Thursday, 2 March 2023

मराठी भाषेसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका इंग्रजांला त्रिवार मुजरा.*

 *मराठी भाषेसाठी आयुष्य वेचणाऱ्या एका इंग्रजांला त्रिवार मुजरा.*

*थोडासा प्रतीर्घ तरीही अत्त्यंत वाचनीय आहे. वेळ काढून अवश्य अवश्य वाचा.*


मोल्सवर्थचा मोरेश्वर शास्त्री कसा झाला? 


जरूर वाचा👇


मोल्सवर्थचा मराठी – इंग्रजी शब्दकोश ऐकूनही माहीत नाही असा मराठी माणूस सापडणं कठीण  


पण हा मोल्सवर्थ नेमका कोण हे माहीत असणारी मराठी माणसंही तशी कमीच. 


मोल्सवर्थची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आजही सुमारे १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. 


 महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. 


मोल्सवर्थ ह्या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही डिक्शनरी तयार करून दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यकथा अचंबित करणारी आणि आजच्या तरूणांना प्रेरणा देणारी अशी दोन्ही आहे. प्रत्येक मराठी माणसाला ती निदान माहीत तरी असायला हवी.


जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक ब्रिटीश लष्करी अधिकारी. जन्म १५ जून १७९५ चा. शालेय शिक्षण व बालपण ब्रिटनमध्ये गेलेलं. त्याकाळी किशोरवयीन ब्रिटीश मुलांना लष्करात दाखल करण्याची पद्धत होती. जेम्स वयाच्या १६ व्या वर्षी ब्रिटीश लष्करात दाखल झाला. एप्रिल १८१२ मध्ये १७ व्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यांत आले. ब्रिटीश लष्कराच्या पद्धतीप्रमाणे भारतात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला मराठी भाषा शिकावी लागे. त्याच्या परिक्षा घेतल्या जात, आणि त्यात पास होण्याची लष्करी सक्तीही असे. जेम्स त्या परिक्षांसाठी मराठी शिकू लागला आणि मराठी भाषेच्या चक्क प्रेमातच पडला. मराठी शब्द जमवण्याचा छंद त्याला लागला. पुढे १८१४ मध्ये त्याला लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. १८१८ मध्ये त्याची बदली सोलापूरला झाली. तेव्हा तो २३ वर्षांचा होता. मराठीत भाषांतर करण्यासाठी तो जे शब्द टिपून ठेवत होता त्याची संख्या दिवसेदिवस वाढत होती. पुढे १८२४ मध्ये त्याची बदली गुजरातमध्ये खेडा भागात झाली. मराठी वातावरणाची सवय झालेल्या मोल्सवर्थला गुजरातमध्ये करमेना. त्याने पुढल्या काही महिन्यांत ब्रिटीश सेनेकडे मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि महाराष्ट्रात बदलीही मागितली.


शब्दकोशासाठी सहकाऱ्यांचा पगार, स्टेशनरी वगैरेंचा मिळून एकूण खर्च २००० रूपये येईल त्यास मंजुरी मिळावी अशी प्रस्तावात विनंती होती. पण ब्रिटीश सेनेने त्याचा प्रस्ताव फेटाळला. इंग्रज सरकारला मराठी शब्दकोशाशी कसले देणेघेणे ? त्यांना आपले साम्राज्य सांभाळायचे आणि त्यासाठी लढाया करायच्या एवढेच माहिती. मोल्सवर्थच्या प्रस्तावावर ब्रिटीश सेनेचे म्हणणे होते की लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी यांनी एक मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार केला आहे. तो पुरेसा आहे. सबब, प्रस्ताव नामंजूर.


पण मोल्सवर्थ तर मराठी शब्दकोशाच्या कल्पनेने झपाटला होता. गुजरातमध्ये राहून मराठी शब्दकोश होणे शक्य नव्हते. वारंवार विनंती अर्ज, स्मरणपत्र पाठवूनही त्याची महाराष्ट्रात बदली होत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने एक धमकी आणि एक ऑफर ब्रिटीशांना दिली. धमकी अशी की बदली झाली नाही तर मी लष्करी नोकरीच सोडून देईन. ऑफर अशी की शब्दकोशासाठी रजा दिली तर त्याला मिळणारे सर्व भत्ते तो सोडून द्यायला तयार आहे. एवढं टोक गाठल्यावर त्याची बदली मुंबईत करण्यांत झाली. 


