Thursday, 8 December 2022

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर.

 सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर.

            मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे सन २०२३ सालासाठीच्या सार्वजनिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

            यामध्ये प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी गुरुवार, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी रविवार, होळी (दुसरा दिवस) ७ मार्च मंगळवार ,गुढीपाडवा २२ मार्च बुधवार, रामनवमी ३० मार्च गुरुवार, महावीर जयंती ४ एप्रिल मंगळवार, गुड फ्रायडे ७ एप्रिल शुक्रवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल शुक्रवार, महाराष्ट्र दिन १ मे सोमवार, बुद्ध पौर्णिमा ५ मे शुक्रवार, बकरी ईद (ईद उल झुआ) २८ जून बुधवार, मोहरम २९ जुलै शनिवार, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट मंगळवार, पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १६ ऑगस्ट बुधवार, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्य शासनाने आता भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर केली आहे.

            बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल २०२३ , शनिवार सुट्टी असून ती केवळ बँकांपुरती मर्यादित आहे. ही सुट्टी शासकीय कार्यालयांना लागू होणार नाहीत.

            या सार्वजनिक सुट्ट्यांबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयपुरस्कार जाहीर

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मयपुरस्कार जाहीर

       मुंबईदि. ७ : सन २०२१ या वर्षातील स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या परिक्षण समितीच्या निकालपत्रानुसार ३५ विविध वाङ्मय पुरस्कारांसाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक / साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे, अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. सन २०२१ च्या पुरस्कार स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांच्या अनुषंगाने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आले आहेत.

             स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कमस्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्काराच्या यादीमध्ये वाङ्मय प्रकार आणि पुरस्काराची माहिती देण्यात आली आहे. यात वाङ्मयाचे प्रकार, पुरस्काराचे नावलेखकाचेपुस्तकाचे नाव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली असूनपात्र ठरविण्यात आलेल्या ३३ लेखक/ साहित्यिकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

वाङ्मयाचे प्रकारपुरस्काराचे नावलेखकाचे नाव (पुस्तकाचे नाव)पुरस्काराची रक्कम

 

१. प्रौढ वाङ्मय- काव्य प्रकारासाठी कवी केशवसुत पुरस्कार : हबीब भंडारे (जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता) - रुपये १ लाख

 २. प्रथम प्रकाशन- काव्य प्रकारासाठी बहिणाबाई चौधरी पुरस्कार : रमजान मुल्ला (अस्वस्थ                काळरात्रीचे दृष्टान्त) - रुपये ५० हजार

३. प्रौढ वाङ्मय- नाटक/एकांकिका प्रकारासाठी राम गणेश गडकरी पुरस्कार : नारायण जाधव येळगावकर (यशोधरा) - रुपये १ लाख

४. प्रौढ प्रकाशन- नाटक/एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार :  शिफारस नाही

५. प्रौढ वाङ्मय - कादंबरी प्रकारासाठी हरी नारायण आपटे पुरस्कार : प्रशान्त बागड (नवल) - रुपये १ लाख.

६. प्रथम प्रकाशन- कादंबरी  प्रकारासाठी श्री.ना.पेंडसे पुरस्कार : स्वेता सीमा विनोद (आपल्याला काय त्याचं) - रुपये ५० हजार           

७. प्रौढ वाङ्मय- लघुकथा प्रकारासाठी दिवाकर कृष्ण पुरस्कार : अनिल साबळे (पिवळा पिवळा पाचोळा)-  रुपये १ लाख

८. प्रथम प्रकाशन- लघुकथा प्रकारासाठी ग.ल.ठोकळ पुरस्कार : विश्वास जयदेव ठाकूर (नात्यांचे सर्व्हिसिंग) - रुपये ५० हजार

९. प्रौढ वाङ्मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह) प्रकारासाठी अनंत काणेकर पुरस्कार : डॉ.नीलिमा गुंडी  (आठवा सूर) - रुपये १ लाख

१०. प्रथम प्रकाशन- ललितगद्य प्रकारासाठी ताराबाई शिंदे पुरस्कार: वीणा सामंत (साठा उत्तरासाठी कहाणी) - रुपये ५० हजार

११.प्रौढ वाङ्मय - विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : राजा गायकवाड (गढीवरून) - रुपये १ लाख

.प्रौढ वाङ्मय- चरित्र प्रकारासाठी न.चि.केळकर पुरस्कार : वंदना बोकील-कुलकर्णी (रोहिणी निरंजनी) - रुपये १ लाख

१३.प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : शरद बाविस्कर (भुरा) - रुपये १ लाख.

