Wednesday, 28 December 2022

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

 नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले सभागृहाचे आभार

            नागपूर दि. २८; “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.


            उपमुख्यमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणे अपेक्षित होते. या विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना आश्वासित केल्याप्रमाणे आणि अण्णा हजारे यांना विश्वासात घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे. यासाठी समिती तयार करण्यात आली होती. हे विधेयक परिपूर्ण व्हावे यासाठी अण्णा हजारे आणि तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत.”


           “राज्याचा लोकायुक्ताचा यापूर्वीचा कायदा हा सन 1971 चा आहे. आताच्या आणि आधीच्या कायद्यात महत्त्वाचा फरक हा आहे की, त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता. त्यामुळे विषेश प्रकरण म्हणून चौकशी करता यायची, मात्र आता हा कायदादेखील लोकायुक्तामधे आला आहे. यापूर्वीच्या कायद्यात मंत्री अथवा मुख्यमंत्री यांचा समावेश नव्हता. एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली तर विशेष प्रकरण (स्पेशल केस) म्हणून पडताळणी करा, असे राज्यपाल सांगू शकत होते. यात केवळ शिफारस करण्याचे अधिकार होते. मात्र आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला लोकयुक्ताच्या कक्षेत आणले आहे. या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनाही लोकायुक्ताच्या अंतर्गत आहे. एखादी भ्रष्टाचाराची घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत.”


          “ हे करत असताना या कायद्याचा गैरवापर होऊ नये, खोट्या तक्रारी होऊ नयेत यासाठी काही निकष ठेवले आहेत. केंद्रीय लोकायुक्त कायद्याप्रमाणेच निकष ठरवले आहेत. आमदारांच्या संदर्भात अध्यक्षांना आणि मंत्र्यांच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार देण्यात आले आहेत. या चाळणीतून गेल्याशिवाय ही तक्रार दाखल होणार नाही. योग्य तक्रार असेल तर ती दाखल करुन घ्यावीच लागेल आणि खोट्या तक्रारी आसतील तर त्या दाखल करून घेता येणार नाहीत, अशा तरतूदी ठेवण्यात आल्या आहेत.”


            “सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांना लोकायुक्त म्हणता येणार आहे. त्यांच्या अंतर्गत काही पदे असतील. केंद्रीय कायद्यानुसार जसे लोकपाल हे एक पॅनेल आहे तसेच हे लोकायुक्तांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलला दोन जणांच्या बेंचेने काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.”


            “आज हे एक ऐतिहासिक विधेयक पारित होत आहे. या विधेयकामुळे पारदर्शकपणे काम करण्याचे आपल्या सर्वांवर बंधन येणार आहे. लोकपाल कायद्या सारखे लोकायुक्त हे विधेयक इथे मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे”, असेही श्री फडणवीस म्हणाले.”

बँक अपहार प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

 बँक अपहार प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल


- कामगार मंत्री सुरेश खाडे


नागपूर, दि. २७ : माथाडी/ सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयीन कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने ‘दी रेल्वे गुडस क्लिअरिंग अँड फॉरवर्डींग एस्टॅब्लिशमेंट बोर्ड, मुंबई’ या मंडळात २५.७० कोटी रुपयांचा बँक अपहार झाल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.


विधानसभा सदस्य यामिनी जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे यांनी ही माहिती दिली.


मंत्री श्री. खाडे म्हणाले की, विविध माथाडी मंडळांमार्फत त्यांच्याकडे जमा होणाऱ्या लेव्हीच्या रक्कमा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवण्यात येतात. त्याचप्रमाणे दी. रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डींग एस्टॅब्लिशमेंटस् बोर्ड, मुंबई या मंडळाने त्यांच्या लेव्हीची रक्कम रु. २५.७० कोटी स्टेट

वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प’ कालबद्ध वेळेत पूर्ण करणार

 वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प’ कालबद्ध वेळेत पूर्ण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूर, दि. २७ : विदर्भातील ‘वैनगंगा ते नळगंगा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प’ असून याबाबतचे जवळपास सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत. यासाठी 426 किमी चा बोगदा तयार करण्यात येत असून राज्यातील हा सर्वात मोठा हा बोगदा असेल. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत योजना तयार करण्यात येत आहे. विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


            विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा या एकमेव नदी जोड प्रकल्पाचा नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याबाबत लक्षवेधी सूचना श्रीमती श्वेता महाले यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबाबत राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन मान्यता घेऊन निविदा काढण्यात येईल. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            यासाठी पाच लाख 72 हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे. यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून यासाठी महाराष्ट्र शासन 82 हजार कोटी खर्च करेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. हा प्रकल्प पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी रचना करण्यात आली आहे. हे पाणी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नेऊन दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.


            या आराखड्यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बुलढाण्यातून वाशिमला पाणी जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यासाठी सर्व जागा अधिग्रहित करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            सदस्य सर्वश्री हरीश पिंपळे, दादाराव केचे, राजेंद्र शिंगणे यांनी या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत सहभाग घेतला होता.

शिक्षक भरतीमुळे शिक्षकांची रिक्त पदांची समस्या सुटणार

 शिक्षक भरतीमुळे शिक्षकांची रिक्त पदांची समस्या सुटणार

 - दीपक केसरकर.

            नागपूर, दिनांक २८: राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी रिक्त शिक्षक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, महानगरपालिका हद्दीतील शाळांच्या शिक्षक संख्येबाबतचा विषय हा नगरविकास आणि शिक्षण विभागाशी संबंधित आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


            मुंबईमध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यातील जे शिक्षक भिवंडीमध्ये जाण्यास तयार असतील त्यांना याठिकाणी पाठवले जाईल. भिवंडीमध्ये पर्यायी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत यापुढे जिल्हा बदली केली जाणार नाही, अशी माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


            शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते काम सुरू असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


            लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विधानसभा सदस्य यशोमती ठाकूर, सुनील राणे, अबू आझमी, डॉ. भरती लव्हेकर आदींनी सहभाग घेतला.


0000

पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत निश्चित धोरण तयार करणार

 पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत निश्चित धोरण तयार करणार

- शंभूराज देसाई

शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठीगावपातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत विचार

            नागपूर, दि. 28 : राज्यात मंडल स्तरावर असलेली पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढवण्याबाबत काय धोरण असावे याबाबत निश्चितपणे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. तसेच शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी गावपातळीवर समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            मंत्री श्री.देसाई म्हणाले की, अतिवृष्टीच्या निकषात न बसणारे परंतु सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत केली. यापुढे सततच्या पावसाचे निकष ठरवण्यासाठी प्रधान सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येताच याबाबत निश्चित धोरण तयार करण्यात येईल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.


            शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील विधवा महिलांसाठी समुपदेशन केंद्र गावपातळीवर सुर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. या महिलांना शेतकरी गट आणि महिला बचत गटाशी जोडून काय लाभ देता येईल, याचाही विचार केला जाईल. याबाबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित धोरण तयार करण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.


            धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मदतीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवली जाईल. बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसेल तर त्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


            लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य डॉ. राहुल पाटील, भास्कर जाधव, यशोमती ठाकूर, डॉ.देवराव होळी, संजय गायकवाड आदींनी सहभाग घेतला.

शालेय पोषण आहार योजनेच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करणार

 शालेय पोषण आहार योजनेच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक सुधारणा करणार

- दीपक केसरकर

            नागपूर, दि. २८: शालेय पोषण आहार योजना केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. या योजनेबद्दल कुठेही तक्रारी असतील तर त्याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांनी शालेय पोषण आहार योजने संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, राज्यात यावर्षी शालेय पोषण आहार योजने साठी १६८२ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी या योजनेवर आतापर्यंत ८९२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अन्न महामंडळाकडून राज्याला तांदूळ पुरवठा करण्यात येतो. कडधान्ये खरेदी राज्यशासन करते. शालेय पातळीवर स्थानिक समितीमार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. विद्यार्थांना चांगला आहार देण्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


            या योजनेसंदर्भात काही तक्रारी असतील अथवा काही प्रकार घडले असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. निश्चितपणे या योजनेत आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.


            लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य बबन शिंदे, अशोक पवार यांनी सहभाग घेतला.

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही

 मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            नागपूर, दि.२८ : मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.


            विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. श्री.फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत.


            सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi