सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 5 January 2023
वीज कर्मचाऱ्यांचा संप मागेवीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत नाही.
मुंबई, दि. 4 :- संपकरी वीज कर्मचाऱ्यांशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्य शासन मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याने संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेत असल्याचे घोषित केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ऊर्जा विभागातील संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार भाई जगताप, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, 'महावितरण'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, 'महानिर्मिती'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी अन्बलगन तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. सर्व कायदेशीर आयुधे वापरून पॅरलल लायसन्ससंदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) मध्ये आक्षेप मांडण्यात येईल. कंपनीवर होणारा परिणाम व ग्राहकांचे हित यावेळी प्राधान्याने मांडण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वीज कंपन्या अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत असून आर्थिक बळकटीकरणासाठीही ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही काही नावीन्यपूर्ण कल्पना मांडाव्यात त्यांचे नक्कीच स्वागत करण्यात येईल. फ्रॅन्चायजी कुठे करायच्या याचा विचार होणे गरजेचे असते. फ्रॅन्चायजीचा उपयोग झाला पाहिजे. त्याद्वारे काही नवीन पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देणार
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जास्तीची गुंतवणूक होऊन नव्याने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे. जलविद्युत प्रकल्पांसंदर्भातही निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
-----000-----
श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा
श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या
जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई, दि. 4 :- नव्या पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री जोतिबा मंदिर व परिसरातील विकासाबाबत तसेच किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विनय कोरे, प्रधान सचिव डॉ राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे मुंबई परिमंडळ अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेन्द्र यादव, संचालक डॉ तेजस गर्गे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला इतिहास अतिशय समृद्ध असून प्राचीन वारसास्थळांचे जतन व संवर्धन वेळीच होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून ही कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत.
यापूर्वी परिसराचे तात्काळ सर्व्हेक्षण करून त्यांच्या परीपूर्ण नोंदी ठेवण्यात याव्यात. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असेही श्री फडणवीस यांनी सांगितले. प्राचीन स्थळांच्या जतन व संवर्धनाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, जेणेकरून नव्या पिढीपर्यंत आपला समृद्ध इतिहास अधिक नेमकेपणाने पोहोचवता येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला आराखडा यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबींसंदर्भात आमदार विनय कोरे यांनी सूचना मांडल्या.
श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ला ही ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेली महत्वपूर्ण ठिकाणे आहेत. श्री जोतिबा मंदिर परिसर वन्यजीव विविधतेमध्येही
वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. येथील हरित पट्टयांचे जतन व संवर्धन केल्यास वन्यजीव अधिवासातच जपता येतील. भूमीगत विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच दर्शन मंडपाची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
------000------
अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ
अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लवकरच बैठक घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय.
मुंबई, दि. 4 :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या सकारात्मक प्रतिसादावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींचे म्हणणे तपशीलवार ऐकून घेतले. या सर्व मुद्यांबाबत लवकरच व्यापक बैठक बोलावण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले. यात अंगणवाडी केंद्रांसाठीची जागा, सेविका आणि मदतनीस यांचे मानधन, रिक्त जागा, ऑनलाईन डाटा भरण्यासाठी मोबाईलची उपलब्धता, पोषण आहार आदी मुद्यांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सकारात्मक आणि दिलासादायक प्रतिसादामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे संघाचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांबाबतचे सविस्तर निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर केले.
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