शब्दकोश तयार करण्याची परवानगीही त्याला देण्यांत आली. मोल्सवर्थवर अधिकारी म्हणून लष्करी जबाबदाऱ्या होत्या, त्यात आणखी एक भर म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा (BNES) कारभार पाहण्याचं कामही त्याला दिलं गेलं. बीएनईएस संस्थेत त्याची भेट मराठी भाषा उत्तम जाणणाऱ्या काही शास्त्री मंडळींशी झाली. सोलापूरला असताना त्याची ओळख थॉमस कँडी यांच्याशी झाली होती. थॉमस कँडी आणि त्यांचा जुळा भाऊ जॉर्ज दोघेही मराठी उत्तम जाणणारे होते. थॉमस तर संस्कृत पाठशाळेचे प्राचार्य म्हणून काम करीत असत. दोघा कँडी बंधूंना मुंबईला बीएनईएस मध्ये पाठवण्यांत यावं ही मोल्सवर्थची विनंतीही ब्रिटीशांनी मान्य केली.


कँडी बंधू एप्रिल १८२६ मध्ये मुंबईला आले. आता मराठी शब्दकोशाचं काम वेगात सुरू झालं. पण जून महिन्यांत मुंबईत पावसाने थैमान घातलं. हवामान पार बदलून गेलं. कँडी आणि मोल्सवर्थ सगळेच त्या पावसाने हैराण झाले. मुंबई सोडून कोकणात जावं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार शब्दकोशाचं पुढलं काम बाणकोट आणि दापोली येथे झालं. १८२८ च्या डिसेंबरात शब्दकोशाची अंतिम प्रत तयार झाली. बीएनईएस संस्थेचा लिथो छापखाना होता. तिथे शब्दकोशाची छपाई करावी असं ठरलं. मोल्सवर्थला उपलब्ध असलेले मराठी टाईप आवडले नव्हते. त्यामुळे त्याने नवा आणखी सुबक टाईप शब्दकोशासाठी करून घेण्याचे ठरवले. त्यावेळी टाईप फक्त कलकत्त्यात तयार होत. काही आठवड्यांत कलकत्त्याहून नवे टाईपही आले. तयार झालेला शब्दकोश २५,००० शब्दांचा होता. कलकत्त्याहून टाईप यायला जो वेळ लागला तेवढ्या वेळात मोल्सवर्थने आणखी १५,००० शब्द जमा केले आणि शब्दकोशातील शब्दांची संख्या ४०,००० केली. शब्दकोशाला नाव दिले ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’. छपाई पुर्ण होऊन प्रती हाती यायला १८३१ साल उजाडले.


मोल्सवर्थने काही प्रती एका पत्रासोबत ब्रिटीश सेनाप्रमुखांकडे पाठवल्या. पत्रात लिहीले की “कामाचा आवाका, आणि झालेल्या कामाचा दर्जा (याबाबत मी बोलण्यापेक्षा) प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कल्पना येईल.


लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडींनी तयार केलेला मराठी शब्दकोश ८००० शब्दांचा होता. मोल्सवर्थचा ४०,००० शब्दांचा. पण सरळ कौतुक करतील तर ते ब्रिटीश कसले? 


शब्दकोशाचा दर्जा ठरवण्यासाठी त्यांनी एक समिती नेमली. त्यात लेफ्टनंट कर्नल केनेडी, लेफ्टनंट जॉर्ज पोप, आणि रॉबर्ट कॉटन मनी हे तीन सदस्य नेमले.


