Wednesday, 22 February 2023

महसूल विभागाचे बळकटीकरण करणार

 महसूल विभागाचे बळकटीकरण करणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन

            शिर्डी, दि. 22 : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मागील सहा महिन्यांत जनतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयात महसूल विभागाचे सर्वाधिक निर्णय आहेत. शासनाचे निर्णय राज्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. राज्याच्या उत्पन्नाच्या २५ टक्के महसूल हा या विभागाचा असतो. महाराजस्व मोहीम, ई-प्रॉपर्टी कार्ड, ४ लाख फेरफार नोंदी ऑनलाईन करणे, ड्रोन द्वारे जमिनीची मोजणी, जिल्ह्याचे नकाशे डिजिटल करणे असे सर्वसामान्यांच्या हिताचे अत्याधुनिक प्रकल्प महसूल विभाग राबवित आहे.


            गावठाण जमाबंदी प्रकल्प देशात प्रथम महाराष्ट्रात राबविला जात आहे. देशात महाराष्ट्राचा महसूल विभाग प्रथम क्रमांकावर आहे. राज्याच्या वाळू धोरणात अधिक सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता आहे. गाळमुक्त धरण, गाळमुक्त नदी ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. यावर या महसूल परिषदेत निश्चितच चर्चा होईल‌, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेशी थेट संवाद साधतात. याचा आदर्श महसूल अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. महसूल कारभार पारदर्शी व गतिमान होण्यासाठी जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला हा घटक केंद्रबिंदू ठेवत थेट संवादावर भर दिला पाहिजे. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही विकासाची दोन चाके समान वेगाने धावली तरच राज्याच्या विकासाला गती मिळेल. राज्याच्या विकासासाठीच्या अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करत आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


निळवंडे प्रकल्पास ५ हजार, १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता


            अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता तसेच महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास ५ हजार, १७७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील ६८ हजार, ८७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. शासनाने आतापर्यंत अशाप्रकारच्या २२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


एका क्लिकवर सर्वसामान्यांना अनेक महसूली सुविधा देणार - महसूलमंत्री श्री. विखे पाटील


            महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, महसूल विभाग लोकाभिमुख काम करत आहे‌. सलोखा योजना , महाराजस्व अभियान, डिजिटल मॅपींग, ई-प्रॉपर्टी कॉर्ड हे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाकडून ५५ हजार कोटींचा महसूल राज्याला मिळतो. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्वसामान्यांना एका क्लिकवर अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल. महसूल विभागाच्या वतीने राज्यातील जनतेसाठी हितकारक ठरावेत,असे धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही महसूल परिषद लोणी येथे आयोजित करण्यात आली असल्याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने करण्यात आली.त्यानंतर 'ई-चावडी' संकेतस्थळाचे लोकार्पण व ' ई-पीक पाहणी संख्यात्मक अहवाल' व 'महसूल, वन विभागाचे लेखाविषयक शासन परिपत्रके' या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


            या राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या उद्घाटन समारंभास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.


पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्तत

 पुणे येथील ‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विजय जोशी नियुक्तत 

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) या पुणे येथील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर अपर जिल्हाधिकारी विजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नागरी सेवा मंडळाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नतीने शिफारस केलेल्या इतरही बदल्या पुढील प्रमाणे आहेत :-


            डॉ.राणी ताटे-नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (करमणूक), अनिल खंडागळे- अमरावती येथील विभागीय लोकसेवा हक्क आयोग येथे उप सचिव, रविकांत कटकधोंड- मुंबई शहर अपर जिल्हाधिकारी, संजीव जाधव- अपर जिल्हाधिकारी, अकोला, देवदत्त केकाणे- अपर जिल्हाधिकारी, धुळे, अनिल खंडागळे- विभागीय लोकसेवा हक्क आयोग, अमरावती येथे उप सचिव


-----०-----


बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स,हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी.

 बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स,हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी.

            मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅराहॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअरच्या विनापरवाना उड्डाणाला १४ मार्च पर्यंत बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी जारी केले आहेत.


            संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात अशा घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १४ मार्च २०२३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपआयुक्त(अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.


            हा आदेश १४ मार्च २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती दंडास पात्र असेल.


0000

ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता ----

 ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता

----

१८२ गावांना सिंचनाचा लाभ

            अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.


            प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ किलोमीटर लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ किलोमीटर आहे. या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल.



गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा.

 गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा.

            गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


             याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता.


            अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.


            हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

कला का री







 

जिवन गाणे










 

Featured post

Lakshvedhi