सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 1 October 2022
दिलखुलास
‘दिलखुलास' कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत
मुंबई, दि. 30: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात प्रसिद्ध टेबल टेनिसपटू सनील शेट्टी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑनएआयआर' या ॲपवर सोमवार दि. 3 ऑक्टोबर आणि मंगळवार दि. 4 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या सनील शेट्टी यांनी प्रतिकूल परिस्थीतीवर मात करत यशाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीचा प्रवास वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मुलाखतीतून जाणून घेतला आहे.
स्वच्छता मॉनिटर्स’
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
मुंबई, दि. 30- महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासाठी मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येईल. 2 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हीडिओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारणे या कल्पनेचा परिचय करून देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेटस् चेंज’ हा 75 मिनिटांचा स्वयंस्पष्टीकरणात्मक मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हीडिओ संदेशाद्वारे देखील कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार प्रसार झाल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवरील भार देखील कमी होईल. या उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छता मॉनिटर’ यांचा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
पर्यटन चालना
देशातील वैविध्यपूर्ण संस्कृती विदेशीपर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू
- केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य
- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 30 : देशाला विविध बोली भाषा, संस्कृती, विलोभनीय निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. हा अनमोल ठेवा पर्यटकांच्या आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. विदेशी पर्यटकांना देशातील या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकर्षण आहे. हे लक्षात घेवून त्यावर आधारित पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय पर्यटन मंत्रालय तर्फे ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम 27 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री. नाईक बोलत होते. कार्यक्रमास पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबई पोर्ट ऑथोरिटीचे अध्यक्ष राजीव जलोटा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे प्रमुख सब्य मुखर्जी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे ज्ञानप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘पर्यटन पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परदेशी पर्यटक देशात यावेत यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटनाची वेगळी ओळख आहे. ही माहिती सर्वांना व्हावी, यासाठी पर्यटन पर्व सारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने नाशिक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथेही पर्यटन स्थळ विकासासाठी निधी दिला आहे. जी - 20 मधील काही बैठका महाराष्ट्रात होत आहेत या बैठकांच्या माध्यमातून राज्याला महाराष्ट्रातील पर्यटनाच्या बलस्थानांची माहिती देता येवू शकते, असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य
- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन क्षेत्रात नव्याने काम करू इच्छिणाऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करेल. सकारात्मक निर्णय घेऊन पर्यटनवाढीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गोवा राज्यानेही पर्यटन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रातही पर्यटनातून रोजगार वाढीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.
स्थानिक संस्कृतीची पर्यटकांना ओळख करून देणे गरजेचे
- शिक्षणमंत्री दीपक केसरकर
शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, स्थानिक संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी, यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे,नागपूर यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरामध्ये पर्यटनाचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पर्यटन पर्व हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमातून पर्यटन वाढीस चालना मिळेल असे शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले.
यावेळी पर्यटन महामंडळाचे प्रदर्शन, टेक्सटाईल व हॅण्डीक्राफ्टस यांचे स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
0000
धारावीच्या पुनर्विकास
पुढील तीन महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ३० : धारावी प्रकल्प हा शहरी भागातील सर्वांत मोठा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता पुढील तीन ते चार महिन्यात धारावीच्या पुनर्विकासास सुरूवात केली जाईल. यासंदर्भात सर्व मजुंरी आणि निविदांची कामे लवकरच मार्गी लागतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईतील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारेडेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो २०२२ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर नारडेकोचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन बांदेलकर, नारडेको महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूणवाल, नारडेको महाराष्ट्रचे सचिव अभय चांडक आणि नाईट फ्रँकचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष शिशिर बैजल उपस्थित होते.
मुंबईकरांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणार
मुंबईतील वाहतूकीसंदर्भातील सर्व पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे जात असून मुंबईच्या विकासाकरिता विकासकांच्या नवनवीन कल्पनांची आवश्यकता भासणार आहे. वित्तीय संस्था शासनाबरोबर काम करायला उत्सुक आहेत. यामुळे याचा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे. आपल्याला मुंबई ही राहण्याजोगी करण्याबरोबरच मुंबईतील लोकांच्या राहणीमानाचा दर्जाही वाढवायचा आहे. महारेरा कायदा आला आणि तो यशस्वी झाला. महारेराने उद्योगांसाठी विश्वासार्हता आणली असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
नैना – तिसरी मुंबई म्हणून ओळख
मुंबईतील म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माणाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. मुंबई हे आय-लॅण्ड शहर असून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा, यासाठी मेट्रो, ट्रॉन्सहार्बर लिंक, कोस्टल रोड यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते आता पुढील वर्षाच्या शेवटी पूर्णत्वाकडे जाणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळाजवळ नैना हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नैनाची तिसरी मुंबई म्हणून ओळख असणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विकासक, गुंतवणुकदारांना शासनाकडून काही सवलती देण्यासंदर्भात आवश्यक ती पाऊले उचलली जातील. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात लवकरच चांगला निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नारेडकोला आश्वस्त केले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते नाईट फ्रँक आणि नारेडको यांच्या संयुक्त अहवालाचे तसेच ओपन एकर्स या मासिकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले.
रोजगार मेळावा
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा
- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि 30 : औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक आयोजन करण्यात यावे अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.
प्रधानमंत्री कौशल्य व महारोजगार मेळावा राज्यभरात आयोजित करण्याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली.
बैठकीस कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव नामदेव भोसले, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण बी. ए. दळवी, कौशल्य विभागाचे उपसंचालक श्री. पवार, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योगेश पाटील यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील आयटीआयचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पायाभूत सुविधा, देखभाल दुरुस्ती, याबाबत धोरण तयार करुन प्रस्ताव सादर करण्यात यावेत. तसेच राज्यातील आयटीआय मध्ये नवीन अभ्यासक्रम राबविण्यात यावेत, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे (आयएमसी) बळकटीकरण करण्यात यावे. रोजगार मेळाव्यात अधिक प्रमाणात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना निमंत्रित करून अधिकाधिक तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आय. टी. आय. मध्ये नवीन व अद्ययावत अभ्यासक्रम राबवण्यात यावे. आय. टी. आय. मध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या मेळाव्यात महामंडळ, वित्तीय संस्थांना आमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी दिल्या.
राज्यातील आयटीआयची सद्यस्थिती पाहता देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी आयटीआयने उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खर्च (पीओटीएस) करावा, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी केल्या. राज्यातील आयटीआयच्या अंतर्गत वसतिगृहाचा आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी राज्यातील सर्व आयटीआय आधुनिकीकरणासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल व विविध क्षेत्रांमध्ये आयटीआयला ब्रँड बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