केनेडींच्या मते मराठी ही फक्त एक बोली भाषा होती, आणि त्यात जे मोजके शब्द आहेत त्यांचा कोश त्यांनी तयार केलेला होता. नव्या कोशाला मुळातच त्यांचा विरोध होता. त्यांनी मत दिले की मोल्सवर्थने संस्कृत, पर्शियन, फारशी, अरबी वगैरे शब्दांचा भरणा करून शब्दसंख्या वाढवली आहे. मराठीत एवढे शब्दच नाहीत. जॉर्ज पोप यांनीही केनेडींचीच री ओढली. पण रॉबर्ट मनी यांनी मोल्सवर्थचं कौतुक केलं. भारतात आजपर्यंत झालेल्या छपाईत ही छपाई उजवी असल्याचे सांगून त्यांनी लिहीलं की “अशा मोठ्या शब्दकोशाची विद्यार्थ्यांचा विचार करता गरजच होती. शब्दकोश समृद्ध आणि अचूक आहे. मऱ्हाठा (मराठी) भाषेचे विशाल ज्ञान त्यात आहे. हा ग्रंथ गौरवास पात्र आहे.”


त्रिसदस्य समितीची उलट सुलट मते पाहून इंग्रज सरकार बुचकळ्यात पडले. त्यांनी आता १८ सदस्यांची एक समिती मोल्सवर्थ डिक्शनरीचे मूल्यमापन करण्यासाठी नेमली. त्या समितीने मात्र एकमुखाने मोल्सवर्थच्या कामाची वाखाणणी केली. ही डिक्शनरी नसती तर किती तरी मराठी शब्द युरोपियनाना कधीच समजले नसते असा अभिप्राय बहुतेक सदस्यांनी दिला. पाठोपाठ सप्टेंबर १८३१ मध्ये इंग्रज सरकारनी मोल्सवर्थची प्रशंसा करणारे पत्र त्याला पाठवले. मोल्सवर्थने आता इंग्रजी – मराठी डिक्शनरीही तयार करावी असं इंग्रज सरकारने सुचवलं आणि त्या खर्चास मंजुरीही दिली.

मोल्सवर्थने कँडी यांच्या मदतीने इंग्रजी – मराठी डिक्शनरीचे काम सुरूही केले. पण १८३२ च्या सुमारास त्याला प्रकृतीचा त्रास होऊ लागला. जिद्दीने मराठी – इंग्रजी शब्दकोशाचे काम करताना त्याचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. आयुष्यातली इतकी सारी वर्ष मराठी – इंग्रजी शब्दकोश तयार करण्यांत गेली होती. तो आता ३७ वर्षांचा झाला होता. लग्न करायचं राहूनच गेलं होतं. थंड हवेच्या ठिकाणी गेलं तर तब्येत सुधारेल म्हणून तो उटीजवळच्या भागात दक्षिण भारतात काही दिवस जाऊन राहिला. पण तब्येत त्याला साथच देत नव्हती. नाईलाजाने तो १८३६ मध्ये इंग्लंडला परत गेला.

१८३६ ते १८५१ ही १५ वर्षे मोल्सवर्थ मराठी आणि महाराष्ट्रापासून दूर साता समुद्रापार इंग्लंडमध्ये राहिला. दरम्यान शब्दकोशाची पहिली आवृत्ती संपत आली होती. दुसरी सुधारित आवृत्ती तयार करायची होती. इंग्रज सरकारने १५ वर्षांनंतर मोल्सवर्थला विनंती केली की दुसरी आवृत्ती तयार करायला भारतात या, मराठीसाठी तुमची गरज आहे. त्या विनंतीला मान देऊन मोल्सवर्थ १८५१ साली पुन्हा भारतात आला . वय ५६ वर्षांचे होते. पण तब्येत सुधारली होती. त्याला सर्वांशी उत्साहाने उत्कृष्ट मराठीत बोलताना पाहून लोक तोंडात बोट घालत होते.


१८५१ ते १८५७ ही सात वर्षे मोल्सवर्थने मराठी – इंग्रजी शब्दकोशासाठी पुन्हा वाहून घेतले. हे काम त्याने पुणे आणि महाबळेश्वर येथे राहून केले. तयार झालेल्या नव्या सुधारित शब्दकोशात आता ६०,००० मराठी शब्द होते. १८५७ साली हा ९५२ पानांचा सुधारित मोल्सवर्थकृत मराठी इंग्रजी शब्दकोश प्रकाशित झाला. आज आपण हीच आवृत्ती पहात असतो. अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीने ही डिक्शनरी इंटरनेटवर (सर्चसह) उपलब्ध केली आहे हे आज बहुतेकांना माहित आहे.


