Tuesday, 31 January 2023

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता

 नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता


देशातील पहिला कॅनाल जोड प्रकल्प साकारणार, केंद्राकडेही निधीसाठी प्रस्ताव


माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक निर्णय.

            मुंबई, दि. 31 : नीरा-देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन निश्चित यशस्वी होईल. उर्वरित निधीकरीता केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येईल. यामुळे माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावांना पाणी मिळणार आहे. याबरोबरच फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे 24 हजार 520 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            लोकसभेच्या माढा मतदारसंघातील प्रलंबित उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वपूर्ण आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय करणार आहे.

महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

 महाराष्ट्र मिलेट मिशनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘मिलेट मिशन’ महत्वाचे पाऊल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 31 : राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आज महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री भरत गोगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसोडे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तृणधान्य पूजन आणि तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिलेट मिशनचा प्रारंभ करण्यात आला.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कुटकी ही पीके घेतली जात होती, आजही ती घेण्यात येतात. या पिकांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्ट‍िक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे कऱण्याचा निर्णय घेतला आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


            पिकांमध्ये विविधता आणण्याचे राज्य शासनाचे धोरण असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या पिकांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे हे मोठे वरदान ठरणार आहे. एकप्रकारे हा शेतकऱ्यांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


            या महाराष्ट्र मिलेट मिशनमुळे नवी पिढी जंकफूडकडून पारंपरिक तृणधान्याद्वारे बनविलेल्या पदार्थांकडे निश्चितपणे वळेल. शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला भाव मिळेल. शासनस्तरावरुन या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतही राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. ज्वारीसाठी 73 टक्के, बाजरी साठी 65 टक्के आणि नाचणीसाठी 88 टक्के इतकी ही वाढ असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 


            याशिवाय स्मार्ट या प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने “सेंटर ऑफ एक्सलन्स”ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. धानासाठी हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस, हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी चार सिट्रीस इस्टेटपैकी एक पैठण येथे स्थापन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० आपण राबवित असून इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, या वर्षात व्यापक अशी योजना यासाठी बनवली आहे. पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भरड धान्याला विविध पदार्थात वापर करून याचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येईल, असे ते म्हणाले.


            प्रास्ताविक कृषी सचिव श्री. डवले यांनी केले. यावेळी त्यांनी तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स याठिकाणी लावल्याचे सांगितले.आभार कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी मानले.


शेतकरी मासिक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि


पोस्टरचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे अनावरण


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शेतकरी मासिक पौष्टीक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पोस्टरचे प्रकाशन तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. शेतकरी मासिकात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष -2023 च्या अनुषंगाने राज्यात पिकविण्यात येणाऱ्या मुख्य व लघु पौष्ट‍िक तृणधान्य पिकाच्या लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया, आहारातील महत्व व त्यांचा लोकांच्या आहारात वापर वाढ करण्याच्या अनुषंगाने माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबवावयाच्या विविध योजनांची माहिती पोस्टरमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, कृषी विभागाच्या वतीने राज्यस्तरापासून ते ग्रामपातळीपर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार


            यावेळी शेतीमध्ये पौष्टिक तृणधान्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी आणि कृषि उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सोनू बांगारा (माळ, जि. ठाणे), किसन मोढवे (मर्दी, जि. ठाणे), काकड्या लहांगे (उज्जेनी, जि. पालघर), आनंता धिंडा (सातरोंडे, जि. पालघर), जानू कामडी आणि पद्माकर वाख ((मुसई, जि. ठाणे), तानाजी यादव (गमेवाडी, जि. सातारा), होरुसिंग ठाकरे (बंधारा, जि. नंदुरबार), प्रकाश गायकवाड (पिसाळवाडी, जि. सातारा), बाजीराव चौरे (बाभूळणे, जि. नाशिक), निंगोजी कुंदेकर (शेवाळे, जि. कोल्हापूर), प्रमोद माळी (पिंपरखेड, जि.जळगाव), भामटा पाडवी ((खेडळे, जि.नंदुरबार), तात्यासाहेब फडतरे (समृद्धी ॲग्रो ग्रुप. राहाता, जि. अहमदनगर), महेश लोंढे (ॲग्रोझी ऑरगॅनिक भरडधान्य प्रक्रिया उद्योग, उरळीकांचन, जि. पुणे), शंतनू पाटील (मेलूप फू़डस, सोलापूर), श्रीमती नीलिमा जोरवार (संचालक, कळसूबाई शेतकरी उत्पादक कंपनी, नाशिक), महेंद्र छोरिया (यश इंटरप्रायजेस, नाशिक), प्रसाद औसरकर (शहापूर, जि. ठाणे) आणि बारवी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी (पाटगाव, जि. ठाणे) यांचा समावेश आहे.


विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी


            आजच्या या कार्यक्रमावेळी प्रांगणात ज्वारी, बाजरी, नाचणी यासह विविध तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मंत्रालयातील अधिकारी - कर्मचारी आणि मंत्रालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी या पदार्थांची खरेदी केली.


            समृद्धी ॲग्रो, पुणे, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, नाशिक. एमटीडीसी आणि दादर केटरिंग कॉलेज, सावित्रीबाई फुले आदर्श प्रभाग संघ, नाचणगाव, वर्धा. आदर्श स्वयंसहायता महिला समूह, ताम्हाणे, रत्नागिरी. एव्हीपी फूडस स्टफ, शहापूर. सान्वी कुकीज, ऐरोली. बारवी ॲग्रो, मुरबाड. अग्रणी शेतकरी उत्पादक गट, कवठेमहांकाळ.


