Wednesday, 28 December 2022

सुरजागड लोह प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य

 सुरजागड लोह प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाह.

            नागपूर, दि. 28 : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या लोह प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.


            सुरजागड लोह प्रकल्पाबाबत सदस्य जयंत पाटील यांनी सूचना मांडली होती, शिवाय याच विषयावर सदस्य रामदास आंबटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या दोन्ही प्रश्नावर संयुक्त उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले की, हा लोहप्रकल्प 1993 मध्ये सुरू झाला. त्या भागातील नक्षलवादामुळे काही कालावधीत या प्रकल्पाचे काम पुढे नेऊ दिले जात नव्हते. त्यावेळी पालकमंत्री झाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा यांना नक्षलवादाचा बिमोड करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर सुरजागड प्रकल्प पुन्हा सुरू केला आहे. त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाला स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता पाच हजारापेक्षा जास्त स्थानिक नागरिकांना या प्रकल्पात रोजगार दिला आहे.


प्रशिक्षण केंद्र सुरू करणार


            सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबर कुशल काम येण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. यामध्ये महिला, तरुणांना प्रशिक्षण देवून कुशल कामगार तयार करण्यात येईल. याशिवाय याठिकाणी सिक्युरिटी अकादमी सुद्धा सुरू केली जाईल. यामुळे या प्रकल्पासाठी कुशल कामगार बाहेरून आणावे लागणार नाहीत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


प्रकल्पातून 342 कोटींचा महसूल


            सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला. शिवाय 342 कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, या भागातील नक्षलवाद पूर्ण कमी झाला असल्याने पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही श्री शिंदे यांनी दिली.


            उपप्रश्नाला उत्तर देताना खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, सुरजागड प्रकल्प सर्व परवानग्यांची पूर्तता करून 2021-22 या काळात पूर्ण क्षमतेत नियमाच्या अधीन राहून चालू आहे. गडचिरोली जिल्हा गौण खनिजाचा ठेवा आहे. यामधून आतापर्यंत 56 लाख टन गौण खनिज प्राप्त झाले आहे. याच कंपनीने घोनसरी येथे 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प वर्षभरात सुरू होऊन 1500 जणांना रोजगार मिळणार आहे. परिसरातील गावात आरोग्य आणि पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.


000

वाळू उत्खननाबाबत लवकरच सर्वंकष धोरण

 वाळू उत्खननाबाबत लवकरच सर्वंकष धोरण

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            नागपूर, दि. 26 : वाळूच्या अवैध उत्खननास प्रतिबंधासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.


            बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवर असलेल्या 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ बारव, पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.


            यावेळी मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या धोरणामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप बसेल. सामान्य नागरिकांना सरकारी डेपोतून रेती उपलब्ध होईल. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोणारमधील वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी केली जाईल.


            लोणारचे तहसीलदार यांच्याबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीनंतर प्राप्त निष्कर्षाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेंद्र पवार यांनी सहभाग घेतला होता.


000000

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा

 लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना

 विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती.

            नागपूर, दि. 27 :- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो तर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या विकास कामात ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन करुन कामे करण्यात येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.


            सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कॉरीडोरबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले की, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा आराखडा सर्वंकष होण्यासाठी वाराणसी आणि तिरुपती या देवस्थानाला सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. त्याच धर्तीवर मंदिरात येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर स्वच्छता, चांगले रस्ते, शौचालये, हॉस्पिटल आणि चंद्रभागा घाट याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे.


            छोटे व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या शकांचे निरसन करून त्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने योग्य मोबदला देण्यात येणार आहे. शिवाय त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्यासाठी कॉरीडॉरचा नियोजित प्रारूप विकास आराखडा सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती, सूचना यांचा विचार करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिली.


             यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये नदी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पार्कींग, पाणी आदी पायाभूत सुविधेची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. ही कामे करताना वारकरी परंपरेला व संस्कृतीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. होळकरवाडा, शिंदेवाडा याबाबत पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार जतन करून कॉरीडॉर केला जाईल.