मोल्सवर्थ १८६० मध्ये इंग्लंडमध्ये परत गेला. शब्दकोशाच्या कामात मोल्सवर्थला मदत करणारी कितीतरी शास्त्री मंडळी होती. त्यात अलिबाग नागाव कडली बरीच होती. ते सारे मोल्सवर्थला मोलेसर शास्त्री म्हणत. काही जणांनी तर मोरेश्वर शास्त्री असेच बारसे करून टाकले होते.


मोल्सवर्थ १३ जुलै १८७२ रोजी कलीफ्टन येथे वारला. असं म्हणतात की तो गेल्याचे कळल्यावर आपल्याकडल्या अनेक शास्त्र्यांनी मोलेसर शास्त्र्याचा श्राध्दपक्षही केला होता.


जेम्स थॉमस मोल्सवर्थ, ज्याची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून टाकून शेवटपर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करून घेतात काय, सगळेच अघटित आहे. 


अगदी मोल्सवर्थइतकं समर्पण आज मिळण्याची अपेक्षा नाही, पण निदान त्याच्याकडून प्रेरणा घेण्याइतपत तरी क्षमता आजच्या मराठीजनांमध्ये असायला हवी. असावी.


मोल्सवर्थच्या कार्याचा गौरव करताना विश्वकोशकर्ते पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहीले, “‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वत: मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही." 🙏🏻


 पण वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्र मोल्सवर्थचे ऋण विसरला आहे हे मात्र नक्की. 


📖 (संग्रहित)✍🏻


 कॉपी-पेस्ट फॉरवर्डेड मेसेज इतकी अमूल्य माहिती संग्रहित करणाऱ्या विद्वतजनाचे मनस्वी कौतुक आणि आभार

खूप छान माहिती आहे. दापोली आणि नागाव ( अलिबाग ) चा उल्लेख आहे

.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीयंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे

 .बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीयंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे


- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

      मुंबई, दि. 2 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयाने विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या.


            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना सूचित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करुन द्याव्यात. जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम विनाअडथळा पार पडतील, यादृष्टीने पोलिस प्रशासनाने काटेकोर व्यवस्था ठेवावी, तसेच जयंतीदिनी चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर आधारित ‘भीमपहाट’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी संबंधितांना सूचित केले.


            सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाणारे समाजभूषण पुरस्कार प्रलंबित असून त्यांचे वितरण करण्यात यावे, तसेच या पुरस्कारांसाठी प्राप्त अर्जदारांसोबतच उत्कृष्ट सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाने स्वतः पुढाकार घेऊन पुरस्कार द्यावा, असे सूचित केले. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला. 


      महाड येथे २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी देखील संबंधित यंत्रणांनी चोख तयारी ठेवावी. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन महाड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सभांचे नियोजन करण्याची खबरदारी घ्यावी. वाहतूकीची कोंडी न होता नागरिाकंना विनासायास त्या ठिकाणी येता जाता येईल, यादृष्टीने वाहतूक पोलीस प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना श्री.आठवले यांनी संबंधितांना दिल्या. पोलीस प्रशासन, मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपक्रमांची, सोयी सुविधांची सविस्तर माहिती यावेळी संबंधितांनी दिली.   


      मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, यांच्यासह गृह विभाग, महानगरपालिका तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणाप्रमुख तसेच माजी मंत्री अविनाश महातेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, यांच्यासह इतर संबंधित बैठकीला उपस्थित होते.

कधी असेही जगून बघा…

 ✍️✍️✍️✍️

📀 कधी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगताना

हा एक हिशोब करुन तर बघा!

“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?

हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी

समोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी

न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात

कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!

स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण

कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते

कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!

काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?

आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?

एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते

त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..


अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?

कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!

चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?

आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..


आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते

त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!

तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो

कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!

📀 कधी असेही जगून बघा…..

