Saturday, 25 February 2023

राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डि.लीट.ने सन्मानित.

          मुंबई, दि. 24 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाला.


          दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि.लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.


            कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


            डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांचे अभिनंदन करताना यंदापासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठांना गतकाळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांप्रमाणे पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            स्नातकांनी आपल्या देशातील भाषा, संस्कृती व परंपरा यांच्या सोबतच इतर देशांच्या भाषा व संस्कृतीचे अध्ययन करावे तसेच तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा व मूल्यमापन पद्धतीमध्ये देखील बदल व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  


            हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ, जलसंधारण, वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून स्वारातीम देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना देशाला ज्ञानाधिष्ठित जागतिक महासत्ता बनविण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी विद्यापीठांवर असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पेटंट मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनामुळे स्वारातीम हे देशातील महत्वाचे विद्यापीठ ठरले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ केवळ पदव्या प्रदान करणारी संस्था नसून समाज व राष्ट्र निर्मितीकरिता जबाबदार नागरिक निर्माण करणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ शिक्षणापासून वंचित लोकांना तसेच महिलांना होऊ शकतो असे सांगताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पुरस्कार केला.


            "गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल" - नितीन गडकरी


             नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले. उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'अन्नदाता शेतकरी' हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागत संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे त्यांनी सांगितले.


डॉ अनिल काकोडकर


            विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावणे, सामाजिक व आर्थिक समस्यापूर्ती करणे तसेच समाजातील विषमता दूर करणे अशा तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी उद्योजकतेला चालना तसेच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले. 


            यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.


००००


 


25th Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University


 


Governor confers Honorary D.Litt. on Nitin Gadkari & Kamalkishor Kadam


      Mumbai 24 :Governor and Chancellor of state universities Ramesh Bais presided over the 25th Annual Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU), Nanded through online mode.


      The degree of Honorary Doctor of Letters (D.Litt.) was conferred on Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari and former Maharashtra Education Minister Kamalkishor Kadam.


      Chancellor of the Homi Bhabha National Institute and Chairman of Rajiv Gandhi Science and Technology Commission Dr. Anil Kakodkar delivered the Convocation address through online mode.


      Dr. Udhav Bhosle, Vice Chancellor of SRTMU, Dr. Jogendrasingh Bisen, Pro Vice Chancellor, Dr. Sarjerao Shinde, Registrar, Dr. Digambar Netke, Director of Board of Examinations and Evaluation, Deans of various faculties, teachers and graduating students were present.


०००



ये जिवन हैं







 

विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

 विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी साहित्याची ज्ञानयात्रा

ज्ञानपीठ सन्मानित साहित्यकृतींचे अभिवाचनाने संस्मरण.

            मुंबई, दि. २५ : कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित "मराठी साहित्याची ज्ञानयात्रा" या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल.


            हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.


            मराठी भाषेची, मराठी साहित्याची उंची वाढविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत हे करतील. नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे हे याप्रसंगी कविता गायन करतील. विधानमंडळातील या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मिती क्रिएशन्स सांभाळत आहे. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पत्रकार, साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि मराठी भाषा समितीचे उप सचिव विलास आठवले यांनी केले आहे.



अन्न व औषध प्रशासन विभागाचे स्नेह संमेलन संपन्न

 अन्न व औषध प्रशासन विभागाचे स्नेह संमेलन संपन्न

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलागुणांच्या प्रदर्शनाचे


 अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले कौतुकl.

            मुंबई, दि. 24 : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्या कामांसोबत इतर कला गुणांमधे प्रवीण आहेत हे खरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी काढले.


            अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.


            यावेळी आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त चंद्रकांत थोरात, भूषण पाटील, शैलेश आढाव, दुष्यंत भामरे, शशिकांत केकरे, दयानंद अवशंक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


            अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने थ्रो बॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, गोळाफेक, कॅरमसह संगीत खुर्ची आणि अंताक्षरी यासारखे खेळ आयोजित केले होते. या खेळांमधील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.


            यावेळी गुणवंत पाल्यांचे सत्कार देखील करण्यात आले. राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रेरणेने, सचिव डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त श्री. काळे यांच्या संकल्पनेतून हे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते.


००००

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

 चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे 250 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022- 2023 मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक 4 मधील 14 सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी 1 मार्च 2023 पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत 4 था मजला, चेंबुर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक 116, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे 1 मार्च 2023 पर्यंत होईल.


            प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी


विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी : विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन 2022-2023 मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा.


वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यककागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


 

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

 महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 25 : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सशक्ती डिजिटल व्हॅनचा’ शुभारंभ करण्यात आला. 

            मास्टरकार्ड अॅण्ड लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे 7 हजार 500 महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

            मंत्री श्री. लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

            याप्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई, सीएससी महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक धवल जाधव, माजी नगरसेवक अभिजित सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद दुबे, सशक्ती टीमचे चंद्रकांत अहिरे, सनम शेख आदी उपस्थित होते.


 

राज्य शासनाच्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता

 राज्य शासनाच्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिताविविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविणार


विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

               मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी विभाग स्तरावर आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात विभाग स्तरावर होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर जानेवारी महिन्यात विभाग आणि राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.


            महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी क्रीडा धोरण राबविण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी राबविण्याची मागणी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्याकडून महसूलमंत्री यांच्याकडे करण्यात येत होती. या अनुषंगाने, राज्याचे क्रीडा धोरण तसेच अधिकारी, कर्मचारी, संघटनांच्या सूचनांचा विचार करत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय तथा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात महसूल विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख या उपविभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक आज महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विविध महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी महसूल मंत्री श्री.विखे - पाटील यांच्याकडून पूर्ण झाली आहे.


0000

Featured post

Lakshvedhi