१४. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/ वाङ्मयीन/ संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखनासाठी श्री.के.क्षीरसागर पुरस्कार : दीपा देशमुख (जग बदलणारे ग्रंथ) - रुपये १ लाख

१५. प्रथम प्रकाशन- समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा.भा.पाटणकर पुरस्कार : प्रा.डॉ.प्रकाश शेवाळे (अनुष्टुभ नियतकालिकाचे वाङ्मयीन योगदान) -- रुपये ५० हजार

१६. प्रौढ वाङ्मय-राज्यशास्त्र /समाजशास्त्र प्रकारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : सुरेश भटेवरा  (शोध..नेहरू-गांधी पर्वाचा!) - रुपये १ लाख.

१७. प्रौढ वाङ्मय- इतिहास प्रकारासाठी शाहू महाराज पुरस्कार : शशिकांत गिरिधर पित्रे (जयतु शिवाजीजयतु शिवाजी) - रुपये १ लाख.

१८. प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र /व्याकरण प्रकारासाठी नरहर कुरुंदकर पुरस्कार : सदानंद कदम (मराठी भाषेच्या जडणघडणीची कहाणी वाक्प्रचारांची) - रुपये १ लाख.

१९. प्रौढ वाङ्मय- विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) प्रकारासाठी महात्मा जोतीराव फुले पुरस्कार : अरुण गद्रे (उत्क्रांती:एक वैज्ञानिक अंधश्रद्धा? ) रुपये १ लाख.

२०. प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारासाठी  वसंतराव नाईक पुरस्कार : सचिन आत्माराम होळकर (शेती शोध आणि बोध)रुपये १ लाख.

२१. प्रौढ वाङ्मय- उपेक्षितांचे साहित्य  प्रकारासाठी  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : सुखदेव थोरात (वंचितांचे वर्तमान)रुपये १ लाख.

२२. प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्र विषयक लेखनासाठी सी.डी.देशमुख पुरस्कार : शिफारस नाही,

२३. प्रौढ वाङ्मय - तत्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारासाठी ना.गो.नांदापुरकर पुरस्कार : डॉ.आर.के.अडसूळ (सुखाचे मानसशास्त्र) - रुपये १ लाख.

२४. प्रौढ वाङ्मय-शिक्षणशास्त्र प्रकारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार : डॉ.साहेबराव भुकण (विनोबा आणि शिक्षण)-  रुपये १ लाख.

२५. प्रौढ वाङ्मय - पर्यावरण प्रकारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार :विद्यानंद रानडे (पाण्या तुझा रंग कसा ?) - रुपये १ लाख.

२६. प्रौढ वाङ्मय -संपादित/ आधारित प्रकारासाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार : संपादक किशोर मेढे (दलित -भारत मधील अग्रलेख) - रुपये १ लाख.

२७. प्रौढ वाङ्मय -अनुवादित प्रकारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार : अनुवादक अनघा लेले (फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन) - रुपये १ लाख.

२८ प्रौढ वाङ्मय - संर्कीण प्रकारासाठी भाई माधवराव बागल पुरस्कार : आनंद करंदीकर (वैचारिक घुसळण) - रुपये १ लाख.

२९. बाल वाङ्मय - कविता प्रकारासाठी बाल कवी पुरस्कार : विवेक उगलमुगले (ओन्ली फॉर चिल्ड्रन) - रुपये ५० हजार

३०. बाल वाङ्मय - नाटक व एकांकिका प्रकारासाठी भा.रा.भागवत पुरस्कार : डॉ.सोमनाथ मुटकुळे (खेळ मांडियेला). - रुपये ५० हजार

३१. बाल वाङ्मय - कादंबरी प्रकारासाठी साने गुरुजी पुरस्कार सौ.वृषाली पाटील (पक्षी गेले कुठे? ) - रुपये ५० हजार

३२. बाल वाङ्मय - कथा प्रकारासाठी राजा मंगळवेढेकर पुरस्कार : सुहासिनी देशपांडे (किमयागार) - रुपये ५० हजार

३३. बाल वाङ्मय -सर्वसामान्य ज्ञान प्रकारासाठी यदुनाथ थत्ते पुरस्कार : प्रा.सुधाकर चव्हाण, (चला शिकूया वारली चित्रकला) - रुपये ५० हजार

३४. बाल वाङ्मय- संकीर्ण प्रकारासाठी  ना.धो ताम्हणकर पुरस्कार: प्रा.विद्या सुर्वे बोरसे (कोरा कागद निळी शाई) - रुपये ५० हजार

३५. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारासाठी  सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : परेश वासुदेव प्रभू (गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य) - रुपये १ लाख.

