सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 23 January 2023
Sunday, 22 January 2023
मुंबईत 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सोहळ्याचे आयोजन
मुंबई, दि. 22 : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय रांगोळी आणि भित्तिपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.
25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
000
मुंबईत 24 जानेवारी पर्यंत मराठी चित्रपटांचा महोत्सव सर्वांना विनामुल्य प्रवेश
मुंबईत 24 जानेवारी पर्यंत मराठी चित्रपटांचा महोत्सव
सर्वांना विनामुल्य प्रवेश
मुंबई, दि. 22 : जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर व पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार पात्र विजेत्या मराठी चित्रपटांचा महोत्सव दि. 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन दि. 21 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्य विभागचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये फनरल, झिपऱ्या, एक हजाराची नोट, कासव, श्वास, धग, इन्व्हेस्टमेंट, गोष्ट एका पैठणीची हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे. त्याचप्रमाणे मराठी सिनेमा आणि ओटीटी माध्यम यावर एका परिसंवादाचे आयोजन आज, दि. 22 जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे.
या मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रकल्प संचालक संतोष रोकडे व श्रीमती स्नेहल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या मुंबई येथे “ई-गव्हर्नन्स” प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या मुंबई येथे
“ई-गव्हर्नन्स” प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन
मुंबई दि. 22 : केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी)आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, दि. 23 व 24 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे “ई-गव्हर्नन्स” या विषयावर दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचे आयोजन केले आहे. उद्या सोमवार,
दि. 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन होईल. देशभरातील 500 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने उपस्थित राहतील.
परिषदेत 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 500 प्रतिनिधी होणार सहभागी
परिषदेत 20 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 500 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवराच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. तसेच ई-सेवा, डिजिटल व्यासपीठ आणि ई-प्रशासन मॉडेल्स सुधारण्याच्या मार्गांवर प्रतिनिधी करणार चर्चा करणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रादेशिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संबोधित करणार
राज्य सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव, (सामान्य प्रशासन विभाग) सुजाता सौनिक आणि डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवास हे देखील उद्घाटन सत्रात संबोधित करतील. समारोप सत्रात केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेला संबोधित करतील. अतिरिक्त सचिव अमर नाथ आणि सचिव व्ही. श्रीनिवास देखील या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपट
महाराष्ट्र सरकारच्या अभिनव उपक्रमांवर एक माहितीपटही यावेळी दाखविला जाईल. तसेच परिषदेच्या समारोप सत्रात, विशेष मोहीम 2.0 (विशेष आवृत्ती) वरील एमजीएमजी (Minimum Government, Maximum Governance) आणि जीजीडब्ल्यू 2022 पुस्तिकेचे तसेच ई-जर्नलचे प्रकाशनही होईल.
उद्घाटन सत्रादरम्यान, खालील गोष्टी प्रदर्शित केल्या जातील
(i) महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयीन प्रक्रियेच्या नियमावलीचे संक्षिप्त सादरीकरण (Manual of Office Procedure)
(ii) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) च्या वर्ष अखेर आढाव्यावर आधारित चित्रपट
(iii) ई प्रशासन उपक्रमांवर आधारित ई जर्नल एम जी एम जी प्रकाशित केले जाईल.
सुशासन परिसंवाद स्टार्टअपचे पहिले सत्र
“सुशासन परिसंवाद स्टार्टअप” या विषयावर आधारित पहिल्या सत्राचे अध्यक्षपद, कर्नाटक सरकारच्या, कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे मुख्य सचिव, डॉ. श्रीवत्स कृष्णा भूषवतील. पहिल्या सत्रात चार स्टार्ट अप कंपन्या सादरीकरण करतील. महाराष्ट्र सरकारचे सर्व सनदी अधिकारी या सत्रात उपस्थित राहतील. भारतीय लोक प्रशासन संस्था, आयआयपीएचे महासंचालक डॉ. एस.एन. त्रिपाठी "ई-प्रशासन पुरस्कार उपक्रम" या विषयावरील दुसऱ्या सत्राचे, अध्यक्ष असतील. दुपारच्या सत्रांमध्ये (सत्र – तीन), प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव, अमर नाथ, यांच्या अध्यक्षतेखाली ‘ई-प्रशासन पुरस्कार उपक्रम’ या विषयावर सादरीकरणे केली जातील. पुणे येथील यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम, हे ‘महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्तम पद्धती’ या विषयावरील चौथ्या सत्राच्या अध्यक्षपदी असतील.
डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये विषयावर सादरीकरण
दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पाचव्या सत्रात महाराष्ट्राचे भारतीय लोक प्रशासन संस्थेचे निवृत्त आय ए एस अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये’ या विषयावर सादरीकरणे केली जातील. सहाव्या सत्रात ACT चे संदीप सिंघल आणि पपिलफर्स्टचे सह-संस्थापक संजय विजयकुमार, यांच्या अध्यक्षतेखाली "ई-गव्हर्नन्समधील स्टार्ट-अप्स" या विषयावर सादरीकरण केले जाईल.
राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन ‘NeSDA 2021 – पुढील मार्ग’ आठवे सत्र
सहाव्या सत्रात राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यांमधील ई-सेवा वितरण’ या विषयावर सादरीकरणे केली जातील. राष्ट्रीय स्मार्ट सरकार संस्था, 'राष्ट्रीय इ-प्रशासन सेवा प्रदान मूल्यमापन ‘NeSDA 2021 – पुढील मार्ग’ या विषयावरील एन आय एस जी चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.आर.के. राव आठव्या सत्राचे अध्यक्ष असतील. 'डेटा प्राणित तक्रारी' या विषयावरील नवव्या सत्राचे अध्यक्षपद पुणे येथील यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, NeGD/DIC चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग भूषवतील.
ही परिषद म्हणजे प्रशासकीय प्रशिक्षणातील सर्वोत्तम पद्धतींच्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये अंतर्भूत असलेल्या नागरिक केंद्रित प्रशासन सुलभ करण्यासाठी क्षमता वृद्धी, ई-गव्हर्नन्सद्वारे सुधारित सार्वजनिक सेवा वितरण, पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिक- स्नेही प्रभावी प्रशासन यासंदर्भातले अनुभव सामायिक करण्यासाठी एक समान व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न असेल.
000
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक!
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक!
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. 22 : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे.
एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंड या राज्याला मिळाला.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील राजपथावर चित्ररथाचे संचलन होत असते. या संचलनामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. यावर्षी महाराष्ट्राची "साडेतीन शक्तिपीठे" या चित्ररथाचे संचलन होणार आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते.
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये एकूण 15 सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले होते. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या विभागानी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते. कलाकारांचा यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने धनगरी या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण 24 कलाकारांनी भाग घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
000
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
हॅलो मेडीकल फाऊंडेशन उत्कृष्ट स्वयंसेवी संस्था
डॉ. प्रमोद पोतदार, डॉ.उमेश कदम, डॉ. सदानंद राऊत, संदीप आचार्य मानकरी
मुंबई, दि. 22 : सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उस्मानाबाद येथील हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या पुरस्कार बाबतची माहिती देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार आहे. हा कार्यक्रम वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोमवारी दि. 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. आरोग्य सेवा प्रभावीपणे देणे, आरोग्य उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे, लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या उद्देशाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे
स्वयंसेवी संस्था हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.
उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर, डॉ. सदानंद राऊत, पुणे.
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार - संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे.
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी -
धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती.
मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव.
प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली.
किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर.
दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे.
प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमात माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अभियानाचा दुसरा टप्पा आणि बाल सुरक्षा अभियानास सुरुवात केली जाणार आहे.
000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...








