Wednesday, 7 September 2022

२८१ कृषी उत्पन्न बाजार समित्या.

 राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

            पुणे, दि. ६ : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

            प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले.

            त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.

            कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

            दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झाल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली आहे.

संभाव्य मतदार यादी व निवडणू‍क कार्यक्रम

मतदार यादी कार्यक्रम

            जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे - २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे - ३ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे - ३ ते ३१ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे - १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे - १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे - १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे - २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे - ७ डिसेंबर २०२२

निवडणू‍क कार्यक्रम

            निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे - २३ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी - २३ ते २९ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक - ३० डिसेंबर २०२२, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक - २ जानेवारी २०२३, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी - २ ते १६ जानेवारी २०२३, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक - १७ जानेवारी २०२३, मतदान - २९ जानेवारी रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे

G 20

 महाराष्ट्रात होणार जी 20 परिषदेतील 13 बैठका

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा आढावा.

          मुंबई, दि. 6 :- जी 20 परिषदेच्या भारतात 215 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या तिन्ही शहरातील बैठकांचे नियोजन आणि एकूण तयारीची आढावा बैठक मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आणि जी 20 परिषदेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकांचे आणि अनुषंगिक कार्यक्रमांचे महाराष्ट्र शासनामार्फत उत्कृष्ट नियोजन करण्यात येईल, असे श्री. श्रीवास्तव यांनी सांगितले.

            या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उच्च आणि तंत्रशिक्षण सचिव विकास चंद्र रस्तोगी, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, आदिवासी विकास विभाग सचिव अनुपकुमार यादव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सह पोलीस आयुक्त मुंबई विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था मिलींद भारंबे, विदेश मंत्रालय सह सचिव श्री. एल रमेश बाबू यांसह विदेश मंत्रालयाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, जी - २० परिषदेदरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या विविध बैठका आणि कार्यक्रमांसाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्य समन्वयक म्हणून प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दीपक कपूर यांची तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            परराष्ट्र मंत्रालयाच्या निदेशानुसार या परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच या कालावधीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे, औद्योगिक गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या संधीचे आणि पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येईल. या बैठकांचे नीट नेटके आणि काटेकोरपणे नियोजन करण्यात येईल, असेही श्री. श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.

            परिषदेचे मुख्य समन्वयक श्री. सिंगला यांनी जी २० परिषदेचे आयोजन भारतासह इटली व इंडोनेशिया या देशांमध्ये एकत्रितरित्या डिसेंबर २०२२ ते पुढे २०२३ या एक वर्षाच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राची संस्कृती, खाद्य संस्कृती, परंपरा, पर्यटन स्थळे याबरोबरच महाराष्ट्राचे विविधांगी दर्शन घडविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. या शहरांचे तसेच पर्यटन स्थळांचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे सांगितले.

            प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर आणि विदेश मंत्रालय सह सचिव श्री. एल रमेश बाबु यांनी परिषदेच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

जल जीवन मिशन

 जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या

योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

314 कोटी रुपयांच्या एकूण 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना मंजूरी.

            मुंबई, दि. 6 : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 2 व जिल्हा परिषदेच्या 253 अशा सुमारे 314 कोटी रुपयांच्या 255 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज मान्यता देण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


            बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणेचे आयुक्त सी. डी. जोशी उपस्थित होते.

            जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून त्यांतर्गत 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई 55 लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या दि.29.06.2022 च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले आहे.


००००



Tuesday, 6 September 2022

पाणी रे पाणी


राज्यातील प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणार

- मंत्री गुलाबराव पाटील.

            मुंबई, दि. ६ : राज्यातील प्रत्येक गावात पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्द‍िष्ट पूर्ण करणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, यापूर्वीही पाणीपुरवठा विभागात काम केल्याचा अनुभव असल्याने ‘हर घर जल, हर घर नल’ हे उद्द‍िष्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्यास मदत होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत राज्याला अपेक्षित असलेले काम पूर्ण करणार असून, ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस पुरेसे पाणी पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, विभागाचे उपसचिव प्रविण पुरी, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, जलजीवन मिशन अभियान संचालक यशवंत ऋषिकेश, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे, आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


                                                                           ०००


 

जादुटोणा विरोधी

 जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवरअशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ६ : समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती - प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या समितीवर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

संस्कारातून रूजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरूष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ, शोषण व त्यांचे जीव वाचणार आहेत. समाजात प्रबोधन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर सात अशासकीय सदस्यांचा नव्याने समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग., चेंबूर, मुंबई ७१ या पत्त्यावर किंवा ०२२-२५२२२०२३, spldswo_mumsub@yahoo.co.in  या मेलवर संपर्क साधावा.


भेटी लागे ;जीवा लागलीस आस


 आमदार भातखळकर यांच्या विविध गणेश मंडळाना भेटी

          कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध गणेश मंडळांना आमदार अतुल भातखळकर यांनी भेटी दिल्या. ठिकठिकाणी तरुण मंडळांनी उभारलेले देखावे पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आमदार भातखळकर यांनी कौतुक केले.

           कांदिवली पूर्व मधील हनुमान नगर, पोईसर, अशोक नगर, स्टेशन रस्ता, म्हाडा लोखंडवाला तसेच मालाड पूर्व मधील दत्त मंदिर रोड, राणीसती रोड, पुष्पा पार्क, धनजीवाडी यासह विविध ठिकाणच्या गणेश मंडळांना आमदार भातखळकर यांनी भेट दिली. श्री गणरायाची आरती करून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. अनेक घरगुती गणेशाचेही दर्शन घेतले. गणेश मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

       श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील ठाकूर कॉम्प्लेक्स, पायोनियर शाळेजवळ तसेच लोखंडवाला येथील कृत्रिम विसर्जन तलावाची पाहणी करून आढावा घेतला. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

       गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील कोकण वासियांसाठी केवळ दोनशे रुपयांमध्ये गावी जाण्यासाठी दहा एसटी बसेसची सोय करून देण्यात आली. याचा लाभ कोकणवासीयांनी घेतला.


    

वाह गणेशजी, देखिये टेक्नॉलॉजी

 बघा देश किती प्रगती करतोय. 😆😆

इथे कोल्हापूरकरांनी गणपती विसर्जनाची मशीन पण आणली.


कोल्हापूर येथील स्वयंचलित गणेश विसर्जन यंत्रणा.

Featured post

Lakshvedhi