            पवित्र अन्न प्रक्रिया गृहउद्योग, भिवंडी. जय भवानी महिला बचत गट, जव्हार. कृषी विभाग ठाणे अधिकारी- कर्मचारी महिला, कृषी विभाग भिवंडी, श्री गणेश महिला बचत गट, कर्जत. श्रीयाज फूडस पनवेल. हिरकणी प्रभाग संघ, आदर्श महिला प्रभाग संघ, पालघर. प्रगती लोकसंचलित साधन केंद्र, शहापूर. सुसी फूडस् रायगड. स्वयंसिद्धा महिला स्वयंसहायता समूह पनवेल. प्रेरणा स्वयंसहायता महिला समूह, खालापूर. रत्नाई महिला समूह, खालापूर, श्री वैभव इंडस्ट्रीज, जळगाव, ओम नमोशिवाय महिला समूह, साक्री, धुळे, मिलूप फूडस, बार्शी. यशस्व‍िनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, बोरामणी, दक्षिण सोलापूर. शिवमुद्रा शेतकरी गट, मांडेदुर्ग, चंदगड, धनदाई महिला बचत गट, रोहा, रायगड आणि अरूणिका फूडस, धुळे यांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात आले होते.

होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

 . होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

            मुंबई, दि. 30 : डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून ई-लर्निंग स्टुडिओचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.


            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विद्यापीठामध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थी अध्ययनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून प्रयत्न करावेत.


             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा यांचे ऋण देशावर आहे. त्यांचे नाव या विद्यापीठाला देऊन महाराष्ट्रातील पहिले अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक अभिमत विद्यापीठाची संकल्पना मांडली असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

 राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर.


            मुंबई, दि. 30 : मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित केल्या आहेत.


            विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. 


            आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोदकुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैदराबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुरेशकुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे मुंबई विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            आयआयटी कानपुरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य असतील.


            मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी सपंल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिगंबर शिर्के यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.  


            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 


००००


Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune Vice Chancellors


       Mumbai, 30th Jan : Maharashtra Governor and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has constituted separate Search Committees for the selection of vice chancellors to the University of Mumbai and the Savitribai Phule Pune University.


       The Search Committee for the selection of Mumbai University vice chancellor will be headed by the former UGC Chairman Dr. D. P. Singh while the Search panel for the selection of the vice chancellor of the Savitribai Phule Pune University will be headed by former AICTE chairman Dr Anil Sahasrabuddhe. 


       Prof. Pramod Kumar Jain, Director, Indian Institute of Technology, (BHU) Varanasi, Anand Limaye, Additional Chief Secretary (Home) and Prof. Suresh Kumar, Vice Chancellor of the English and Foreign Languages University Hyderabad (UGC nominee) will be the members of the Search Committee for the selection of Mumbai University Vice Chancellor.


       Dr. Abhay Karandikar, Director, IIT, Kanpur, Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Irrigation Department and Dr. Meena R. Chandawarkar, Chief Advisor-Quality Assurance, BVV Sangha, Bagalkot and former Vice Chancellor of Karnataka State Women's University Vijaypura (UGC Nominee) have been named as the Members of the Search Committee for the selection of vice chancellor of the Savitribai Phule Pune University.


       The term of MU vice chancellor Suhas Pednekar ended on 10 September. Shivaji University Vice Chancellor Dr. Digambar Shirke has been holding the additional charge of the post of Mumbai Vice Chancellor.


       The term of Vice Chancellor Dr. Nitin Karmalkar ended on 18 May 2022. Dr. Karbhari Kale, Vice Chancellor of the Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere has been holding the additional charge of the post of SPPU Vice Chancellor.


००००

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघद्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे.

            मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दोन पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघाच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


            नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरूवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ ला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक


 नमस्कार.

भवताल मासिकाचा जानेवारी २०२३ चा अंक आणि त्याचे कव्हर सोबत शेअर करत आहोत.


अंकाची वैशिष्ट्ये :

• एकाच साच्यातील विकास

• आदिवासींचा वाघ्या

• अभी पार्टी शुरू हुई है।

• अनोख्या इको-टूरची धमाल

आणि बरेच काही...


सोबत दिलेली लिंक आपल्या संपर्कात शेअर करून इतरांनीही भवताल मासिकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करावे, ही विनंती.


नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/connectus/masik-nondani

- संपादक, भवताल मासिक.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

 शासकीय कामकाज ‘मिशन मोडवर’ राबवावे

                          - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. 31 : “प्रशिक्षणामुळे नवीन ज्ञानप्राप्ती होवून विषयाची उजळणी होते. प्रशिक्षण घेऊन जनतेच्या हितासाठी शासकीय कामकाजाला अधिक गती देऊन ‘मिशन मोडकर’ काम करावे”, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


            डॉ.होमी भाभा राज्य समूह विद्यापीठ मुंबई, येथे नवनियुक्त विभागीय सहसंचालकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, अजित बाविस्कर उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रशिक्षण हे व्यक्तिमत्वाच्या विकासाचे माध्यम असून सक्षम बनविण्याचे साधन आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे अचूक आकलन होण्यासाठी आणि योग्य अवलंबासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. विभागीय सहसंचालक हे पद महाविद्यालय आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून प्रशिक्षण घेऊन शासकीय कामकाजाला अधिक गती द्यावी.


            यावेळी नवनियुक्त विभागीय सहसंचालकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Featured post

Lakshvedhi