Tuesday, 27 December 2022

खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे चित्रनगरीचे आवाहन

 खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे चित्रनगरीचे आवाहन


          मुंबई, दि. 27 : राज्यातील खाजगी मालकीच्या चित्रीकरण स्थळांची माहिती जास्तीत जास्त निर्मिती संस्थांना कळावी यासाठी संबधित चित्रीकरण स्थळांचे मालक अथवा संस्थांनी गुगल ड्राईव्हवर स्थळांची विस्तृत माहिती, छायाचित्र, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने (चित्रनगरी/फिल्मसिटी) केले आहे.


            महाराष्ट्र हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले राज्य असून देश-विदेशातील निर्मिती संस्था येथे चित्रीकरण करण्यासाठी प्राधान्याने येत असतात. सध्या राज्यातील विविध ठिकाणी खाजगी चित्रीकरण स्थळ विकसित होत आहेत. ही चित्रीकरण स्थळे विविध निर्मिती संस्थांना माहिती व्हावीत यासाठी महामंडळ पुढाकार घेत आहे. यासाठी चित्रीकरणायोग्य अशा मालमत्ताधारकांनी महामंडळास संपर्क साधून आपल्या स्थळांची परिपूर्ण माहिती कळविल्यास, महामंडळ विविध प्रसिद्धीमाध्यमाद्वारे चित्रीकरण स्थळांची माहिती निर्मितीसंस्थांपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल. याद्वारे नागरिकांना अधिकचे उत्पन्न प्राप्त होईल आणि त्यांच्या स्थळांची प्रचार-प्रसिद्धी होईल.


        अधिक माहितीसाठी www.filmcitymumbai.org, www.filmcell.maharashtra.gov या संकेतस्थळांवर भेट देता येईल. गुगल ड्राईव्ह लिंक वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


000






उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था 'फिक्की' च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी*

 उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था 'फिक्की' च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित गांधी विजयी*

---------------------------

*'फिक्की'च्या संचालकपदी सलग तिसऱ्यांदा विजय*

---------------------------

नवी दिल्ली : देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व 'फिक्की' या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या कार्यकारी समिती संचालकपदी ललित गांधी सलग तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले. या निवडणुकीत ललित गांधी विक्रमी मतांनी निवडून आले. निवडीचा कालावधी तीन वर्षासाठीचा आहे. फिक्कीचे महासंचालक अरुण चावला यांनी त्यांना नुकतेच निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले.


सध्या ललित गांधी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँड अँग्री.'चे अध्यक्ष आहेत. दिल्ली येथे फिक्कीच्या 95 व्या वार्षिक सभेप्रसंगी ही निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत गांधी यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येऊन बाजी मारली. त्यामुळे देशातील सर्वोच्च शिखर संस्थेत गांधी यांनी संचालकपदाची हॅटट्रीक पूर्ण केली आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत या गटात उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेले ते एकमेव प्रतिनिधी आहेत.

 

देशातील विविध उद्योग व व्यापारी घटकांची राष्ट्रीय शिखर संस्था असलेल्या 'फिक्की' च्या औद्योगिक संस्था गटातून झालेल्या निवडणूकीत ललित गांधी यांनी हा विजय प्राप्त केला. यापूर्वी दोन वेळा संचालक म्हणून काम करताना अचूक माहिती उद्योग जगताला देत सरकार बरोबर योग्य तो समन्वय करण्याचं महत्वाचं काम केले आहे. 'फिक्की'सारख्या संस्था उद्योग आणि व्यापार क्षेत्रात, विशेषता शासकीय स्तरावर विविध धोरण ठरवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका बजावितात. `फिक्की` या संस्थेवर सलग तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा मोठा सन्मान समजत असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. देशाच्या अर्थविषयक आणि उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या 'फिक्की'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेतला जाईल, महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम उद्योगांना सुद्धा अधिक बळ देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून काम करू असेही त्यांनी सांगितले.

स्मृति प्रित्यर्थ

 कै.शांताराम भाऊ फिल्से, स्मृतिप्र


त्यर्थ कार्यक्रमात 97 वर्षांचे श्री.धोंडू घाणेकर भाषण करताना.

सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार

 सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार


पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि. २७ : राज्यातील 33 जिल्ह्यात एक लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.


            प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लंपी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.


            श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लंपी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्विकारल्या आहेत.


आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक


            पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.


कायमस्वरूपी विमा योजना सुरू करणार


            राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे श्री विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


            आतापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना 15 दिवसात मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi