Friday, 24 February 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीसुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीसुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू.

            मुंबई, दि. २३ : राज्यसेवा मुख्य परीक्षा ही सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णनात्मक स्वरुपात सन २०२३ पासून लागू करण्याबाबतचा निर्णय आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आला होता.


             परंतु ही परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्याची उमेदवारांची मागणी व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी उमेदवारांनी केलेली मागणी, या बाबी विचारात घेऊन फेरविचारांती सुधारित परीक्षा योजना व नवीन अभ्यासक्रम वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करणार

 राज कपूर, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह

विशेष योगदान पुरस्काराची रक्कम दुप्पट करणार


— सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

            मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.


            यापूर्वी राज कपूर जीवनगौरव आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी 3 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते, आता या पुरस्काराचे स्वरुप 6 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच 2020, 2021 आणि 2022 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी दिली.


            राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक आज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक मधुर भांडारकर, राजदत्तजी, चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी उपस्थित होते.



राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

 राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान


पद्मश्री दर्शना झवेरी यांचा ‘अकादमी रत्न सदस्यता’ ने सन्मा


महाराष्ट्रातील 12 कलावंतांना पुरस्कार.

            नवी दिल्ली, 23 : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंताना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 12 कलावंतांचा समावेश आहे.


            पद्मश्री दर्शना झवेरी यांना मणिपूरी या नृत्यातील विशेष योगदानासाठी ‘अकादमी रत्न सदस्यता’ या संगीत अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            यासह राज्यातून नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील त्यांच्या सर्वंकष योगदानासाठी गौरविण्यात आले. त्यांच्यासह लोक संगीतकार पांडुरंग घोटकर, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, नाट्य अभिनेते प्रशांत दामले, कथक नृत्यांगना शमा भाटे, दिग्दर्शक कुमार सोहोनी, कळसूत्रीकार मीना नाईक, सुगम संगीत गायक अनूप जलोटा, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, ओडिसी नर्तक रबिंद्र कुमार अतिबुद्धि आणि समकालीन नर्तक भुषण लकंद्री यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आज गौरविण्यात आले.


            येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.


            आजच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सन 2019, सन 2020 आणि सन 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले असून एकूण 128 कलावंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात विविध कला क्षेत्रातील 50 महिलांचा समावेश आहे. अकादमी रत्न सदस्यता पुरस्काराचे स्वरूप 3 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे. तर साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.


            वर्ष 2019 साठी महाराष्ट्रातील दिग्दर्शन क्षेत्रात योगदान देणारे कुमार सोहोनी यांना त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर श्री सोहोनी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्ष झाली असून याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणे हा यथोचित सन्मान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.


            लोक संगीत क्षेत्रात योगदान देणारे पांडुरंग घोटकर यांना त्यांच्या योगदानासाठी सन 2019 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            सन 2019 साठीचे सतारमेकर मजीद गुलाबसाहेब यांना वाद्य निर्मितीच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.


            सन 2020 साठीच्या पुरस्कारांमध्ये नंदकिशोर कपोते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वंकष योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


            हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना सन 2020 च्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


            सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्तीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत श्री. दामले म्हणाले, मराठी नाटकात काम करण्याचा प्रचंड अभिमान आहे. नाटक हे टिम वर्क असून माझ्यासह निर्माते, सहकलाकार, कुटुंबाचे सदस्य, रसिक प्रेक्षक ते महाराष्ट्रातील, भारतातील वा संपूर्ण जगभरात पसरलेले मराठी नाट्य प्रेमी यांचाही या पुरस्कारात तितकाचा वाटा आहे. आज हा मिळालेला पुरस्कार या सर्वांच्यावतीने मी घेत असल्याचे ते म्हणाले. सोबतच तरूण पिढीला आवाहन करत म्हणाले, चांगल्या कामाचा आनंद आणि पैसे दोन्ही मराठी नाटक देते.


            सन 2020 साठी अभिनेत्री, दिग्दर्शिका कळसुत्रीकार मीना नाईक यांना कळसुत्रीच्या माध्यमातून समाज जागृती तसेच वैविध्यपूर्ण विषयांवर नाटक बसविण्याच्या उल्लेखनीय योगदानासाठी आज संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांच्या कामाचा सन्मान करण्यात आला.


            सुगम संगीतातील ख्यातनाम गायक अनूप जलोटा यांना संगीत क्षेत्रातील अन्य प्रमुख परंपरा अंतर्गत येणाऱ्या सुगम संगीतासाठी संगीत नाटक अकादमीचा मानाचा सन 2020 साठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


            ओडिसी नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी सन 2020 चा पुरस्कार मुंबईतील रबिंद्र कुमार अतिबुद्ध‍ि यांना प्रदान करण्यात आला. तसेच अहमदनगरचे भूषण लकंद्री यांना समकालीन नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            वर्ष 2021 साठी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शमा भाटे यांना नृत्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.


००००

Thursday, 23 February 2023

मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा.

 मुंबईत शनिवारी रोजगार मेळावा.

            मुंबई, दि. 23 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होईल.


            या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट संस्था व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध समाज घटकांकरीता राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, अभियंते अशा विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.


