Thursday, 20 April 2023

"या" बियांचा आहारात समावेश केल्याने राहाल आयुष्यभर फिट.

 "या" बियांचा आहारात समावेश केल्याने राहाल आयुष्यभर फिट...

विविध प्रकारच्या धान्यांच्या, भाज्यांच्या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यामध्ये आरोग्यदायी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स, जीवनसत्त्वे, क्षार, अँटीऑक्सिडेंट्स असतात.


जवसाच्या बिया : या बियांमध्ये प्रथिने, ब १ जीवनसत्त्व, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर हे क्षार असतात. दोन टेबलस्पून जवसाच्या बियांमध्ये ६ ग्रॅम फायबर आणि ४ ग्रॅम प्रथिने असतात.


शेंगदाणे : शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्यक असणारी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा गूळ-शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा कूट, चिक्की अशा कोणत्याही प्रकारात शेंगदाणे खाता येतात.मात्र, पचायला जड असल्याने शेंगदाणे प्रमाणातच खावेत.


हळीव : १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. तसेच लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक असतात. रज:स्रव नियमित करण्यात मदत करते. यात अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणारे घटक असतात. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी होते. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणा-यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.


काळे आणि पांढरे तीळ : तीळ बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात. तसेच, मूळव्याधीवर गुणकारी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. वजन वाढविणा-या आणि कमी करू इच्छिणा-या अशा दोघांनीही तीळ खाणे हितकारक आहे. काळ्या तिळांत औषधी गुणधर्म असतात.


भोपळ्याच्या बिया : यामध्ये ई जीवनसत्त्व, झिंक, मँगेनीज, फॉस्फरस, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड्स असतात, हृदयविकार, मधुमेहींसाठीही भोपळ्याच्या बिया उपयुक्त आहेत. सर्व प्रकारचे कॅन्सर्स, विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासाठी रोज दोन ते चार चमचे भोपळ्याच्या भाजलेल्या बिया खाल्ल्याच पाहिजेत.


सूर्यफूलाच्या बिया : सूर्यफुलात ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, अँटी ऑक्सिडेंट्स मोठय़ा प्रमाणात असतात. या बिया पोषणमूल्यांनी अत्यंत समृद्ध आहेत. या बियांमधील फायटोसस्टेरॉल घटकामुळे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. केसांची मुळे घट्ट होतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, मूड स्विंग, पोटदुखी आदी त्रास कमी होतात.


खसखस : या काहीशी मातकट चव लागणा-या बिया पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यातून कॅल्शियम, लोह, प्रथिनेही मिळतात. यात प्रति औंस ६ ग्रॅम फायबर्स असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. पोटदुखी, उलटीच्या समस्येवर गुणकारी आहेत.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

 संसदीय आयुधेसमिती पद्धतविधेयके या विषयांवर

विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

 

            मुंबईदि. २० : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारदिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवनमुंबई येथे करण्यात आले आहे. या कृतीसत्रात विविध संसदीय आयुधेसम पध्दतविधेयके या विषयांवर तीन सत्रे होतील.

            या कृतीसत्राचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधानपरिषद सदस्य तथा माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकरॲड. अनिल परबशशिकांत शिंदेजयंत पाटील, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

            या कृतीसत्रासाठी वक्ते म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे) सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (समिती पध्दत) सह सचिव डॉ. विलास आठवले व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधेयके) सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे विधानपरिषद सदस्य अशोक ऊर्फ भाई जगतापकपिल पाटील आणि एकनाथराव खडसे - पाटील हे भूषवतील.

            विधानपरिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने सहभाग घ्यावा

 पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने सहभाग घ्यावा


- पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे


सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे मंत्रालयात प्रदर्शन


            मुंबई, दि. 20 : सिंगल युज प्लास्टिकला सशक्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने मोलाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.


            22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुधंरा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 20 व 21 एप्रिल 2023 रोजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


            सिंगल युज प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी जाहीर झाल्यानंतर त्याला पर्यायी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले आहे. परंतू सिंगल युज प्लास्टिकला सक्षम पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ शकतात याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


            सिंगल युज प्लास्टिक म्हणजे एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या वस्तू. उदा. प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिक प्लेटस्‌, प्लास्टिकच्या वाट्या, हॉटेलमधून अन्नपदार्थ ग्राहकांना पोचवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे डबे, स्ट्रॉ, प्लास्टिक पिशव्या आदी. अशा वस्तूंना पर्यायी असणाऱ्या वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाळ्याचे गणपती, मातीचा पुनर्वापर करून तयार केलेली गणेशमूर्ती, ग्रीन गीफ्टींग वृक्ष वाटिका, पुठ्ठयांपासून बनवलेली लहान मुलांची खेळणी अशा विविध रेखीव वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


            या प्रदर्शनात नारळाच्या विविध घटकांपासून तयार करण्यात आलेले चमचे, वाट्या, प्लेटस्‌, कापडांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पिशव्या, आभूषणे, नारळाच्या झावळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, बांबूपासून तयार करण्यात आलेली आभूषणे, वर्तमानपत्राच्या रद्दीतून तयार करण्यात आलेल्या पेन्सिल, रिसायकल पेपरमधून तयार केलेले पँकिंग साहित्य व बेंचेस, टी पॉय अशा अनेक नाविन्यपूर्ण वस्तू या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.


            पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनात मुंबई, पुणे, रत्नागिरी व तामिळनाडू येथील व्ही. एल. व्हेन्चर, जयना पॅकेजिंग, वृक्षवल्ली, मेनन, पर्यावरण दक्षता मंच, गो डू गुड पॅकेजिंग, बांबू तंत्रा, इको एक्झिट अशा संस्था सहभागी झाल्या आहेत.


