Sunday, 29 January 2023

जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

 जुहू येथे रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचा शुभारंभ.

            मुंबई, दि. 28 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 572 नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. 


            मेळाव्यात 43 कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील 9 हजार 161 रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण 304 उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा


            मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात 300 रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.


            मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.


 


००००

लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन

 लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी ''महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती”या चित्ररथास सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन.

        मुंबई, दि. 28 : यंदाच्या वर्षी “ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” हा विषय चित्ररथाव्दारे महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला.


            यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन पिठाचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.


            चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरुन मिळेल तर दूसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाईन मत (वोटिंग) नोंदविल्यानुसार मिळेल. त्यामुळे या लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :


            साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरुन खालीलप्रमाणे मेसेज मंगळवार दि.31.1.2023 च्या रात्री 11.45 वाजेपर्यंत पाठवावा.


            MYGOVPOLL337011,12 हा SMS 7738299899 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.


            MYGOVPOLL (Space) 337011,12


किंवा


(आपणास खालील लिंकवर जावून “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल: https://www.mygov.in/group-pool/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )


            आपण वरीलप्रमाणे Online voting करावे व त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप (WhatsApp Group), फेसबुक (FB), व इतर समाज माध्यमांव्दारे हा संदेश पुढे पाठवावा आणि महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी विनंती करावी.  


0000


 

खेड्यामध्ये घर कौलारू

 एक साधं मातीच्या भिंतींना शेणाने सारवलेलं कौलारू घर , उन्हाळ्यात थंड अन् हिवाळ्यात उबदार , हवेशीर भरपूर उजेड येणारं , मोकळं , पैस , अनावश्यक वस्तूंची दाटी नसलेलं....


दोन चुलींचं स्वयंपाक घर , फळ्यांवर मोजकी पितळेची चकचकीत लहान मोठी भांडी आणि भिंतीला टेकवून ठेवलेल्या धान्याच्या कोठ्या....


स्वयंपाकघराला लागून जवळच एक ताज्या फुलांनी सजवलेलं , नाजूक पितळेच्या समईतील तेजस्वी ज्योतीने प्रकाशित झालेलं , उदाच्या सुगंधाने घर व्यापून टाकलेलं छानसं प्रसन्न देवघर ..


बाजूच्या खोलीत रजया अंथरून ठेवलेल्या दोन खाटा , भिंतींवर दोन चार खुंट्यांवर अडकवलेले मोजके कपडे , खाली कडेला दोन एक लोखंडी पेट्या बस एवढंच


मागे आडाची गोड्या पाण्याची विहीर , तिच्या आजूबाजूला पपई केळीची झाडे , साचलेल्या सांडपाण्यात फोफावलेला हिरव्या गार मोठ्या पानांचा अळू , मागे भरलेली कणसे डोलत असलेलं ज्वारीचं शेत....


घराच्या उजव्या बाजूला दहा फुटावर जनावरांचा कौलारू गोठा , रोज ताजा हिरवागार चारा खाऊन सुधृढ धष्टपुष्ट असलेल्या गायी म्हशींनी व्यापलेला , त्या मागे मोठ्या आंब्याच्या शेकडो झाडांची दाट हिरवीगार आमराई ...


डाव्या बाजूला बैलं मोकळी करून ठेवलेल्या बैल गाड्या , नांगरं आणि शेतीची इतर अवजारं , त्या मागे पेरु ची बाग , घराजवळच मांडवांवर चढवलेली काकड्या , कार्ली , दुधी नी लदबदलेली वेली , परिसरात अधे मधे चिचं , लिंबू , बोरं , आवळा अशा विविध फळांची झाडे...


घरासमोर वाळलेला चारा कौलारू छतावर पसरवलेली प्रशस्त हवेशीर पडवी ज्यात फक्त बसाय उठायला दोन चार खाटां अन् भिंती शेजारी थंडगार पाण्याचा काळया मातीचा माठ ....


बस , हीच काय ती प्रॉपर्टी ...


सकाळी सूर्योदयापूर्वी ताजे तवाने होऊन उठायचं की एका पाठोपाठ एक कामे सुरु...


गोठ्याची स्वच्छता , जनावरांची देखभाल , दूध संकलन झालं की समोरच्या पडवीत बसून नाश्ता...


नाश्ता म्हणजे काय , गूळ शेंगदाणे , ऋतू नुसार चुलीवर भाजलेले सोलाणे , हुरडा , वाटाणे , दही , भरीत , काकडी पेरु , त्यावर चुलीवर ताजं तापवलेल वाडगं भर दूध


सूर्य डोक्यावर येई पर्यंत शेतात किंवा मळ्यात कष्टाचं काम , आल्यावर चुलीवरचं ताजं जेवण कांदा भाकरी भरीत पिठल्याचं , मग थोडी वामकुक्षी की पुन्हा काम , सुर्यास्ताला कामं आटपून पडवीत येऊन निवांत हवेशीर बसायचं , फलाहार करायचा , पुन्हा हलका फेरफटका मारुन येऊन जेवायचं अन् लवकरच झोपायचं ..!


 जीव थकलेला , छान झोप लागते स्वस्थ ..!


सकाळी उठले की पुन्हा रूटीन सुरू...


एवढं सरळ साधं सोपं छान आयुष्य , ताजं स्वतः पिकवलेलं उच्य प्रतीचं पौष्टिक अन्न खाऊन , छान शुद्ध हवेत आरोग्याला पोषक अस हे सुखी जीवन


दगदग , टेन्शन , धावपळ , पळापळ , खाण्या पिण्याची हेळसांड , तब्येतीच्या तक्रारी ह्या पासून दूर...


ते सगळं आपण शहरी लोकांनी ओढवून घेतले आहे विनाकारण आपल्या अंगावर आपल्या नाही त्या गरजा वाढवून


त्या पूर्ण करता करता सुख शांती गमावून बसलो आहोत आपण , तब्येतीची वाट लावून बसलो आहोत आपण ..!


सरळ साधं आयुष्य गुंतागुंतीचं करुन बसलो आहोत आपण


स्पर्धा , अहंकार , क्रोध , द्वेष , मत्सर , हाव ह्या सगळ्यांना हृदयात कायमची जागा देऊन बसलो आहोत आपण


ह्यातून परतीचा सोपा मार्ग एकच , आपल्या गरजा कमी करण्याचा जो गमावून बसलो आहोत आपण...


आयुष्य होतं निवांत जगण्यासाठी जे धकाध


कीचं करून बसलो आहोत आपण....

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे

 परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री.

       मुंबई, दि. 28 : भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


         विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.


         युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश

      जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.


परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक


       उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.


       अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने हे पुस्तक महत्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले. 

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त-डॉ.एस.जयशंकर


           परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.


परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे


         स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.


सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे


            चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.


       चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


       श्री.चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


       डॉ.आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत 630 पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.


       तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


000

सुप्र भा

 


जिन्दगी










 

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान.

 महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान.

        मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


            येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.                   


        यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू ,पुद्दूचेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला. 

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर


        महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.   


 



Featured post

Lakshvedhi