००००

जय शिवाजी

 


राज्यातील ५० अनाथ मुलांचेस्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व

 राज्यातील ५० अनाथ मुलांचेस्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 23 : काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या राज्यातील बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी स्वनाथ फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे राज्यातील ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभाग आणि स्वनाथ फाउंडेशन यांच्यात ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेण्याबाबत सामंजस्य करार झाला त्यावेळी महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, महिला व बालविकास कोकण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, मुंबई येथील स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय उपस्थित होते.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले, बालसुधारगृह अथवा महिलासुधारगृहामध्ये जी मुले - मुली राहतात ती १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राहण्याचा प्रश्न उभा राहतो. यासाठी प्रतिपालकत्व घेण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन ने शासनासोबत येवून ५० मुलांचे प्रतिपालकत्व घेण्याचा निर्णय स्तुत्य आहे. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले.


प्रतिपालकत्व घेण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे


 - महिला व बालविकास आयुक्त आर.विमला


            महिला व बालविकास आयुक्त आर.विमला म्हणाल्या की, राज्यातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना दत्तक दिले जाते तसेच प्रतिपालकत्व देखील दिले जाते. यामध्ये या बालकांना घरी आणून त्यांना घरचे सुरक्षित वातावरण मिळावे व प्रेम मिळावे त्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्ययुक्त गरजा पूर्ण करून सक्षम बनविण्यासाठी मदत मिळू शकते.                               


दत्तक न घेतलेल्या मुलांचे प्रतिपालकत्व संस्था घेणार : श्रेया भारतीय


            स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय म्हणाल्या, जी मुले ६ ते १८ वर्षांची आहेत आणि काही कारणास्तव दत्तक नाहीत, अशी बालसुधारगृह अथवा महिला सुधारगृहामधील मुलांचे संस्था प्रतिपालकत्व घेणार आहे. या मुलांचे बालपण सुखकर जावे, अनाथमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आमची संस्था काम करत आहे. महिला व बालविकास विभागाच्या मदतीने आम्हाला या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे.


*******

जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

 जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनामिशन मोड' वर राबवाव्यात


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            अहमदगनर/शिर्डी, दि.23 फेब्रुवारी (उमाका वृत्तसेवा) - नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद व पारदर्शी करण्यात यावे. जलयुक्त शिवार, घरकुल व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणींना प्राधान्य देत त्या 'मिशन मोड' वर राबवाव्यात. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.


            राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सध्या राज्यातील शेती क्षेत्राला ८ हजार मेगावॅट वीज लागते. सौर कृषी वाहिनी योजनेमुळे ४ हजार मेगावॅट वीज निर्माण होणार आहे‌. यामुळे शेतकऱ्यांना सलग १२ तास वीज देणे शक्य होणार असल्याने ही योजना 'मिशन मोड' वर राबवावी. महसूल व गृह या दोन विभागांच्या कामकाजावर राज्य शासनाचे मूल्यमापन होत असते. बहुतेक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामात जमीन मोजणीसाठी 'रोव्हर' तंत्रज्ञानाचा उल्लेख होतो. तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आमुलाग्र बदल होतो. तंत्रज्ञानाची कास धरत जग एका परिवर्तनाकडे वाटचाल करत आहे. तंत्रज्ञान व्यक्तीनिरपेक्ष काम करत असते. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेतून काम करावे.


            'जलयुक्त शिवार' या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील २८ हजार गावांमध्ये या योजनेमुळे परिवर्तन झाले आहे. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाचे कामही महसूल विभागाने 'मिशन मोड'वर केले. म्हणून अशक्य वाटणारा हा महामार्ग प्रत्यक्षात कमी कालावधीत साकार होत आहे. येत्या काळात आपल्याला जगाशी स्पर्धा करायची आहे. त्यासाठी राज्यात उद्योग आले पाहिजेत. उद्योगांना लागणाऱ्या जमीनीची 'एनए' प्रक्रिया सहज व सुलभ झाली पाहिजे. त्यादृष्टीने काम करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.


            'ई-मोजणी' या नवीन ऑनलाइन प्रणालीचे कौतूक करत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ई-मोजणीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येत्या काळात महसुली सुनावणीचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत येईल.शहरालगतच्या जमीन मोजणीत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांची दखल घेत ते राज्यपातळीवर पथदर्शी प्रकल्प स्वरूपात राबवावे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


            महसूल विभागाचे प्रलंबित विषय प्राधान्याने निकाली काढण्यात येतील. वाहन खरेदी मर्यादा व नियमात नजीकच्या काळात सुधारणा करण्यात येतील. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आश्वस्त केले.


महसूल विभाग सक्षमीकरणाचा मानस – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध विकासकामांना अधिक गती मिळत आहे. महसूल परिषदेच्या माध्यमातून राज्यासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या विषयांवर चर्चा झाली. येत्या काळात एकाच क्लिकवर विविध दाखले उपलब्ध करून देण्याच्या सुविधा निर्माण करण्यात येईल. महसूल दैनंदिनी डॅशबोर्डच्या माध्यमातून गौण खनिज व इतर दैनंदिन अद्यावत माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था उभारण्यात येईल. रोव्हर तंत्रज्ञानाने ई-मोजणी तत्काळ उपलब्ध करून दिली जाईल. राजस्व अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येईल‌. ई-चावडी प्रकल्प राबविण्यात येईल‌. सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होईल. यासाठी सुटसुटीत वाळू धोरण आणण्यात येईल. 15 लाखांच्या सिमित मर्यादेत राज्यात एक हजार तलाठी कार्यालय उभारण्यात येतील. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा मानस महसूलमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.


            तत्पूर्वी, राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी 'ई-मोजणी' ऑनलाइन प्रक्रियेचे सादरीकरण केले. या राज्यस्तरीय महसूल परिषदेस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.


****



 

Featured post

Lakshvedhi