😊 शुभ संध्या

जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार

 जळगाव येथील रेमंड कंपनीसंदर्भात कामगार हिताचा निर्णय घेणार


- कामगार मंत्री सुरेश खाडे


            मुंबई, दि. 2 - कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून जळगाव येथील एमआयडीसीमधील रेमंड लिमिटेड कंपनी पुन्हा सुरू झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.


            मंत्री श्री. खाडे म्हणाले, रेमंड लिमिटेड एमआयडीसी जळगाव या आस्थापनेत व्यवस्थापनाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत ६ डिसेंबर २०२२ रोजी पगार वाढीचा करार केला. या कराराविरुद्ध १० कामगारांनी मान्यताप्राप्त संघटनेने केलेल्या कराराविरुद्ध घोषणा देऊन कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना काम करण्यास मज्जाव केला. या कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


            या संदर्भात कामगार आयुक्त आणि संबंधित कामगार संघटनांची येत्या आठ दिवसांत एकत्रित बैठक घेऊन आणि कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून कामगार हिताचा निर्णय घेतला जाईल. तसेच कामगार हितासाठी जे प्रयत्न करणे आवश्यक असेल ते निश्चित करण्यात येतील, असे मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी सांगितले.


            यासंदर्भात झालेल्या चर्चेत मंत्री गिरीष महाजन, सदस्य सर्वश्री भाई जगताप, सचिन अहीर, शशिकांत शिंदे, अनिल परब, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.


00000

हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीलाप्रतिबंधासाठी विशेष भरारी पथक

 हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीलाप्रतिबंधासाठी विशेष भरारी पथक


- मंत्री शंभूराज देसाई


            मुंबई, दि. 2 : हिंगोली जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळात विशेष भरारी पथक नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.


            विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक अनुषंगाने लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी ते बोलत होते.


            मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, अवैध देशी, विदेशी मद्यनिर्मिती, विक्री, वाहतुकीला आळा घालण्यासाठी विभागामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत. अधिवेशनानंतर या विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तीविरुद्ध बंधपत्र घेतले जाते, परंतु तिसऱ्यांदा जर या बंधपत्राचे संबंधित व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित करण्यात येईल. तसेच गृह विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            हिंगोली जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत 375 गुन्हे नोंदविण्यात येऊन 349 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश अधीक्षक यांना देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.


            राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विभाग स्तरावर भरती प्रक्रिया राबवून तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, भाई जगताप, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

 शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल यांच्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

20 मार्चपर्यंत नामांकन प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

नांदेड,- विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यात लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक ज्ञानविश्व ला सहा वर्ष पूर्ण होत असून सातव्या वर्षात पदार्पण होत आहे. शिक्षण या विषयाला समर्पित असलेल्या या साप्ताहिकाच्या सहा वर्षांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त प्राथमिक/माध्यमिक शाळातील शिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच महाविद्यालयांचे ग्रंथपाल यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासोबतच एका वरिष्ठ शिक्षकाला द.तु.मस्के शिक्षक जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी नामांकन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील ज्ञानाला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 2023 मध्ये वितरीत होणार्‍या या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत.

पुरस्काराचे स्वरूपः सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम असे आहे.

नामांकनासाठीचे निकष व नियमः

* नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय 45 वर्षे असावे. (दि. 1 मार्च 2023 पर्यंत)जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे.

(उपक्रमशील मुख्याध्यापक, प्राचार्य व जीवनगौरव पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)

* किमान 3 वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* नामांकन पाठवण्याचा अंतिम दिनांक सोमवार, 20 मार्च 2023

* निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

प्रस्ताव/नामांकन पाठवण्याचे स्वरूपः

आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी. शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणीवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन. उपक्रमासंबंधीची छायाचित्रे. वपूरर्पींळीर्हींरऽसारळश्र.लेा या मेल आयडीवर पीडीएफ स्वरुपात पाठवावी.

संपर्क: 9604466601, 8830425121.

इमेल केल्यानंतर संपर्क क्रमांकावर मेसेज करावा असे आवाहन ज्ञानविश्व साप्ताहिकाचे संपादक रमेश मस्के यांनी केले आहे.



कब्बडी कबड्डी


 

Featured post

Lakshvedhi