Saturday, 18 March 2023

प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार

 प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

            मुंबई, दि. १६ : राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागावर चर्चा झाली. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिली.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील 148 महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांना शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे राज्याचे भविष्य आहेत. यांना समान वागणूक मिळाली पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विज्ञान नगरी प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत शासन सकारात्मक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे.


            मंत्री गिरीश महाजन म्हणाले, क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्या देशाच्या, राज्याच्या प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. त्यामुळे खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा पुरस्कार रकमेत जवळपास पाच पट वाढ केली आहे.


            आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यात येणार असून यासाठी निधीची उपलब्धता केली आहे.


            मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. आशा सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.


0

मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय

 *मूड चांगला राहण्यासाठी काही उपाय*


*उदास आहात का ?* 


मग serotonin या हार्मोनच्या अगदी थोड्या प्रमाणामुळे देखील चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. कारण या हार्मोनमुळे चिंता कमी होऊन मूड चांगला होण्यास मदत होते, भूकेवर नियंत्रित येतं व आनंदी राहण्याचं उत्तेजन मिळतं. म्हणून जर उदास वाटत असेल तर मेंदूत हा हॅपी हार्मोन स्त्रवण्यासाठी खालील उपाय नक्की ट्राय करा.


*मसाज-* मसाज घेतल्याने खूप मोकळं वाटतं. त्यामुळे प्रत्येकालाच मसाज घेणे आवडते. तसेच मसाज घेतल्याने serotonin च्या वाढीस चालना मिळते व त्यामुळे दुःख दूर होऊन प्रसन्न वाटतं, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.


*दूध-* दूधपिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुधात असलेल्या α-lactalbumin मुळे serotonin ची निर्मिती होते. α-lactalbumin युक्त कोणत्याही आहाराने मूड सुधारण्यास मदत होते.


*झोप-* अपुरी झोप घेऊ नका. अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे, झोपेचा व serotonin चा संबंध असतो. त्यामुळे मूड चांगला ठेवण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.


*हळद-* यामध्ये असलेल्या Curcumin यात अँटीडिप्रेसन्ट गुणधर्म असतात. म्हणून कोमट दुधात हळद घालून घेतल्याने चटकन मूड सुधारतो.


*काळामिरी-* यामध्ये Piperin नावाचे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते. ते serotonin च्या निर्मितीस अडथळा आणणारे एंझ्याइम्स ब्रेक करते.


*व्यायाम-* serotonin स्त्रवण्याचा उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे. म्हणून नियमित व्यायाम करा आणि प्रसन्न रहा.


*डॉ. प्रमोद ढेरे*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/JoUXUUkKL2YAw1pSuXJtlQ

पीक विम्याची रक्कम 31 मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश

 पीक विम्याची रक्कम 31 मेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपन्यांना निर्देश


– कृषिमंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, दि. 16 :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रक्कमेचे 31 मे, 2023 पर्यंत वाटप करण्यात येईल. याबाबत कार्यवाही करण्यास कसूर करणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.


            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता.


            यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाच विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा वेळोवेळी आढावा मंत्रालयीन स्तरावर या विमा कंपन्यांकडून घेण्यात येतो. त्याचबरोबर, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि कृषि अधिकारी हे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचा नियमित आढावा घेत असतात. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज विविध कारणे दाखवून फेटाळल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 15 दिवसांत या विमा कंपन्यांनी या प्रकरणी फेटाळलेल्या अर्जांची पुन:तपासणी करुन कार्यवाही करण्यास संबंधित कंपन्यांना निर्देश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.


            कोणत्याही शेतकऱ्याने पीक नुकसानीबाबतची माहिती दिली असेल तर त्यांना निश्चितपणे नुकसानभरपाई दिली जाईल, असे सांगून मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, सर्व विमा कंपन्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, हे निश्चितपणे पाहू, असे त्यांनी स्पष्ट केले.


            यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी पीक विमा योजनेसंदर्भात आकडेवारी सभागृहासमोर मांडली. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2022 मध्ये राज्यातील एकूण 57 लाख 64 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले. एकूण 63 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 2 हजार 822 कोटी 32 लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 305 कोटी रुपये 54 लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित नुकसानभरपाई वाटप सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.


            याशिवाय, या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीपोटी आतापर्यंत 1 हजार 674 कोटी 79 लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.


            यावेळी सदस्य एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सुरेश धस, नीलय नाईक, राजेश राठोड, प्रवीण पोटे पाटील यांनी उपप्रश्न विचारले.