            पुढील 25 वर्षानंतर होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करण्यात आला आहे. 964 सूचना/हरकती प्राप्त झाल्या असून यात 366 सूचना रस्ता रुंदीकरण व मोबदला याबाबत आहेत, असेही श्री सामंत यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहिर, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.


०००००

अकोल्यातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार

 अकोल्यातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी होणार

- मंत्री उदय सामंत

            नागपूर, दि. २८ : “अमृत अभियानांतर्गत अकोला शहरात जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरिता नेमलेल्या एपी ॲण्ड जीपी एजन्सीने केलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल”, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.


            ही जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेची कामे अपूर्ण राहिल्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे आणि सतेज पाटील यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले.


            मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, “अकोला शहरातील जलवाहिनी व पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. या कामांच्या बिलांमध्ये तफावत दिसून येत आहे. कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. या योजनेच्या कामात एका टाकीविषयी स्थानिक वाद आहे. हा वाद सामंजस्याने सोडवून काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अमृत योजना टप्पा २ अंतर्गत कामाच्याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल”, असेही मंत्री सामंत यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.


००००

रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण

 रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याचे जूनमध्ये होणार लोकार्पण.

- मंत्री डॉ. तानाजी सावंत

            नागपूर, दि. 28 : “रामटेकळी (ता. मानवत, जि. परभणी) येथील कोल्हापूरी बंधारा क्र.३ चे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या जून २०२३ मध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात येईल”, अशी माहिती मंत्री डॅा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


            या बंधाऱ्याच्या कामांची चौकशी करण्याबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यात एकनाथ खडसे, अनिल परब आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले.


            मंत्री डॅा.तानाजी सावंत म्हणाले, “परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामटेकळी येथील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बांधकामाचे कार्य आदेश सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोना काळात काम थांबले होते. कंत्राटदाराने उपविभागाकडून कामाची आखणी करून न घेता परस्पर दुसऱ्या ठिकाणी काम सुरु केले. ही बाब निदर्शनास येताच काम थांबविण्यात आले. याबाबत कंत्राटदार आणि उप अभियंत्यांना नोटिस पाठविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शासनाचा निधी वाया गेला नसून शासनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. तथापि या कामातील हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कार्रवाई केली जाईल”, असेही मंत्री डॅा. सावंत यांनी सभागृहात उत्तर देतांना सांगितले.


०००००



भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांस तात्काळ निधी दिला जाणार

 भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांस तात्काळ निधी दिला जाणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            नागपूर, दि. २८ : “रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिले.


            “वरळी येथील कामगार रुग्णालयात अतिदक्षता व सुपर स्पेशालिटी सुविधा देण्यासाठी ई.एस.आय.सी. ला निर्देश दिले जातील. रुग्णालयाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            “आर.एन. कूपर रुग्णालयात नेफ्रोलॉजी, कॅथलिक युनिट उभारण्याच्या परवानगीसह विद्यार्थांसाठी हॉस्टेल सुविधा देण्यासाठी संबधितांना तात्काळ निर्देश दिले जातील”, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


            यासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर, विलास पोतनीस, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता.

महाड तालुक्यातील साकव बाधंकामाचे काम प्रगतीपथावर

 महाड तालुक्यातील साकव बाधंकामाचे काम प्रगतीपथावर

- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण.

            नागपूर, दि. 28 : “महाड तालुका, जिल्हा रायगड येथील सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेत साकवाच्या बांधकामात अनियमितता व गैरव्यवहार याबाबत तपासणी केली असता या साकवचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण केले जाईल”, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.


            महाड तालुका, जिल्हा रायगड येथे साकव बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता.


            “कोकणात या प्रकारचे पूल बांधले जात असतात. या कामाची पाहणी करुन अहवाल सादर करण्याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, कोकणभवन, नवी मुंबई यांना कळविण्यात आले आहे. अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्याचे नियोजन आहे. याबाबत दोन पुलांसाठी प्रत्येकी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या साकवाचे काम साकव पद्धतीने न होता इलिमेंटप्रमाणे केले आहे. साकव पद्धत पूर्वीप्रमाणे केल्यानंतर त्यावरुन छोटी-छोटी वाहने जाऊ शकतात”, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


000

Featured post

Lakshvedhi