Saturday, 25 February 2023

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

 चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी1 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे 250 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष 2022- 2023 मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक 4 मधील 14 सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी 1 मार्च 2023 पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            सन 2022-2023 मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत 4 था मजला, चेंबुर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक 116, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे 1 मार्च 2023 पर्यंत होईल.


            प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी


विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी : विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन 2022-2023 मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा.


वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यककागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


 

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

 महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 25 : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ‘सशक्ती डिजिटल व्हॅनचा’ शुभारंभ करण्यात आला. 

            मास्टरकार्ड अॅण्ड लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे 7 हजार 500 महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

            मंत्री श्री. लोढा यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

            याप्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई, सीएससी महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक धवल जाधव, माजी नगरसेवक अभिजित सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद दुबे, सशक्ती टीमचे चंद्रकांत अहिरे, सनम शेख आदी उपस्थित होते.


 

राज्य शासनाच्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता

 राज्य शासनाच्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिताविविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविणार


विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

               मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी विभाग स्तरावर आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात विभाग स्तरावर होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर जानेवारी महिन्यात विभाग आणि राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.


            महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी क्रीडा धोरण राबविण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी राबविण्याची मागणी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्याकडून महसूलमंत्री यांच्याकडे करण्यात येत होती. या अनुषंगाने, राज्याचे क्रीडा धोरण तसेच अधिकारी, कर्मचारी, संघटनांच्या सूचनांचा विचार करत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय तथा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात महसूल विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख या उपविभागांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक आज महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विविध महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनांची गेल्या अनेक वर्षांची मागणी महसूल मंत्री श्री.विखे - पाटील यांच्याकडून पूर्ण झाली आहे.


0000

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’

 औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी

सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना केली जारी

            मुंबई, दि. 24 : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.


             औरंगाबाद" या शहराचे नाव बदलून ते "छत्रपती संभाजीनगर" असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, " औरंगाबाद ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर ", तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.


            उस्मानाबाद" या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव" असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद", तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते " धाराशिव ” तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आली आहे.


            औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी त्याबाबतचे पत्र 20 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र सरकारकडे पाठविले होते. त्याला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.


            मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता.


0000000




Friday, 24 February 2023

मराठी भाषा गौरवदिनी 35 पुस्तकांचे प्रकाशन.

 मराठी भाषा गौरवदिनी 35 पुस्तकांचे प्रकाशन.

            मुंबई, दि. 24 : वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या 35 पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी दि. 27 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे.


            महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुस्तक प्रकाशन हे मुख्य उद्दिष्ट असून साहित्य, संस्कृती, कला, इतिहास या विषयांवरील वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङमयीन संशोधनात्मक असे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व दुर्मिळ स्वरूपाचे महत्त्वपूर्ण ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केले जातात. मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने आजमितीपर्यन्त 647 ग्रंथ प्रकाशित केले असून, मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे.


            यावर्षीदेखील अत्यंत मौलिक अशा या 35 ग्रंथांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय दुर्मिळ झालेला 'श्रीज्ञानेश्वरदर्शन (भाग पहिला) दर्शन प्रवेश व साहित्य खंड व 'श्रीज्ञानेश्वरदर्शन' (भाग दुसरा) अध्यात्म खंड व शास्त्रीयादि विषय हा दोन खंडातील ग्रंथ 88 नंतर मंडळाकडून पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे. संत साहित्याच्या अभ्यासातील दीपस्तंभ ठरलेल्या प्रस्तुत ग्रंथाने संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचे त्यांच्या समग्र वाङ्मय चौफेर म्हणावे असे अपूर्व दर्शन घडविले आहे.


            याबरोबरच श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पाचे संपादन डॉ. विश्वास पाटील यांनी केले आहे. सदर प्रकल्पातील 'श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड 1 गीता सत्त्वबोध: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग व श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड 2 पातंजल योग दर्शन व ब्रह्मसूत्र शांकरभाष्य विवेचन (चार अध्याय)' हे दोन खंड मंडळाकडून प्रकाशित करण्यात येत आहेत. या ग्रंथांच्या निमित्ताने श्री बाळकोबा भावे यांची ग्रंथसंपदा एकत्रित स्वरुपात वाचकांसमोर येत आहे.  


            आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे आणि त्यांच्या कवितांचे अंतरंग समीक्षकाच्या निकोप दृष्टीने उलगडून दाखविण्याचे काम थोर समीक्षक व. दि. कुलकर्णी लिखित 'केशवसुतांचे अंतरंग' या पुस्तकात केले असून सदर ग्रंथ मंडळाच्यावतीने वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. निसर्ग आणि पर्यावरणविषयक पारिभाषिक संज्ञा-संकल्पनांचे संकलन आणि विश्लेषण करणारा 'पर्यावरणाच्या परिघात निसर्ग-पर्यावरणाच्या संज्ञा-संकल्पनांचा परिचय आणि विश्लेषण हा ग्रंथ वर्षा गजेंद्रगडकर यांनी लिहिला असून तो मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित होत आहे. महानुभावांच्या साहित्यातील गुप्त लिप्यांमध्ये लिहिलेले ग्रंथ मराठी भाषेच्या इतिहासातील मौलिक ठेवा आहेत.


महानुभावांच्या तीन सांकेतिक लिप्यांच्या समृद्ध वारशाचा परिचय मराठीजनांना करुन देणारा प्रकल्प मंडळाने राबविला असून या प्रकल्पांतर्गत विनायक त्र्यंबक पाटील यांनी लिप्यंतर केलेल्या 'महानुभाव सांकेतिक वज्र लिपी (पोथींसह लिप्यंतर) व महानुभाव सांकेतिक कवीश्वरी लिपी (पोथीसह लिप्यंतर) या दोन ग्रंथांचा समावेश मंडळाकडून प्रकाशित होत असलेल्या सदर 35 ग्रंथामध्ये आहे. यासोबतच होळकरशाहीचा समग्र इतिहास अकरा खंडातून प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पातील पहिले पाच खंड यापूर्वीच मंडळाकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे संपादन डॉ. देवीदास पोटे यांनी केले असून सदर प्रकल्पातील पुढील खंड सहा ते खंड दहा हे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत आहेत. होळकर राजघराण्याच्या हकीकतीसंबंधीचा इ.स. 1693 ते इ.स. 1886 पर्यंतचा इतिहास असलेला 'होळकरांची कैफियत (खंड 6) हा ग्रंथ. तसेच होळकर रियासतीच्या संपन्न आणि बहुआयामी सांस्कृतिक परंपरेचा सर्वांगीण वेध घेणारा 'होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास' (खंड 7) हा ग्रंथ, तसेच मध्य भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची गौरवगाथा विविध मान्यवरांच्या लेखणीतून मांडणारा, अखिल मानवजातीला सतत प्रेरणा देणारा ‘अहिल्याबाई होळकर गौरवगाथा लोकमातेची’ (खंड 8) हा ग्रंथ होळकरशाहीतील सुभेदार मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर व यशवंतराव होळकर या तीन प्रमुख राज्यकत्यांच्या चरित्र आणि कर्तृत्वाचा वेध घेणाच्या काव्याचा होळकर रियासत काव्यायान (खंड 9) हा संकलनात्मक ग्रंथ, इंदूरच्या होळकर राज्याचे संस्थापक व मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेले शूरवीर मल्हाररावांचे सुभेदार थोरले मल्हारराव होळकर' (खंड 10) हे चरित्रपर पुस्तक असे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित होत असून इतिहासाच्या अभ्यासकांना व वाचकांना ते उपयुक्त आणि प्रेरणादायी आहेत.


            गौतमीमाहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास' हा त्रिखंडात्मक प्रकल्प मंडळाच्यावतीने राबविण्यात आला असून सदर प्रकल्पातील डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी संपादित केलेला गौतमीमाहात्म्य' हा पहिला भाग मंडळ प्रकाशित करीत आहे. 'ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ श्री. इब्राहिम अफगाण यांनी लिहिला असून सदर ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे. ललित लेखनकलेत समाविष्ट असलेले, संशोधन झालेले आणि प्राचीन ते आधुनिक दृष्टीकोनांचा, साधनांचा अंतर्भाव असलेली समस्त साधने मराठीतील लेखक तसेच अभ्यासकांना एका ग्रंथाद्वारे उपलब्ध करण्याची गरज या ग्रंथाद्वारे पूर्णत्वास जात आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रकाशित झालेले व सध्या अतिशय दुर्मिळ असलेले 'दुर्मिळ चरित्रे खंड 1 संपतराव गायकवाड', 'केशवराव देशपांडे, रामचंद्रराव माने पाटील, दुर्मिळ चरित्रे खंड 2' विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-1 व दुर्मिळ चरित्रे खंड 2 विश्वनाथ नारायण मंडलिक भाग-2 हे प्रा. राजेंद्र मगर यांनी संपादित केलेले ग्रंथ याबरोबरच श्री. यमाजी मालकर यांनी संपादित केलेले 'दानशूर महाराजा सयाजीराव' व 'महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र' हे ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित होत आहेत.