****

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठित करणार

 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अडचणी सोडविण्यासाठी

समिती गठित करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. १६ : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये शासनाला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या पात्रतेबाबत परिशिष्ट दोन मधील यादी सात दिवसांच्या आत संकेतस्थळावर देण्यात येते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत झोपडपट्टी मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्यामुळे अपात्र लोक यात येणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            झोपडपट्टी पुनर्विकास तसेच पुनर्वसनाबाबत प्रधानमंत्री महोदयांच्या सल्लागार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सुद्धा सक्तवसुली संचालनालयाकडून पुनर्वसन प्रकल्पांबाबत परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने विनंती करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.


            शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे पुनर्वसन होत असलेल्या सहा हजार धारकांना घर भाडे मिळवून देणार असून म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातही स्वयंपुनर्विकास पथदर्शी स्तरावर प्रकल्प करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करावा

 तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करावा


पंढरपूर कॉरिडॉरसंदर्भात आयोजित बैठकीत विधानपरिषद उपसभापतींसह मंत्री महोदयांची सूचना.

            मुंबई, ता. १६ : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपस्थित मंत्री महोदयांनी दिल्या.


            आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात आज दुपारी पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यटन मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री महादेव जानकर, रणजितसिंह मोहिते- पाटील, सचिन अहिर, अमोल मिटकरी, समाधान औताडे, आमदार मनीषा कायंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, मंदिर समितीच्या माधवी निगडे, पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर सल्लागार समितीच्या तेजस्विनी आफळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराजे शिंदे आदी उपस्थित होते.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, की पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करणारे सल्लागार आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे. वारकऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूप आराखड्यातील सकारात्मक बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांच्यास्तरावर होईल. मात्र, या बैठकीत होणाऱ्या चर्चेअंती मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे. वाराणसीमध्ये झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाची माहिती प्रशासनाने घेत स्थानिक नागरिकांच्या सूचना ऐकून घ्याव्यात. त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती वारकऱ्यांना द्यावी.


            डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंढरपूर हे जागतिक पातळीवरील तीर्थक्षेत्र आहे. तेथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते. त्यानुसार भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर शासनातर्फे आहे. पर्यटन मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर विकास करताना स्थानिकांच्या भावना लक्षात घेवून पंढरपूर विकासाचे वेगळे मॉडेल तयार करण्यात येईल. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात येईल. महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी शासन स्तरावरून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


            आमदार श्री. औताडे, श्री. जानकर, श्री. अहिर, श्रीमती कायंदे यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांच्या असलेल्या हरकती आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत माहिती दिली.


00000

काजू लागवड

 मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा होणार काजू लागवड ! वन जमिनीवरही लागवड !


काजू बॉंडापासून रस,

शीतपेय, पशुखाद्यनिर्मिती


शेतकऱ्यांच्या हितासाठी,

राज्य सरकार सदैव तत्पर

पद्मश्री मिळवणारे 'खतरों के खिलाडी

 पद्मश्री मिळवणारे 'खतरों के खिलाडी'... विनीत वर्तक ©


चित्रपटात एकाच वेळी अनेक शत्रूंशी मारामारी करणारे आणि अनेक कठीण गोष्टी सहजगत्या करणारे कलाकार सगळ्यांच्या तोंडी हिरो म्हणून ओळखले जातात. अनेक प्रेक्षकांना त्यांच्या 'खतरों के खिलाडी' या इमेज चं खूप आकर्षण असते. पण वास्तवात मात्र या कलाकारांच व्यक्तिगत आयुष्य मात्र खूप वेगळं असते. पण तरीही ते अनेकांसाठी हिरो असतात. पण प्रत्यक्षातले खतरों के खिलाडी मात्र वास्तवात अगदी रोजच्या रोज जिवावर उदार होऊन अनेक संकटांशी सामना करत असतात. अनेकदा ते आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या नजरेत कधी येतच नाहीत. या वर्षीच्या पद्म सन्मानाच्या यादीत अश्याच दोन 'खतरों के खिलाडी' च्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या पराक्रमाचे सूप फक्त भारतात नाही तर साता समुद्रापार अमेरिकेत वाजले. त्यानंतर संपूर्ण जगात त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. हे सगळं घडल्यावर भारताने त्यांचा यावर्षीच्या पद्मश्री सन्मानाने गौरव केला आहे. ते 'खतरों के खिलाडी' आहेत तामिळनाडू चे 'वाडीवेल गोपाळ' आणि 'मासी सदायन'. 


वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन हे दोघेही इरुला या आदिवासी समाजाचे घटक आहेत. या समाजाचा साप आणि उंदीर पकडण्याशी ऐतिहासिक संबंध आहे. पिढ्यान पिढ्या त्यांच्याकडे साप आणि उंदिरांना कल्पकतेने पकडण्याचे ज्ञान हस्तांतरित होत आलेलं आहे. हे ज्ञान फक्त त्यांना पकडण्याचे नाही तर सापांचा विषारी दंश झाल्यावर त्या विषाची दाहकता कमी करण्यासाठी ज्या जंगली वनऔषधीचा वापर होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो याबद्दल ही आहे. १९७८ मधे इरुला स्नेक कॅचर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेमुळे हा समुदाय भारतातील विषविरोधी प्रदान करणारी एकमेव अधिकृत संस्था बनला. त्यामुळेच सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असलेल्या भारतासारख्या देशात, इरुला समुदायाचे कौशल्य आणि ज्ञान जीव वाचवण्यासाठी अमूल्य आहे. 


वाडीवेल गोपाळ आणि मासी यांनीही लहानपणापासूनच साप पकडायला सुरुवात केली. धोकादायक आणि विषारी साप पकडण्यात त्यांचे कौशल्य वाखण्यासारखं होते. अनेक ठिकाणी विषारी साप पकडण्यासाठी त्यांना बोलावलं जाऊ लागलं. अशा परिस्थितीत ते खतरों के खिलाडी ची जोडी म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आणि त्यांना अनेक राज्यांत बोलावले गेलं. अनेक ठिकाणी विषारी साप पकडून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले. कोणतंही अधिकृत शिक्षण नसताना परंपरेने चालत आलेली साप पकडण्याची पद्धत अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती. पण त्याच पद्धतीने त्यांनी सापाच्या दंशापासून आपलं संरक्षण करत अनेक विषारी सापांना पकडलं होतं. 


साधारण २ वर्षापूर्वी अमेरीकेत फ्लोरिडा राज्यात बर्मीज अजगरांनी धुमाकूळ घातला होता. अत्यंत धोकादायक असलेल्या या अजगरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून जवळपास ८०० साप पकडणाऱ्या लोकांना फ्लोरीडा इकडे बोलावलं गेलं. त्यात वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांना ही निमंत्रण होतं. वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांनी पुढल्या १० दिवसात १४ अत्यंत धोकादायक असलेल्या अजगरांना पकडून अमेरीकेच्या अधिकाऱ्यानं समोर आपली प्रतिभा मांडली. या जोडीने त्या ८०० जणांमधून सगळ्यात जास्ती अजगर पकडले. त्यांच्या साप पकडण्याच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झालेल्या अमेरीकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अमेरीकेच्या लोकांना त्यांच तंत्रज्ञान शिकवण्याची विनंती केली. अमेरीकेत आपल्या ज्ञानाचा डंका वाजवल्यामुळे त्यांना जगातील इतर अनेक देशातून त्यांना निमंत्रण आलं. थायलंड मधून तिथल्या सर्पतज्ञांना शिकवण्यासाठी पाचारण करण्यात आलं.


अमेरीका, थायलंड इकडे आपल्या प्रतिभेने सगळ्यांना प्रभावित केल्यावर खतरों के खिलाडी च्या जोडीने अनेक देशातून साप पकडण्याच्या आपल्या परंपरागत तंत्रज्ञानाला जगभरात तर पोहचवलं पण त्या पलीकडे जगातील अनेक लोकांना अत्यंत विषारी साप पकडण्यासाठी शिकवलं. भारताच्या एका आदिवासी आणि समाजाच्या रचनेत सगळ्यात तळाशी असणाऱ्या व्यवस्थेतून त्यांनी आपलं कौशल्य सर्व जगात पसरवलं आणि त्यातून स्वतः सोबत, आपल्या समाजाचं आणि त्या निमित्ताने भारताचं नाव या क्षेत्रात अतिशय वर नेलं. 


त्यांच्या याच कार्याची दखल घेताना भारत सरकारने त्यांची या वर्षीच्या पद्म सन्मानासाठी निवड केली आहे. वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांचा खतरों के खिलाडी चा प्रवास नुसता त्यांच्या कौशल्यासाठी नाही तर समाजरचनेत आणि भारतीय लोकशाहीत होणाऱ्या बदलांसाठी अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. गेल्या काही वर्षापासून पद्म सन्मानाची व्याख्या बदलत जाते आहे. समाजातील सगळ्यात तळाशी असणारा व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने पद्म सन्मानाचा मानकरी ठरतो. तेव्हा तो सर्व प्रवास भारताची एक प्रतिमा निर्माण करतो जी जगात भारताचं नाव उंचावर नेण्यासाठी एक मैलाचा दगड ठरते. तूर्तास खतरों के खिलाडी वाडीवेल गोपाळ आणि मासी सदायन यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. 


जय हिंद!!!


फोटो शोध सौजन्य :- गुगल 


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Featured post

Lakshvedhi