०००

 

 

सुप्रभात




 

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबिर कार्यालयात

 हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबिर कार्यालयात


            मुंबई, दि. ७ : विधीमंडळाचे सन २०२२ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या अधिवेशन कालावधीकरीता १५ डिसेंबर पासून मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर येथील शिबिर कार्यालयत सुरू करण्यात येत आहे.


      सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई यांचे मुख्य सचिवांच्या कार्यालयात स्विकारण्यात येणारे धारिका, टपाल, निवेदन १४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून स्विकारण्याचे बंद करण्यात येईल. मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावयाची कागदपत्रे, धारीका, टपाल इत्यादी १५ डिसेंबर पासून ते अधिवेशन संस्थगित होईपर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांचे शिबीर कार्यालय, हैदराबाद हाऊस, नागपूर येथील कार्यालयात स्विकारण्यात येतील.



ऊसतोडणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

 ऊसतोडणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

            मुंबई, दि. 7 : ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. तसेच ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.


            बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.


            विधिमंडळात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.


            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोडणी कामगारांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतही गर्भाशय काढण्याच्या घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करण्यात यावा. त्यासाठी सर्वेक्षण आणि संशोधन करावे.


            ऊसतोडणी कामगारांची तोडणी हंगामापूर्वी आणि हंगाम पूर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणी करावी. ही तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करावी. ऊसतोडणी कामगारांच्या जाण्या-येण्याच्या मार्गाचे तपशील ठेवावे. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यात मदत करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.


            ऊसतोडणी कामगारांना आरोग्य, निवास आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख नियोक्ता यांच्याशी करावयाच्या कराराचे प्रारुप निश्चित करण्यात यावे. या करारात महिला, मुले आणि मुली यांना प्राधान्य देण्यात यावे. प्रारुप तयार करताना सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, कामगार आणि ऊस तोडणी कामगार महामंडळ यांच्याकडून सूचना घेतल्या जाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.


            यावेळी ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.


            बैठकीत प्रादेशिक साखर सहसंचालक शरद झरे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली..


            बैठकीस सहसचिव व्ही. एल. लहाने, सहकार विभागाचे उपसचिव अं. पां. शिंगाडे, प्रादेशिक साखर कामगार उपायुक्त सुनीता म्हैसकर, चंद्रकांत राऊत, औद्योगिक सुरक्षा संचालक मु. र. पाटील आदी उपस्थित होते.


०००

Wednesday, 7 December 2022

दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे

 दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे

संचालक समीर उन्हाळे यांची उद्या मुलाखत.

            मुंबई, दि.7: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालक समीर उन्हाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर गुरुवार दि. 8 व शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. शहरी कंपोस्ट खताची बाजार शृंखला प्रस्थापित करून शहरी-ग्रामीण समन्वयाद्वारे मृदा संवर्धनासाठी या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. शहरांची स्वच्छता करताना कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत बनविले जात आहे. या अभियानामार्फत नगर पालिकांना मदत, कंपोस्ट खतासाठी हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड, जीआयझेडचा प्रोसॉइल प्रोजेक्ट, कंपोस्ट खताची बाजार शृंखला, हरित ॲप, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालक समीर उन्हाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000000

गृहनिर्माण विभागाने केलेली कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसारच.

 गृहनिर्माण विभागाने केलेली कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसारच.

      मुंबई, दि. 7; विकासकामांची गतीने अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याकरीता शासन निर्णय / शासन परिपत्रक / शासन पत्र रद्द करण्याबाबतचे जे निर्देश नस्तीवर उप मुख्यमंत्री/ मुख्यमंत्री यांच्याकडून प्राप्त प्राप्त झाले त्यानुसारच गृहनिर्माण विभागाने आवश्यक आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही केली आहे. असा खुलासा गृहनिर्माण विभागाने केला आहे.


      दि. 05.12.2022 रोजीच्या दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये गृहनिर्माण विभागाशी संबंधित “ म्हाडातील बदल्यांचे अधिकार शासनाकडेच” या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती.


      गृहनिर्माण विभागाने केलेली संपूर्ण कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसार केली आहे. तसेच, मंत्रालयीन कार्यपध्दतीनुसार शासनस्तरावर मान्य होऊन आलेला निर्णय कोणत्याच प्रकरणात प्रशासनातील कोणत्याही स्तरावर थांबवता येत नाही अथवा थांबविण्यात येत नाही. त्यामुळे दि. 05.12.2022 रोजीच्या दैनिक लोकसत्तातील “म्हाडातील बदल्यांचे अधिकार शासनाकडेच” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमीतील उप सचिवांसंदर्भात करण्यात आलेले भाष्य हे वस्तुस्थितीवर आधारीत नाही. असे या खुलाशात स्पष्ट केले आहे.


०००० 


 



Featured post

Lakshvedhi