Wednesday, 18 January 2023

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा

 24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा.

               मुंबई, दि.17 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 27 जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छुकांनी 20 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.


            कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षापासून कामगार कबड्डी स्पर्धा होऊ शकली नव्हती. आता कोरोना निर्बंध नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दरवर्षी राज्यभरातून 100 पेक्षा अधिक कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतात. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळवण्यात येतील.


            पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला खुला तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु.50 हजार, उपविजेत्या संघांना रु.35 हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी 2 उपांत्य उपविजेत्या संघांना 20 हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील.


            मुंबई व ठाणे व्यतिरिक्त बाहेरुन येणाऱ्या सर्व संघांना प्रती दिन रु.4000/- प्रवास व निवास भत्ता दिला जाणार आहे. मुंबई व ठाण्यातील महिला संघांना प्रती दिन रु.1000/- भत्ता दिला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या महाकल्याण या यू-ट्यूब चॅनलवर तसेच sportvot.com या क्रीडा संकेतस्थळावर केले जाईल. तरी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी https://public.mlwb.in/public या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहनही श्री. इळवे यांनी केले आहे.


000

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

 दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

            दावोस, १७ :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.


            अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार), ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजुरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्ट‍िम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प (रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरिंग व बडवे इंजिनियरिंगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ऑटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा


            जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत, त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.


------०------



मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा

 मुंबई उपनगरसाठी ५१५ कोटी रूपयांचा प्रारुप आराखडा

- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा.

             मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


                चेतना कॉलेज, बांद्रा पूर्व येथे नियोजन समिती बैठक पार पडली या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्य, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


            पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले, लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती व आदिवासी प्रवर्गासाठी जिल्हा नियोजन आराखड्याच्या शासनाकडून निर्धारित केल्या जाणाऱ्या नियतव्ययामध्ये वाढ करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येईल. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी ४५९.०९ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ५१ कोटी- तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ५.७७ कोटी अशा एकूण ५१५.८६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.


        सन २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नागरी दलित्तेतर वस्त्यांमध्ये सुधारणा, डोंगर उतारावरील तसेच धोकादायक दरडीखाली राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या संरक्षणार्थ संरक्षक भिंती बांधणे, शासनाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्या जागेवर संरक्षक कुंपण तयार करून घेण्याची जिल्हा नियोजनच्या निधीतून वाढीव तरतूद करण्यात येणार असून शासकीय कार्यालयीन इमारती, पोलीस विभाग, उर्जा, शिक्षण, परिवहन, पर्यटन, वने, मस्त्यव्यवसाय, बंदरांचा विकास व प्रवासी सुखसोयी, कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके यांचे संवर्धन इ. विविध योजनांसाठी ७४९.५० कोटी वाढीव निधी मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. तसेच विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.त्यानुसार संबंधित विभागांनी त्याची दखल घ्यावी तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. लोढा यांनी दिले.


प्रशासकीय मान्यता देण्याची गतीने कार्यवाही : जिल्हाधिकारी निधी चौधरी


            मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत हाती घेण्यात आलेली विविध कामे डिसेंबर २०२२ अखेर देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व झालेला खर्च, कामांचा आढावा आणि सन २०२३ - २४ मध्ये राबवावयाच्या विविध योजना, हाती घ्यावयाची वैशिष्ट्यपूर्ण कामे व त्यासाठी प्रस्तावित नियतव्यय याबाबतचे सादरीकरण केले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत मंजूर ८४९ कोटी रूपये मंजूर निधीच्या अनुषंगाने डिसेंबर अखेर ८१६.३० कोटी रकमेच्या (९६ टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून उर्वरित कालावधीत 100 टक्के प्रशासकीय मान्यता व निधी खर्च होण्याच्या दृष्टिने नियोजन केले असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी सांगितले.


*****





जयंती निवृती महाराज


कुस्ती खेळाच्या विकासासाठीजपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार

 कुस्ती खेळाच्या विकासासाठीजपानच्या वाकायामा राज्यासमवेत सामंजस्य करार करणार

- क्रीडा मंत्री गिरीश महाजन.

            मुंबई, दि.१७ : राज्यातील कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पिक सारख्या विविध स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदकांची संख्या वाढविण्यासाठी कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान-प्रदान करण्याबाबत जपानमधील वाकायामा स्टेट व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री. महाजन यांचे शासकीय निवासस्थान सेवासदन येथे जपानच्या वाकायामा स्टेटच्या शिष्टमंडळासोबत प्राथमिक चर्चा करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी श्री.यामाशिता, उपसंचालक, इंटरनॅशनल अफेअर्स डिव्हीजन, वाकायामा स्टेट, जपान हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते.


             राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे विविध उपक्रम, मिळविण्यात आलेल्या पदकांविषयी मंत्री श्री. महाजन यांनी माहिती दिली. तसेच कुस्ती या खेळासंबंधी तंत्रज्ञान आदान - प्रदान करण्याबरोबरच खेळाडूंना प्रशिक्षण देण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे सांगितले. सामंजस्य करार लवकर होण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री श्री. महाजन यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.


000000

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट

 लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा.

            दावोस दि. १७ : लक्झमबर्गचे पंतप्रधान झेव्ह‍िएर बेटेल (Xavier Bettle) आणि राजपुत्र गुलिएम जेन जोसेफ ( Guillaume Jean Joseph) यांनी आज महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्यात चर्चाही झाली.


            महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे छायाचित्र व प्रदर्शन सुरु आहे, तेही त्यांनी आवर्जून पाहिले आणि झपाट्याने बदलत्या मुंबईविषयीची माहिती जाणून घेतली.


सिंगापूरचे मंत्री डेस्मंड ली यांची महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट


            सिंगापूरचे मिनिस्टर ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट डेस्मंड ली यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती त्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे देखील उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांची इंडिया पॅव्हेलियनला भेट


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज संध्याकाळी दावोस येथील इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन चर्चा केली.


००००



 



जिंदगी एम्तीहान लेती है

 


Featured post

Lakshvedhi