Friday, 17 February 2023

सखुचा मेहुणा

 हे गाणे ज्यांनी गायले आहे ते *श्रावण यशवंते* काळाचौकी मधील आंबेवाडी येथे राहायचे आता तेथे त्यांचे कुटुंबीय राहातात 

येथील काळाचौकी पोलीस स्टेशन चौकाला श्रावण यशवंते चौक असे नांव दिलेले आहे


.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजना ; १५ मार्चपर्यंत अर्जाची मुदत

 धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी

स्वयम् योजना ; १५ मार्चपर्यंत अर्जाची मुदत

            मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.


            सदर अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर, (पूर्व) येथे १५ मार्च २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

उद्योजक, व्यापाऱ्याना काहीही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही




 उद्योजक, व्यापाऱ्याना काहीही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंतयांच्या हस्ते भव्य उद्घाटन


एक्स्पोला नागरिकांची प्रचंड गर्दी, देशभरातून व्यापारी, उद्योजकांचा सहभाग.

                मुंबई : उद्योजक, व्यापारीस्नेही सरकार आहे. त्यांच्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही. उद्योगाला काय हवे आहे, हे सरकारला माहिती आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री अॅग्रीकल्चरने राज्याच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे. भविष्यातही महाराष्ट्र चेंबरचे सहकार्य राहणारच आहे. त्यामुळे काळजी करु नका, उद्योग, व्यापाराला लागणाया सर्व सुविधा देऊन येत्या काही दिवसांत महाराष्ट्र एक क्रमांकांचे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासातील पूर्वीचे सर्व अडथळे दूर केले जात आहेत. यापुढे `बुलेट ट्रेन` सारखा गतीने राज्याच्या विकासाची घौडदौड सुरु राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.


                राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने १७ फेब्रुवारीपासून ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चा भव्य शानदार शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी झाला. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. येत्या २६ फेब्रुवारी पर्यंत हा एक्स्पो सुरु राहणार असून त्याची सकाळी ११ ते रात्री ९ अशी वेळ राहणार आहे.


                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरचे चीफ पेट्रन कांतीलाल चोपडा यांचा सत्कार झाला. एसबीआयचे उपव्यवस्थाकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख, रवींद्र माणगावे, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.


                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण आहे. आमचे सरकार हे सामान्य नागरिकांचे उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. राज्य शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योगांनी येथे यावे व गुंतवणूक करावी. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणूकीत उद्योजकांनी मोठा विश्वास दाखविला आहे. या परिषदेत झालेले सामंजस्य करार केवळ कागदावर राहणार नाहीत. उद्योग, गुंतवणुकदारांना राज्य सरकारतर्फे सर्व सहकार्य दिले जात आहे. राज्य सरकार नेहमीच औद्योगिक विकासासाठी सोबत आहे. पुढील काळातही उद्योगांना लागणारे सर्व सहकार्य राज्य शासन करेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या काळात न झालेले प्रकल्पाची कामे आमच्या सरकारने केले. मुंबई, पुणे, नाशिक पर्यंतच विकास मर्यादित राहणार नाही. मराठवाडा, विदर्भातही सामंजस्य करार केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र विकासाचे ध्येय आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही काम केले जात नाही. राज्यात अजूनही विकासाचे खूप प्रकल्प हाती घेतले आहेत, ते लवकरच मार्गी लागतील.


                महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅगीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. मायटेक्स देशभरातील उद्योजक आणि व्यापार्यांना व्यापारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो भरविले आहे. गेल्या सात महिन्याच्या काळात सध्याच्या सरकारने उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे. नॉन वू्व्हनमधील काही वस्तूंना प्लॉस्टिक बंदी आदेशातून वगळल्याने सुमारे ८ लाख महिलांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा झाला आहे. हा निर्णय घेतल्याबद्ददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आहे. महाराष्ट्र चेंबरने सरकारकडे मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. भविष्यातही चेंबरचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने १ लाख ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. दरम्यान चेंबरच्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना आमंत्रित करण्याची चेंबरची इच्छा चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. या मायटेक्समुळे महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, गेल्या २५ वर्षात उद्योग, व्यापाराचा विकास झालेला नाही, तेवढा विकास आमचे सरकार आल्यानंतर झपाट्याने वाढला. येत्या ऑक्टोबर महिन्यात `मॅग्नेटिक महाराष्ट्र` घेण्याचे नियोजन सुरु आहे.


