व लोकोत्तर कार्याशी जुडलेली ही संस्था कँसरग्रस्तांना मोठा दिलासा देणार आहे. सरकार एकीकडे संस्था उभारतेच मात्र आरोग्य सारख्या सार्वजनिक विषयावर देशातील सर्व जनतेने स्वतःही पुढे येणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेसाठी एनसीआय प्रमाणे संस्था उभारण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. भागवत यांनी केले.


एनसीआयमुळे सेवेच्या संकल्पास बळ मिळेल - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संदेश


                   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. श्री. शाह यांच्या लिखित संदेशाचे वाचन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. आपल्या संदेशात शाह म्हणाले, ‘कॅन्सरपासून मुक्तीसाठी पहिले पाऊल’ हे एनसीआयचे बोधवाक्य आहे. याच वाक्याची प्रचिती या संस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांना येत असल्याचा विश्वास व्यक्त करत एनसीआयच्या प्रेरणेतून भारतदेशात सेवेच्या संकल्प कार्यास वाहिलेल्या संस्थांना बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या सहयोगाने दोन दशकांपासूनचे या संस्थेच्या निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.   


        शैलेश जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मान्यवरांनी एसीआयची पाहणी केली.


0000

मुख्यमंत्र्यांनी केली ‘एनसीआय’ची पाहणी

 मुख्यमंत्र्यांनी केली ‘एनसीआय’ची पाहणी


बाल कर्करुग्णांशी साधला संवाद.

            नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) ही मध्य भारतातील सर्वात मोठी कर्करोगावर उपचार करणारी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यातील कर्करुग्णांना विशेषत्वाने होणार आहे. या अद्ययावत व बहुमजली इमारतीतील बाल रुग्ण कक्षाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत बाल कर्करुग्णांशी संवाद साधला.


            जामठा परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (एनसीआय) मुख्य इमारतीमध्ये दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह व्यापार,उद्योग क्षेत्रातील दिग्गज गौतम अदानी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल, जयप्रकाश रेड्डी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी बाल कर्करुग्णांच्या कक्षाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.


             राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा (एनसीआय) एकूण 25 एकरचा परिसर असून 470 खाटांची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी कर्करोगावर उपचार सुरू आहेत. 18 ऑगस्ट 2012 रोजी या संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपुजन करण्यात आले. 2017 मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. 2018 मध्ये बालकांसाठी 27 खाटांचा स्वतंत्र वॅार्ड सुरू करण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये विप्रो कंपनीचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेची पाहणी करून कौतुक केले. 2020 मध्ये ‘आयुषमती’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी करण्यात आले होते. आता या संपूर्ण सोईसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.



0000




Thursday, 27 April 2023

विनाऔषध उपचारपद्धती लाभदायी

 विनाऔषध उपचारपद्धती लाभदायी


- प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया


           


            मुंबई, दि. 27 : “पारंपरिक उपचार पद्धतीकडे आपण अधिक लक्ष दिले आणि त्यानुसार जीवनपद्धती अंगीकारली तर आजारांपासून आणि विविध व्याधींपासून आपण दूर राहू शकतो”, असे प्रतिपादन प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया यांनी केले.


            शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब’ यांच्या सौजन्याने मंत्रालयातील परिषद सभागृह येथे प्रा. लुथ्रिया यांचे ‘आर्ट ऑफ सेल्फ हिलिंग’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव श्री. राजपूत यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


            प्रा. लुथ्रिया म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या वेळापत्रकात आपले तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातून उद्भवलेल्या आजारांतून बरे होण्यासाठी वेगवेगळ्या पॅथींच्या औषधांचा मारा शरीरावर केला जातो. मात्र, नैसर्गिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींचा अवलंब केला तर व्यक्ती सुदृढ राहू शकते. त्यासाठी प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी त्यांनी दक्षिण कोरियन ‘सु जोक’ या नैसर्गिक उपचार पद्धतीबाबत उपस्थितांना सोदाहरण माहिती दिली. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा आजारांवर हातांच्या बोटांवर विविध पद्धतीने क्रिया करुन या आजारांची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. 


0000

Featured post

Lakshvedhi