             डॉ. वसु भारद्वाज यांनी संपादित केलेले पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड 1’, ‘तत्त्वज्ञान आणि नीती खंड 2’, व ‘नीतीतत्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड 3’, है तीन खंड प्रकाशित करण्यात येत असून या तीनच्या माध्यमातून केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानाचा परामर्श घेतला गेला आहे. या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या निमित्ताने अभ्यासकासाठी एक मोठा संदर्भवन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रमालेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे चरित्र मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. तसेच ‘कृषी संवादक महात्मा फुले’ हे पुस्तकही मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान म्हणजे आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे जीवनचरित्र श्री. आसराम कसबे यांनी लिहिले असून मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार' योजनेअंतर्गत ते प्रकाशित होत आहे. याबरोबर इब्राहीम अफगाण लिखित हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारे, त्यांचे कार्य व योगदान मांडणारे 'महाराष्ट्राचे शिल्पकार हुतात्मा वीर माई कोतवाल हे चरित्रपर पुस्तक मंडळ प्रकाशित करीत आहे. या चरित्रपर पुस्तकांच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड दडलेल्या प्रेरणादायी इतिहासाचे सुवर्णपान वाचकांपर्यंत पोहोचत आहे.


            याबरोबरच यावर्षीचा विंदा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना प्रदान केला जाणार आहे असे ज्येष्ठ लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी लिहिलेले लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा गाणारे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव हे चरित्रपर पुस्तक मंडळाकडून पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. याबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेला गणित तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा ‘गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय' हा ग्रंथ, विज्ञान आणि काव्य यांचे संकल्पन मांडणारा, काव्याचे स्वरुप, महत्त्व व कार्य काय आहे, याची चर्चा करणारा 'काव्ये आणि विज्ञाने' हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून मंडळ प्रकाशित करीत आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची व कार्याची ओळख करून देणारा ‘यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व' हा त्यांच्यावरील स्मृतिग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.


            संगीत विषयाची मौलिक माहिती देणारा 'संगीत आणि कल्पकता’ हा ग्रंथ, देकार्तची ज्ञानमीमांसा व तत्त्वज्ञानाच्या स्वरुपातील विचार मांडणारा 'देकार्तची चितने' हा ग्रंथ पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. याबरोबरच ‘लैंगिक नीती आणि समाज' व सातारचे प्रतिसरकार स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती या पुनर्मुद्रित प्रथाचे प्रकाशन देखील मराठी भाषा गौरव दिनी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.


000






राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न

 राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत स्वारातीम विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कमल किशोर कदम डि.लीट.ने सन्मानित.

          मुंबई, दि. 24 : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत विद्यापीठ परिसर येथे संपन्न झाला.


          दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांना डि.लीट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.


            कार्यक्रमाला होमी भाभा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती तसेच राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


            डी.लिट. पदवी मिळाल्याबद्दल नितीन गडकरी व कमलकिशोर कदम यांचे अभिनंदन करताना यंदापासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यापीठांना गतकाळातील नालंदा, तक्षशिला विद्यापीठांप्रमाणे पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


            स्नातकांनी आपल्या देशातील भाषा, संस्कृती व परंपरा यांच्या सोबतच इतर देशांच्या भाषा व संस्कृतीचे अध्ययन करावे तसेच तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणासोबत परीक्षा व मूल्यमापन पद्धतीमध्ये देखील बदल व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.  


            हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ, जलसंधारण, वृक्षारोपण आदी उपक्रमांच्या माध्यमातून स्वारातीम देत असलेल्या योगदानाबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना देशाला ज्ञानाधिष्ठित जागतिक महासत्ता बनविण्याची सर्वाधिक मोठी जबाबदारी विद्यापीठांवर असल्याचे राज्यपालांनी सांगितले. पेटंट मिळविण्याच्या दृष्टीने केलेल्या संशोधनामुळे स्वारातीम हे देशातील महत्वाचे विद्यापीठ ठरले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठ केवळ पदव्या प्रदान करणारी संस्था नसून समाज व राष्ट्र निर्मितीकरिता जबाबदार नागरिक निर्माण करणारी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणाचा लाभ शिक्षणापासून वंचित लोकांना तसेच महिलांना होऊ शकतो असे सांगताना त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पुरस्कार केला.


            "गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल" - नितीन गडकरी


             नवसृजन, उद्यमशीलता यांच्या माध्यमातून ज्ञानाचे रूपांतरण आर्थिक संपदेमध्ये झाले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. ज्ञानासोबत विनम्रता व शालीनता आली पाहिजे हे सांगताना त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन व उद्योगपती रतन टाटा यांच्या विनम्र स्वभावाचे उदाहरण दिले. उत्तम समाज निर्मितीसाठी नीतिमूल्ये आवश्यक आहे असे सांगताना स्नातकांनी प्रतिकूल विचारांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जलसुरक्षेसाठी जलसंवर्धन तसेच समुद्रात जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 'अन्नदाता शेतकरी' हा ऊर्जादाता झाला पाहिजे असे सांगून गरजेनुसार संशोधन झाल्यास सामाजिक परिवर्तन घडेल असे त्यांनी सांगितले. युवकांनी रोजगारामागे न लागत संपदा निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे त्यांनी सांगितले.


डॉ अनिल काकोडकर


            विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावणे, सामाजिक व आर्थिक समस्यापूर्ती करणे तसेच समाजातील विषमता दूर करणे अशा तीन स्तरांवर मानव सक्षमीकरणाचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले. देशाची गणना पुढारलेल्या देशांमध्ये व्हावी यासाठी दरडोई उत्पन्न वाढवावे लागेल व त्यासाठी उद्योजकतेला चालना तसेच ग्रामीण भागात शेतीबरोबर नवीन संधी निर्माण कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले. 


            यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.


००००


 


25th Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University


 


Governor confers Honorary D.Litt. on Nitin Gadkari & Kamalkishor Kadam


      Mumbai 24 :Governor and Chancellor of state universities Ramesh Bais presided over the 25th Annual Convocation of the Swami Ramanand Teerth Marathwada University (SRTMU), Nanded through online mode.


      The degree of Honorary Doctor of Letters (D.Litt.) was conferred on Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari and former Maharashtra Education Minister Kamalkishor Kadam.


      Chancellor of the Homi Bhabha National Institute and Chairman of Rajiv Gandhi Science and Technology Commission Dr. Anil Kakodkar delivered the Convocation address through online mode.


      Dr. Udhav Bhosle, Vice Chancellor of SRTMU, Dr. Jogendrasingh Bisen, Pro Vice Chancellor, Dr. Sarjerao Shinde, Registrar, Dr. Digambar Netke, Director of Board of Examinations and Evaluation, Deans of various faculties, teachers and graduating students were present.


०००



राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ सुरु करणार

 राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ सुरु करणार

                                   - पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

             मुंबई, दि. 24 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकर भक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


        भगूरमधील ‘सावरकर वाडा’ येथे पर्यटन विभागामार्फत आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 'स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 9.00 ते 10.30 दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार                                आदीवीर सावरकर पर्यटन सर्कीट’


         देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’मध्ये सावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक, रत्नागिरी, पुणे आणि सांगली येथील ठिकाणे आहेत. यामध्ये सावरकरांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभुजा देवी मंदिर, नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, तीळभांडेश्वर गल्ली, डेक्कन येथील सावरकर अध्यासन केंद्र, पहिली विदेशी कपड्यांची होळी, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली तसेच डॉ.हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली ते ठिकाण, गुरव समाजाचे मारूती मंदिर, रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, दादर येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक,सांगली येथील बाबाराव सावरकर स्मारक या ठिकाणांचा समावेश आहे.


थीम पार्क


           भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.



Featured post

Lakshvedhi