Friday, 16 December 2022

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून

 विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून.

          मुंबई, दि. 13 : विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

          मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे व खनिकर्म विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत यावेळी उपस्थित होते..

          यावेळी 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक 28 डिसेंबर रोजी घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. 


०००

कैलास मानसरोवर यात्रा सुलभ

 


दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत


          मुंबई, दि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 19, मंगळवार 20 व बुधवार 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.


          कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कळसूत्रीकार मीना नाईक यांनी आपल्या सादरीकरणातून बालकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीने नुकताच पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कोणकोणते विषय हाताळले आहेत, तसेच त्यांची ही कला काय आहे याबाबतची माहिती त्यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


0000

कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावरजी- 20 देशांचे प्रतिनिधी

 कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावरजी- 20 देशांचे प्रतिनिधी भारावले.

          मुंबई, दि. 16 : कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून जी- 20 देशांचे प्रतिनिधीं भारावले.


     जी-20 देशांच्या प्रतिनिधींची 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-20 प्रतिनिधींसाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला.


            बोरीवली जवळील साष्टी बेटाच्या अरण्यात कान्हेरी लेणी आहेत. या लेण्यांचा इतिहास, 'कान्हेरी' या शब्दाचा उगम कशा प्रकारे झाला. या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-20 च्या प्रतिनिधींना दिली.


            या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती, डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी यावेळी सर्वांनी पहिल्या. गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मीय विविध उपक्रम राबवत. बहुतेक गुंफांचा वापर बौद्धधर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाई. बौद्ध संघातील जीवनात काय हवे आहे, याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असत, अशा अनेक ऐतिहासिक घटनांना उजाळा देत कान्हेरी गुंफाच्या निर्मितीपासूनचा इतिहास परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात आली.


            सुवाच्य अक्षरातील शिलालेख आणि वचननामे (एपिग्राफ्स) ही ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या तीन लिप्यांत आहेत. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत





, सध्या रिकामे ओहोळ पूर्ण कोरडे आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह किती मोठा असू शकतो याच्या खुणा येथे लक्षात येतात. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. हा परिसर पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.


जगभरातील प्रतिनिधींनी भारतीय शास्त्रीय संगीताचा घेतला आस्वाद


             तुळशी तलाव येथे वन विभागाच्या निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तबला वादन, पखवाल वादन आणि शास्त्रीय संगीत सहभागी कलाकारांनी सादर केले. बासरी वादक देबो प्रिया,सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवरती बासरी वादन केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

 प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना1966 कोटी 63 लाख नुकसानभरपाईचे वितरण

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार.

मुंबई, दि. 15 - 'प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022' मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयांची नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे तसेच प्रलंबित 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत.


प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढाव्या संदर्भात आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी बैठकीचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर - देशमुख, कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदींसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्या याचा आढावा यावेळी मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-2022 अंतर्गत आतापर्यंत 57 लाख 91 हजार 167 इतकी निश्चित लाभार्थी संख्या आहे. त्यासाठीची निश्चित नुकसान भरपाई रक्कम 2 हजार 413 कोटी 69 लाख रुपये इतकी आहे. आतापर्यंत 43 लाख 86 हजार 763 शेतकऱ्यांना एकूण 1 हजार 966 कोटी 63 लाख रकमेचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानभरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा. पीक विमा भरलेला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री.सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले.


यावेळी भारतीय कृषि विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाचही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गडबड गोंधळ


 

एक ते पाच जानेवारी दरम्यान सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव

 एक ते पाच जानेवारी दरम्यान सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव.

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

· नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, चर्चासत्रे, प्रात्यक्षिकांसह शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी.

· महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे 600 स्टॉल्स.

            मुंबई, दि. 15 - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना 50 वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत दि. 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव - 2023 चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन, नवीन वाणांची निर्मिती याबरोबरच नावीन्यपूर्ण कृषी संशोधन, शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.


            कृषि विभागाच्यावतीने दरवर्षी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याबाबतची माहिती देण्यासाठी मंत्री श्री. सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.


            यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे. यामध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातून शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            आंतरराष्ट्रीय स्तरावर आगामी 2023 हे वर्ष 'भरड धान्यांचं' म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्यासंबंधी होणारे संशोधन, नवीन वाणांचे संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण यावेळी महोत्सवात करण्यात येणार आहे.


            या महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बाजारपेठांचे नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती देणारी दालने देखील महोत्सवात असतील. कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने यांचीही माहिती देणारी 160 पेक्षा अधिक दालने महोत्सवात असतील. शिवाय शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, यांचीही दालने असतील. शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादनेही शेतक-यांना पाहावयास मिळतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.


            या महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, यासाठी कृषि विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी दिली. 


            या राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तर कृषि सहसंचालक तुकाराम मोटे यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


0000

Featured post

Lakshvedhi