Sunday, 26 March 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबतअहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

 मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबतअहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

            मुंबई, दि. 25 : मांग गारुडी समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात संघटनांसोबत बैठक घ्यावी. त्याचा अहवाल तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.


            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात मांग गारुडी समाजाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ.सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, मांग गारुडी समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.


            मांग गारुडी समाज शिक्षण, रोजगार आदी सोयीसुविधांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा. मांग गारुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र अधिक सुलभतेने देण्यासाठी दक्षता पथकाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


००००

विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय

 विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 25 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्गाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने कामकाजाच्या दृष्टीने हे अधिवेशन विक्रमी ठरले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


      विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली.


       मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अधिवेशनामध्ये विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. लेक लाडकी योजना, राज्याचे नवे आधुनिक महिला धोरण, नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे आदी विषयांबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. महिलांना एस टी बस प्रवासात 50 टक्के सवलतीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


     यावेळी अधिवेशन कालावधीत झालेल्या कामकाजाची माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मिळून 17 विधेयके संमत करण्यात आली. विधान परिषदेत 01 विधेयक प्रलंबित राहिले. संयुक्त समितीकडे एक विधेयक पाठविण्यात आले तर एक विधेयक मागे घेण्यात आले.


     उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आमचा भर विधीमंडळात जास्तीत जास्त कामकाज होण्यावर होता. राज्याला विकासाकडे घेवून जाणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला. विविध समाज घटकांना दिलासा देणारे निर्णय घेतले. सर्वांसाठी घरे ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गृहनिर्माण याशिवाय विविध आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्याचा संकल्प आपण केला आहे. विविध विषयांवरील चर्चेत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली. लोकहिताचे निर्णय घेण्यात राज्य शासनाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.  


विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेली विधेयके खालीलप्रमाणे :


1) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)


(2) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग) 


(3) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)


(4) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)


(5) महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)


(6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


(7) महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)


(8) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)


(9) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)


(10) पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)


(11) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)


(12) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)


(13) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)


(14) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


(15) महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023


(16) महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)


(17) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73अ मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)


विधान परिषदेत प्रलंबित विधेयक


(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


संयुक्त समितीकडे विधेयके


(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग))


०००००


दीपक चव्हाण, निलेश तायडे/विसंअ

हे कोणतं झाड आहे? अधभुत

 हे कोणतं झाड आहे? आगपेटीची काडी फळाजवळ नेली तर पेट घेते आणि तांब त्याच्या फळाजवळ नेलं तर फळ मागे सरकते? पाण्यात फळ टाकलं आणि आगपेटीची काडी पाण्याच्या पृष्ठभागावर फिरवली तरी लगेचच पेट घेते..... अजबच आहे 🤔


Saturday, 25 March 2023

वृक्षतोड परवानगीसंदर्भात संयुक्त बैठक घेणार

 वृक्षतोड परवानगीसंदर्भात संयुक्त बैठक घेणार


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 24 : वृक्षतोडीची परवानगी संबंधित वृक्ष प्राधिकरण किंवा वृक्ष अधिकारी यांच्याकडून देण्यात येते. याबाबत वन विभाग, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, नगरविकास आणि सिडको यांच्यासोबत एक संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य धनंजय मुंडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षतोडबाबत निर्णय कोणत्या विभागाने घ्यायचा, किती दिवसांत घ्यायचा हे



रुग्णवाहिकेसंदर्भात लवकरच नवीन धोरण आणणार

 रुग्णवाहिकेसंदर्भात लवकरच नवीन धोरण आणणार


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. 25 : रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यादृष्टीने रुग्णवाहिका जलद गतीने उपलब्ध होण्याबरोबरच याबाबतची नवीन कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी नवीन धोरण आणण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर, राजेश पवार, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध होण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            डॉ. सावंत म्हणाले की, रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. तर रुग्ण मृत झाल्यावर शववाहिकेची आवश्यकता असते. दोन्हींची आवश्यकता असली तरी त्याची रचना वेगळी असते. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत एक निश्चित धोरण ठरविण्यात येत आहे. शहरांपासून गावांपर्यंत दोन्ही वाहिका तातडीने उपलब्ध होण्यासाठी नगरविकास, ग्रामविकास आणि सार्वजनिक आरोग्य यांची एक संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल.

इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयदुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करणार

 इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयदुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करणार


- सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. 25 : भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य रईस शेख यांनी या रुग्णालयाच्या कामासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.


            डॉ. सावंत म्हणाले की, या रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासंदर्भात 10.38 कोटी रुपयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर केले होते. त्यापैकी 5 कोटी 95 लाख निधी मंजूर होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आला असून या विभागामार्फत रुग्णालयातील कामे करण्यात येत आहे. आता हे रुग्णालय 100 खाटांवरुन 200 खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. इमारतीमधील विद्युत कामांकरीता कार्यकारी अभियंता, ठाणे यांना 10.59 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दिले आहे. आगामी काळात दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे.


0000

अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार

 अलिबाग -रोहा रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई, दि. 25 : “अलिबाग - रोहा दरम्यान रस्त्याचे काम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलेले आहे. या कामासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या दिलेल्या आहेत. तसेच या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे”, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिले.


         अलिबाग -रोहा रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटदार कंपनीने गैर व्यवहार केल्याबद्दल तारांकित प्रश्न विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. 


          मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, अलिबाग - रोहा रस्ता पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या देखील घेतल्या आहेत. लोकहिताच्या कामांमध्ये कोणाकडून अडथळा आणल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले.


        या प्रश्नाच्या अनुषंगाने विधान परिषद सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अनिकेत तटकरे, प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारले.

Featured post

Lakshvedhi