00000

महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेचीवस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

 महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेचीवस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती


 


            मुंबई, दि. २० : खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.


            महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती घटनेच्या तपासाअंती एका महिन्यात अहवाल सादर करणार आहे.


            भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.


पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्याशासनाची प्राथमिकता

 पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्याशासनाची प्राथमिकता

                                 - सहकार मंत्री अतुल सावे.

               मुंबई, दि. 20 : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.


            मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय परमाने, सहकार आघाडीचे दीपक पटवर्धन, पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            सहकार मंत्री श्री.सावे म्हणाले की, राज्यातील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीमुळे हे शक्य होणार आहे. डीआयसीजीसीच्या धर्तीवर नागरी सहकारी बँकांतील ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण आहे त्याच पध्दतीने राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण शक्य होईल. पतसंस्थांच्या बाबतचा विश्वास वाढेल आणि सहकारातुन समृध्दी हे ध्येय गाठता येईल.


            या बैठकीत पतसंस्थांच्या प्रतिनिधीनी मांडलेल्या सूचना व हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सूचनांचा सकारात्मक विचार करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, असे सांगून आणखी काही सूचना असतील तर लेखी कळवावे, असे आवाहनही सहकार मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले.


0000

सरकार आपल्या दारी’ उपक्रमातदाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी

 सरकार आपल्या दारी’ उपक्रमातदाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा.

             मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये मांडल्या. स्थानिक प्रशासनाने १५०० तक्रारी पडताळून घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी, ज्या महिलांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यांना रोजगार मार्गदर्शन करावे तसेच निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ देता येवू शकतो ही माहिती द्यावी अशा सूचना महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या.


            ग्रँट रोड येथील मुंबई महापालिकेच्या ‘डी वॉर्ड’ मध्ये सरकार आपल्या दारी उपक्रमांतर्गत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.


       यावेळी मुंबई महानगपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ.अभिनव देशमुख, मुंबई महापालिके च्या उपायुक्त डॉ संगीता हसणाळे,डी वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे "सशक्त नारी-समृद्ध भारत" हे स्वप्न साकार करण्यासाठी महिला बालविकास विभागांतर्गत ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आलेल्या तक्रार अर्जावर १५ दिवसात सर्व विभागांनी कार्यवाही करावी.पावसाळ्यापूर्वी मुंबई उपनगर परिसरामधील स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व कामे करावी. म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महानगरपालिका आणि म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर कार्यशाळा आयोजित करणार असून अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी गस्त करणे गरजेचे आहे जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे शक्य होईल.


          वाहतूक समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळेतील प्रवेश, आरोग्य सुविधा, सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर कारवाई करावी, कचरा पेटीची व्यवस्था, ड्रेनेजची पाइप लाईन फुटली आहे अशा तक्रारी वर प्रत्येक स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करावी. काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुंबई महानगर पालिकेकडून वेळेत पाणी मिळत नाही. आजूबाजूला असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था मोटार लावतात अशा गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करावी.


सरकार आपल्या दारी अभिनव उपक्रम : अनुराधा गोरे


            महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘सरकार आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम असून तो मुंबई शहर आणि उपनगर मध्ये सर्वत्र राबवावा असे मत सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले.


            यावेळी २५० महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ‘डी वॉर्ड’ येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे 20 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


३१ मे २०२३ पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार


            महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एकात्मिक बालविकास योजना आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने 'सरकार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार राबविण्यात येत आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम दि.१९ एप्रिल पासून ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****

कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय - कामगार मंत्री सुरेश खाडे

 कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय

- कामगार मंत्री सुरेश खाडे


 


            मुंबई, दि. १९ : कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे २५ कामगार संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रतिनिधींमार्फत कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद सदस्य भाई जगताप, सचिन अहिर, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, आयुक्त सतीश देशमुख, कामगार नेते नरेंद्र पाटील, राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            सफाई कामगार, आरोग्य खात्याचे कामगार, माथाडी कामगार, घरकामगार, विडी कामगार, विक्रेते,


 रिक्षाचालक, यंत्रकामगार, ऊसतोड कामगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी कामगार यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारांच्या समस्या मांडल्या.


            मंत्री श्री. खाडे म्हणाले, कामगार विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत आहे. उद्योग सुरू राहीले तर कामगार जगेल, यासाठी कामगार केंद्रस्थानी ठेवून कामगारांच्या कल्याणासाठी निर्णय घेण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.


            कामगार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील कार्यवाहीस गती देण्यात येत आहे. कामगारांसाठी क्षेत्रानुसार नवीन किमान वेतन तातडीने जाहीर करण्यात येईल. कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ कामगारांना नियमानुसार पगारात वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना महानगरपालिका आणि शासनात नियुक्त करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करून निर्णय घेणार तसेच त्यांच्या पगार वाढीसंदर्भात तातडीने निर्णय घेणार, असे मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.


            असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावर नोंदणी कार्यालय उभारण्यात येणार असून, या केंद्राअंतर्गत कामगारांना इतर सुविधाही पुरविण्यात येतील. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येणार आहे. कामगार सुरक्षा विमा महामंडळ, कामगार कल्याण मंडळ, बॉयलर वर्कशॉप सुरू करण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना, बालकामगार प्रथा रोखण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. यापुढेही त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्राने ४४ कायदे रद्द करून ४ संहितेत रूपांतर केले आहे. त्याबाबत चर्चा करून कामगारांच्या हिताचा मसुदा तयार करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले. याचबरोबर सर्व संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


००००

Featured post

Lakshvedhi