                महाराष्ट्र चेंबरने सहकार्य केल्यास हा जगातील मेगा इव्हेंट ठरणार आहे. उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. या माध्यमातून उद्योजकांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. उद्योगांना तीस दिवसांत सर्व प्रकारच्या परवानगी दिल्या जात आहेत. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्योगांना भत्ता, सबसिडी वेळेवर मिळत नव्हत्या. आमच्या सरकारने २३०० कोटी रुपयांचा भत्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला. सुमारे २ हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यावर जमा केले. सूक्ष्म, लक्ष्म, मध्यम प्रकल्पांसह मेगा प्रोजेक्टला सर्वच खात्याच्या परवानगी दिली आहे. वेळेत परवानगी दिली नसल्यास संबधित अधिकारी जबाबदार राहणार आहेत. त्यासह उद्योग आयुक्तांना अधिकार दिले आहेत. उद्योगासाठी सरकारकडून रेड कार्पेट दिले जाणार आहे. राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले. महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे एक्स्पोत :


भव्य असलेल्या या एक्स्पोमध्ये आर्टस्, क्राफ्टस्, शॉप, कल्चरची पर्वणी आहे. एक्स्पोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. यामध्ये इंटरनॅशनल, स्टेटस् पॅव्हेलियन, खादी, हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, लाइफस्टाइल, फॅशन, इंटिरिअर, होम युटिलीटी, हाऊसवेअर, पॅकेजड् फुडस्, अँपलायसेन्स, हेल्थ आणि ब्युटी प्रॉडक्ट, गिफ्ट आर्टिकल, स्टेशनरीसह नानाविध प्रकारच्या नमुन्याच्या वस्तूचा खजिना खुला आहे. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजकांचा सहभाग आहे.


केमिकल विरहित भाजीपाला :


महाराष्ट्र चेंबरच्या मुंबईच्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर यांचे `हर घर केमिकल विरहित भाजीपाला` हे ध्येय घेऊन कार्यरत आहेत. या ध्येयानुसार त्यांनी केमिकल विरहित भाजीपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


फोटो ओळी :


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने शुक्रवारी ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चा "भव्य शानदार शुभारंभ" झाला. यावेळी फित कापून उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शेजारी उपस्थितीत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योगमंत्री उदय सामंत, कांतीलाल चोपडा, संदीप भंडारी, आशिष पेडणेकर.

महाराष्ट्रातील 11 कलाकारांना‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

 महाराष्ट्रातील 11 कलाकारांना‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान.

            नवी दिल्ली, 16 : राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील एकूण 11 कलाकारांना याप्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            येथील मेघदूत सभागृहात 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत अमृत युवा कलोत्सव सुरू आहे. यादरम्यान बुधवारी सायंकाळी ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात वर्ष 2019, 2020 आणि 2021 चे तीन वर्षांसाठीचे एकूण 102 युवा कलाकारांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.


            वर्ष 2019 साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे, वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर, संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून श्री व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथम कलाकार आहेत. वर्ष 2020 साठी सारंगी वादनासाठी हर्ष नारायण, हिदुस्थानी वाद्य संगीत सितार वादनासाठी शाकीर खान, कर्नाटक वाद्य संगीत (वायलिन) वादनात उल्लेखनिय कार्यासाठी एल. राम कृष्णन, ओडिसा नृत्यातील त्यांच्या योगदानासाठी स्वप्नकल्पा दास गुप्ता, भरतनाट्यम नृत्यातील योगदानासाठी पवित्र कृष्ण भट्ट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


            वर्ष 2021 साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव, पखवाज वादनाच्या योगदानासाठी पंढरपूरातील ज्ञानेश्वर देशमुख, नृत्यासाठी संगीत श्रेणीतील त्यांच्या योगदानासाठी मुंबईत जन्मलेले अहसान अली, कथक नृत्यातील समग्र योगदासाठी सुनील सुनकारा यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संग्राम भंडारे यांना वारकारी कीर्तन या श्रेणीतील युवा पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र ते पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होऊ शकले नाहीत.


            मूळच्या महाराष्ट्रातील वर्धेच्या गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी या सध्या दिल्लीत स्थायिक असून नाट्य क्षेत्रातील एक सुपरिचित व्यक्तीमत्व आहेत.     


            संगीत, नृत्य, नाटक, पांरपरिक(लोकसंगीत/आदिवासी/ नृत्य/संगीत/नाटक/ बोलक्या बाहुल्या) या श्रेणीतील युवा कलाकारांना कलेच्या योगदानासाठी ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. यासह परफॉर्मिंग आर्ट्स सादर करणाऱ्यांना पुरस्कारांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. पुरस्काराची वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख आणि ताम्रपत्र असे आहे.


