Monday, 20 March 2023

वाळूज प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार

 वाळूज प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात येणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 20 : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज प्रकल्पाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेले दावे, इतर बाबी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्याची शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकल्पासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य शांताराम मोरे यांनी वाळूज प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वाळुज महानगर प्रकल्पाच्या मंजूर धोरणानुसार जमीन मालकाचा प्रत्यक्ष प्रकल्पात सहभाग या संकल्पनेवर प्रत्येक महानगरातील विकास केंद्राकरिता 100% भूसंपादन प्रस्तावित आहे. विकास केंद्राबाहेर २५ टक्के संपादन करावयाचे असून उर्वरित 75 टक्के क्षेत्राचा विकास जमीन मालकाने करावयाचा आहे. भूधारकांकडील 75 टक्के जमिनीवरील विकास करण्यास सिडकोकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, सीमा हिरे यांनी सहभाग घेतला.


००००

जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी

 जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशी


- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील


            मुंबई, दि. 20 : बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य नमिता मुंदडा यांनी बीड जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांमधील अनियमिततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या तक्रारीबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती गठित करून विभागीय आयुक्तालयामार्फत चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार, धनंजय मुंडे यांनी सहभाग 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत


कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

            मुंबई, दि. 20 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.


            यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली’.


            या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.


            ‘राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


००००

प्रकट दिन

 *23 तारखेला अक्कलकोट मध्ये भरपूर प्रमाणात गर्दी असते प्रकट दिन असल्यामुळे जर कोणाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर राहण्याची व्यवस्था झाली नाही किंवा काहीही इतर अडचणी आले म्हणजेच आल्यानंतर कळत नाही कुठे राहायचं मंदिर कुठे आहे किंवा कोणाची येताना गाडी बंद पडते इतर कोणत्याही अडचणी येतात मेडिकल कंडिशन असे कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्हाला संपर्क करा 8411905727 प्रकट दिना दिवशी 24 तास सेवा करण्यास आम्ही समर्थ आहोत भक्तांच्या सेवार्थ* मुख्य म्हणजे आल्यानंतर कोणाचे लहान मुले असतात त्यांना दुधाची व्यवस्था होत नाही त्यांच्यासाठी देखील आम्ही व्यवस्था केली आहे जर कोणाला अशा प्रकारची अक्कलकोट मध्ये आल्यानंतर अडचण आली तर आम्हाला संपर्क करा 8411905727 मोफत दुधाची व्यवस्था करू 

      नितीन शिंदे अक्कलकोट

पर्यटन विभाग आणि भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यात सामंजस्य करार

 पर्यटन विभाग आणि भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल


                                               - मंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबई, दि.20: राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटनेचे देशातील सर्वात मोठे पर्यटन विषयक अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे 29 सप्टेंबर पासून तीन दिवसांसाठी होत आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना (IATO) यांच्या संयुक्त विद्यमाने एक कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.


            मंत्रालयातील दालनात पर्यटन विभाग व भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना यांच्यामध्ये आज सामंजस्य करार झाला. यावेळी पर्यटन मंत्री श्री. लोढा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अध्यक्ष राजीव मेहरा, उपाध्यक्ष रवी गोसाई, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग, नागरी विमान वाहतूक समिती आणि जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटनाचा विकास करताना रोजगारांच्या संधीही निर्माण करायच्या आहेत. त्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रात होत असलेले नावीन्यपूर्ण बदल आणि देशातील पर्यटन क्षेत्रातील सर्व संघटना एकत्र येऊन विचार मंथन होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता भारतीय पर्यटक व्यावसायिक संघटना राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन आयोजित करत आहे. 29 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान तीन दिवसीय अधिवेशन स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशभरातील पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय अधिवेशनात पर्यटन विषयावर विविध मान्यवर त्यांचे विचार मांडणार आहेत. पर्यटन क्षेत्रातील बदलांचा आणि पर्यटन क्षेत्रात देशाला व राज्याला कशाप्रकारे पुढे नेता येईल यासाठी या अधिवेशनाचा नक्कीच उपयोग होईल, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.


0000

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही

 चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 20 : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. “चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व इतर मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी सांगितले.   


००००

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर

 मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर

-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            मुंबई, दि.२०: मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


            मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.


      मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, मागील दहा वर्ष हे काम सुरू आहे. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. पनवेल ते इंदापूर रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी पनवेल ते कासू रस्त्यासाठी १५१ कोटी रुपये, तर कासू ते इंदापूर रस्त्यासाठी ३३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या असून त्यांच्यामार्फत काम सुरू आहे. या रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ड्रोन बसविण्यात आले आहेत. रोजच्या कामाचा आढावा घेतला जात आहे.


            या प्रश्नांच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री जयंत पाटील, भाई जगताप, महादेव जानकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे यांनी उप प्रश्न उपस्थित केले.


००००

Featured post

Lakshvedhi