Saturday, 25 March 2023

सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा

 सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात

30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा


 -मंत्री उदय सामंत


मुंबई दि. 24 : नवी मुंबईतील सिडको महामंडळाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीच्या विकसनाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करून बांधकाम व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


            विधान परिषदेत सदस्य निरंजन डावखरे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, नवी मुंबई शहराचा विकास करण्याकरिता शहरे विकास प्राधिकरण सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडको मार्फत विविध प्रयोजनासाठी जमिनीचे विहित पद्धतीने भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात येते. नियमानुसार करारनामा पासून 4 वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण न केल्यास त्यापुढील बांधकामाच्या कालावधीसाठी अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकरण्यात येते, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


राज्य शासनाने दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीस अहवाल सादर करण्यास ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु हा अहवाल सादर करण्यास दि.३0 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीने दिलेल्या निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माहितीचे विश्लेषण करुन समितीकडून वाढीव मुदतीत अहवाल सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल विहित वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


या समितीच्या कार्यकक्षेमध्ये सिडकोमार्फत आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काच्या दराबाबतचा मुद्दा विचाराधीन असून समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


00000

सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार

 सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 24 : सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. येथील प्रस्तावित वसाहती जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर बंगलोर - मुंबई आर्थिक कॉरिडॉरअंतर्गत सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यानुसार मौजे म्हसवड व धुळदेव येथील क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात आली. येथील एकूण ३२४६.७९ हे.आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जमिनीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यात औद्योगिक नगरी उभारण्यासाठी कोणतीही जागा केंद्र शासनामार्फत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (एनआयसीडीसी) अंतर्गत केंद्र शासनाच्या समितीने तांत्रिकदृष्ट्या उत्तर कोरेगाव मधील जागा पात्र ठरविली, मात्र येथील मौजे भावेनगर, पिंपाडे बु., सोळशी, नांदवळ, रंदुल्लाबाद या ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून भूसंपादनास विरोध केल्याचे एनआयसीडीसी विरोधी संघर्ष समितीने लेखी कळविलेले असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले. तथापि, या गावांची तयारी असल्यास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सांगून जिल्ह्यातील प्रस्तावित एम आय डी सी जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.


00000

दिलखुलास' कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत

 दिलखुलास' कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर शनिवार दि. 25 व सोमवार दि. 27 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.


            राज्यात ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदांची भूमिका ही महत्वपूर्ण ठरत असते. त्याअनुषंगानेच नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कोणते नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत याबाबतची माहिती नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

प्रकल्पासाठी संपादित, परंतु वापरात नसलेल्या जमिनीसंदर्भात धोरण ठरविणार

 प्रकल्पासाठी संपादित, परंतु वापरात नसलेल्या  

जमिनीसंदर्भात धोरण ठरविणार


- मंत्री उदय सामंत.

            मुंबई दि. 24 : राज्यातील विविध प्रकल्पाकरिता वेगवेगळ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जातात. परंतु सदर प्रकल्पांच्या बाबतीत अन्य प्रक्रिया सुरु न झाल्याने विनावापर असलेल्या जमिनीबाबत धोरण निश्चित करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


            विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.


            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे जयपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीकरीता सन 2017-18 मध्ये संपादित करण्यात आल्या आहेत. या भूसंपादनाखाली असलेल्या जमिनीच्या मोबदल्यात संदिग्धता नसल्याने त्यासाठी आवश्यक तो निधी भूसंपादन अधिकारी यांच्याकडे देण्यात आला असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


            या संपादित जमिनीवरील फळझाडे, घरे, विहिरी, बोअरवेल इ. संपत्तीच्या अनुषंगाने प्राप्त तपशीलामध्ये वेळोवेळी तफावत आढळून येत असल्याने त्याबाबत सविस्तर चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने केली आहे. सदर निधी 90 दिवसाच्या आत देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


            राज्यात एमआयडीसी, सिडको, एमएमआरडीएकडून विविध प्रकल्पांकरिता संपादित जमिनीच्या अनुषंगाने उद्योग विभागामार्फत पुनर्विलोकन केले जाईल. तसेच याबाबत धोरण तयार केले जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहिर, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.


००००

रिथ्विक प्रोजेक्ट्रससोबत शासनाचा ८१६० कोटींचा सामंजस्य करार.

 रिथ्विक प्रोजेक्ट्रससोबत शासनाचा ८१६० कोटींचा सामंजस्य करार.

            मुंबई, दि. 24 : रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज ८१६० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.


            यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, कंपनीचे कार्यकारी संचालक सी. एम. राजेश, संचालक के. एस. प्रसाद आदी उपस्थित होते.


            रिथ्विक प्रोजेक्टस कंपनी पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात काम करते. या शिवाय जलऊर्जा प्रकल्प, काँक्रीट धरणे, बॅरेजेस, स्पीलवेज, बोगदे, नाला व बंधारे, राजमार्ग तथा उड्डाणपूल, इमारत बांधकाम, पाणीपुरवठा प्रकल्प तसेच खनिकर्म प्रकल्पात कार्यान्वित आहे.


            कमी पाण्यात उर्जा निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकल्प होत असून पुढील ४ ते ५ वर्षात हा प्रकल्प कार्यान्व‍ित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



बुध -बुडाला धग पहा

 चुलीवरील मटण, मिसळ, आईस्क्रीम नंतर आता मार्केट मध्ये चुलीवरील बाबा आलाय 🤣


Friday, 24 March 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रेस क्लब पुनर्विकास संदर्भात बैठक.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई प्रेस क्लब पुनर्विकास संदर्भात बैठक.

            मुंबई, दि. 24 :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रेस क्लब पुनर्विकास संदर्भात बैठक झाली.


            विधानभवन येथील दालनात झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपसचिव संतोष गावडे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुवीर सिंग, उपाध्यक्ष समर खडस, सचिव राजेश मस्करेहान्स, सदस्य मयुरेश गणपत्ये, संजय व्हनमाने उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, चांगल्या पद्धतीने पुनर्विकास करण्यासंदर्भात मुंबई प्रेस क्लबने आराखडा करावा. मुंबई प्रेस क्लब यांच्या विनंतीच्या अनुषंगाने सर्वंकष कायदेशीर बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            मुंबई प्रेस क्लब यांच्या फोर्ट महसूल विभागातील मिळकतीचा पुनर्विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव महसूल व वन विभागाने सादर केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


-----000------

Featured post

Lakshvedhi