००००


 

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

 नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी


            मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.


            तत्पूर्वी श्री. बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.


श्री.रमेश बैस यांचा परिचय


            नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.


संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.


            दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.


            सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.


            सन १९८९ साली श्री बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.


            सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.


            सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.


            सन २००३ साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.


            आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.


            सन २००९ ते २०१४ या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.


            सन २०१९ साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.


            नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.


            महाराष्ट्राला अशा प्रकारचे विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभलेले आहेत.


*****

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वासगुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

 जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वासगुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 17 :- “केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, करूणाकर शेट्टी, आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योजक ही राज्याची ताकद आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित असलेल्या जगभरातील अनेक उद्योजकांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. अनेक उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. या परिषदेत सुमारे एक लाख 37 हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. केवळ सामंजस्य करार न करता त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे. हे करार केवळ मुंबई, पुणे, नाशिक येथे नसून मराठवाडा, विदर्भाच्या दुर्गम भागाला प्रगतीकडे नेणारे आहेत. जमीन वाटप आणि इतर सुविधांची पूर्तता विभागामार्फत केली जात आहे.


            देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा 15 टक्के वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात 20 टक्के आणि परकीय गुंतवणुकीत सुमारे 30 टक्के एवढा वाटा आहे. राज्यात 12 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून 94 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून नव्याने सुमारे दीड लाख रोजगार तयार होणार आहेत. कौशल्य विकास विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहेत, विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमीपूजन होत आहे, त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            समृद्धी महामार्ग हा एक हरित मार्ग आहे. या महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क याठिकाणी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


            राज्यभरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. मिसिंग लिंक कमी करून अंतर कमी केले जात आहेत. प्रवास वेगवान होत आहे. याचा फायदा उद्योगांना होणार आहे. नॅशनल पोर्टस विकसित करण्यासाठी ‘गती शक्ती ‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेसाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये राज्याला दिले आहेत. सहकार क्षेत्रासाठी केंद्राने दहा हजार कोटी रूपयांचा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसह आपल्या सारख्या उद्योजकांचा हातभार लागणार आहे.


            महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना एक चांगले व्यासपीठ मिळते. जगभरातून आलेल्या रिटेलर्स व मोठ्या उत्पादकांना इथे विक्रीची संधी मिळते. आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही ते म्हणाले.


जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे ऑक्टोबरमध्ये आयोजन - उदय सामंत


            उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांना वेळेत इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी देण्यात येत आहे. 2300 कोटी इन्सेन्टिव्ह दिले. आणखी 15 दिवसांत 2000 कोटी इन्सेन्टिव्ह देणार आहे. उद्योगांना त्वरित परवानग्या मिळण्यासाठी मैत्री कायदा लागू केला. 30 दिवसांत उद्योगांना लागणाऱ्या सर्व परवानग्या याद्वारे मिळू लागल्या आहेत. याचे अधिकार उद्योग विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्याने परवानग्या मिळण्यास अडचणी येत नाहीत. उद्योगाला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. यामुळे राज्य शासन जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन (MITEX) हे 17 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर आयोजित करण्यात आले. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन येथे होत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ असेल, अशी माहिती श्री. गांधी यांनी यावेळी दिली.


            या प्रदर्शनात गुजरात, जम्मू - काश्मीर, राजस्थान, गोवा आणि परदेशातील उद्योजक सहभागी झाले आहेत. उत्पादन, वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग, अंतर्गत आणि बाह्य, जीवनशैली, फॅशन, भेटवस्तू, लेखन साधने, प्रवास आणि पर्यटन, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यासारख्या विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या उत्पादनांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत.


००००

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना;नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी

 राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना;नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी.

            मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.


            विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. 


            महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.


०००

Governor Koshyari given Guard of Honour by Navy;


New Governor to take charge on Saturday.

            Mumbai, 17th Feb : Outgoing Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari was given a ceremonial Guard of Honour by the contingent of Indian Navy at Raj Bhavan Mumbai. Chief Secretary Manukumar Shrivastava, DGP Rajnish Seth, Commissioner of Police Vivek Phansalkar, ACS Protocol Manisha Mhaiskar and others were present.


            The Governor proceeded to the Siddhi Vinayak Mandir on the way to the airport. The Governor will proceed to Dehradun later in the day.


            The newly appointed Governor of Maharashtra Ramesh Bais will take charge at 12.40 pm on 18th February.


0000



Featured post

Lakshvedhi