Monday, 12 December 2022

जी २० परिषदेमध्ये मंगळवारी विविध कार्यक्रम

 जी २० परिषदेमध्ये मंगळवारी विविध कार्यक्रम

            मुंबई, दि. १२ : मुंबईत आजपासून सुरू झालेल्या जी २० परिषदेत मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९.३० ते दुपारी एक या कालावधीत ‘डाटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा’ याविषयावर बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरच्या जास्मिन सभागृहात कार्यक्रम होईल.


            दुसऱ्या सत्रात दुपारी दोन ते सायंकाळी पाच या कालावधीत ‘इनफ्यूजिंग न्यू लाइफ (लाइफस्टायल फॉर एन्व्हायरमेंट) इन टू ग्रीन डेव्हलपमेंट’ याविषयावर जिओ वर्ल्ड सेंटरमधील जास्मिन हॉलमध्येच कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम हॉटेल ताजमहाल पॅलेस येथील चेंबर्स टेरेस येथे होतील. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जी २० परिषदेसाठी आलेले प्रतिनिधी गेट वे ऑफ इंडिया परिसरात वॉक करतील.


०००००



 

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटीपशुपालकांना ३४ कोटी वितरित

 लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटीपशुपालकांना ३४ कोटी वितरित

- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. १२ : लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर रु. ३३.८५ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, १२ डिसेंबर अखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण 4001 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३ लाख ७५ हजार ५७६ बाधित पशुधनापैकी एकूण २ लाख ९६ हजार ५७४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस उपलब्ध असून, त्यापैकी एकूण १३९.८९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच, खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारी नुसार राज्यात सुमारे १०० % गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.


            रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याने या पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना मंत्री श्री विखे पाटील यांनी दिल्या.


            श्री. विखे पाटील यांनी आवाहन केले आहे की, गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. तसेच, सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन असल्याने स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुपालकांना सहकार्य करावे.


             क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन मंत्री श्री.विखे पाटील यांनी केले आहे.

मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला

 मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन.



कांदिवली पूर्व विधानसभेतील लोखंडवाला संकुल येथे उभारण्यात आलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान हे मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यान ठरले आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे उद्यान म्हणजे एखादा प्रकल्प अधिकाधिक सुंदर आणि लोकोपयोगी कसा होईल हे दर्शवणारे असेच आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.


यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते. श्री. लोढा म्हणाले, आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व विधानसभेत विविध विकास कामे झाली आहेत. आत्तापर्यंत वांद्रे येथील जिओ उद्यान हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते, मात्र गोपीनाथ मुंडे उद्यान हे त्यापेक्षाही सुंदर आणि दर्जेदार असे झाले आहे.


            यावेळी खा. शेट्टी म्हणाले, या गोपीनाथ मुंडे उद्यानामुळे कांदिवली पूर्व विधानसभेच्या सौदर्यात भर पडली आहे. अत्यंत उपयुक्त अस प्रकल्प आ. अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.


आमदार अतुल भातखळकर म्हणाले, येथील पाच एकरच्या भूखंडावर जंगल होते. परिसर अस्वच्छ होता. येथील नैसर्गिक सौंदर्य कोठेही नष्ट न करता आम्ही हे उद्यान बनवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे विलोभनीय शिल्प साकारण्यात आले आहे. मुंबईतील पहिला वहिला अंडरग्राउंड पार्किंगचा पायलेट प्रोजेक्ट येत्या काळात पूर्ण होईल. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मागाठणे ते गोरेगाव हा डीपी रोड येणाऱ्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार भातखळकर यांनी दिले.


प्रास्ताविक माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी केले सूत्रसंचालन भाजपा उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केले यावेळी मंडलाध्यक्ष आप्पा बेलवलकर यांसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अश्विन अहिरे यांनी मानले.

........


दिलखुलास’

 दिलखुलास’ कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत

            मुंबई,


दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून मंगळवार दिनांक 13 व बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.


            दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी अकोला जिल्हा परिषद विविध योजना राबवित आहे. या योजना राबविण्याची कार्यपद्धती, सोई सुविधा, दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकरण, मार्गदर्शन, प्रोत्साहन अशा विविध विषयांची महत्वपूर्ण माहिती अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कटियार यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

2022 ऑप्टीमिस्ट आशियाई आणि ओशेनियनचॅम्पीयनशिप स्पर्धांचे मुंबईत आयोजन

 2022 ऑप्टीमिस्ट आशियाई आणि ओशेनियनचॅम्पीयनशिप स्पर्धांचे मुंबईत आयोजन


गिरगाव चौपाटीवर 13 देशांतील स्पर्धकांचा नौकानयनाचा थरार अनुभवता येणार

            मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा एरियल आर्मी यॉचिंग नोड यांनी ‘2022 ऑप्टिमिस्ट आशियाई आणि ओशनियन चॅम्पियनशिप’चे 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत गिरगाव चौपाटी येथे आयोजन केले आहे. तब्बल 19 वर्षानंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धांचा थरार मुंबईसह भारतवासियांना अनुभवता येणार आहे.


            मुंबईला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, 13 डिसेंबर रोजी स्पर्धकांची नोंदणी करण्यात येणार आहे. तर, 14 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 19 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या 10 शर्यतींमध्ये प्रति दिवशी जास्तीत जास्त तीन फ्लीट शर्यती आयोजित केल्या जातील. या चॅम्पीयनशीपचा समारोप 19 डिसेंबर रोजी ठाकर्स, चौपाटी येथे होईल.


            महाराष्ट्र शासनाच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने, याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया (YAI) आणि नॅशनल ऑप्टिमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (NOAI) यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


            ही स्पर्धा आशियाई आणि आशियाई महासागरातील सदस्य राष्ट्रांसाठी कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप आहे. आशियाई आणि ओशनिया प्रदेशातील 13 देशांतील 105 स्पर्धात्मक खलाशी या आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धात सहभागी होणार आहेत. अर्जेंटिना, थायलंड, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, तुर्की, जपान, कॅनडा आणि भारतातील सुमारे 25 अधिकारी आंतरराष्ट्रीय ज्युरी/रेस मॅनेजमेंटमध्ये सहभागी असणार आहेत.


            युवकांची ऊर्जा क्रीडा क्षेत्रासाठी उपयोगात यावी, चारित्र्यनिर्मिती, त्यांच्यात साहसाची भावना जागृत करणे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करणे जेणेकरून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान लाभेल, हे या खेळाचे उद्दिष्ट असल्याचे कमाडिंग ऑफीसर कर्नल नछतर सिंग जोहल यांनी सांगितले. मुंबईकरांनी या आशियाई नौकानयन स्पर्धांचा थरार अनुभवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

०००

उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज

 उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज

- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

जर्मनीच्या वाणिज्यदूतांनी घेतली मंत्री केसरकर यांची सदिच्छा भेट.

            मुंबई, दि. 12 : जर्मनीसह विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे अभ्यासक्रम शिक्षणक्रमात आवश्यक आहेत. आगामी काळातील ही गरज ओळखून शालेय शिक्षण विभागाने त्या दृष्टीने पाऊले उचलावीत, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी आज मंत्रालयात मंत्री श्री. केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी श्री. फॅबिग यांच्याकडून जर्मनीतील शिक्षण पद्धती, तेथील विविध उद्योगांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज, देशात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या जर्मन उद्योग समूहांसाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा केली.

            यावेळी श्री. फॅबिग यांनी येत्या काही दिवसात जर्मनीचे प्रतिनिधीमंडळ महाराष्ट्रात भेट देणार असून त्यावेळी याबाबत अधिक विस्तृत आणि तपशीलवार चर्चा होईल, असे सांगितले.


00



मुम्बई अंधेरी हिस्ट्री

 


Featured post

Lakshvedhi