Saturday, 13 August 2022

मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्याआयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत.

            मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवरून शनिवार दि.१३ व मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

       या मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणारे उपक्रम, अंगणवाड्यांचा या उपक्रमातील सहभाग, शाळा पूर्व शिक्षण प्रकल्प, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, आदर्श अंगणवाडी योजना, कुपोषणमुक्त गाव ही संकल्पना व त्यासाठी सुरू असलेली कामे, आगामी काळातील विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.  

00000

सल्लागार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ

सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन.

        मुंबई, दि.12 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा व मुलाखती संबंधी कामे करण्यासाठी आयोगास बाह्य माध्यमांची , तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. यास्तव अशा तज्ज्ञ व्यक्तींची माहिती संकलित करण्यासाठी आयोगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर 'ADVISOR PORTAL' विकसित केले असून सदर संगणकीय पोर्टलद्वारे आयोगासाठी वरील कामे करण्यास इच्छुक असलेल्या विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

         ऑनलाईन अर्ज मागविण्यासंबंधी आयोगाने दिनांक 12 ऑगस्ट, 2022 रोजी https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर प्रसिद्धपत्रकातील सूचना व कार्यपद्धतीचे अवलोकन करावे. प्रसिद्धीपत्रकातील कार्यपद्धीतीनुसार इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींनी आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अधिक तपशीलासाठी आयोगाचे https://mpsc.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी असे राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सहसचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


000                   


मा तुझे सलाम

 






ग्रापंचायतीं निवडणूक

 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबरला मतदान थेट सरपंचपदाचाही समावेश

            मुंबई, दि. 12 (रानिआ) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 


            श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


            घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली. 


            विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02. अकोला: अकोट- 07 व बाळापूर- 01. वाशिम : कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे - 01. यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17. पुणे: जुन्नर - 38, आंबेगाव - 18, खेड- 05 व भोर - 02. अहमदनगर: अकोले - 45. लातूर: अहमदपूर - 01. सातारा: वाई- 01 व सातारा - 08 व कोल्हापूर : कागल - 01. एकूण: 608


-0-0-0-



 

भारतीय


 

Teachers transfer


 

वसतिगृह महिलांसाठी

 बोरिवली येथील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन.

             मुंबई, दि. १२ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता बोरिवली येथील वसतिगृहात शासनामार्फत मोफत निवासाची व्यवस्था करण्यात येते. या वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता इच्छुकांकडून १७ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.


         वसतिगृहामधील प्रवेश नियमावली पुढील प्रमाणे आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले नेमणुकीच्या अथवा बदलीच्या आदेशाची प्रत अथवा रूजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल. अर्जदाराचे जवळचे नातेवाईक उदा. आई, वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत राहणारे नसावे, अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न हे रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे. अशा महिलांचे मासिक उत्पन्न यापेक्षा जास्त झाल्यास त्यांना वसतिगृह सोडावे लागेल.काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतिगृहात राहण्याची मुभा राहील. त्यानंतर त्यांना वसतीगृह सोडणे अनिवार्य राहील. वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी रु.५०००/- इतकी अनामत रक्कम म्हणून वसतिगृहाच्या व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल.


          इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज पुढीलप्रमाणे कागदपत्रांसह सादर करावेत. अर्जदार ज्या ठिकाणी काम करीत आहे, तेथील सक्षम अधिकाऱ्याचे दिलेले नेमणुकीचे अथवा बदलीचे आदेश तसेच तेथे रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र,वेतनाचे प्रमाणपत्र,सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने विहीत नमुन्यात दिलेला वैद्यकीय दाखला, दोन पासपोर्ट फोटो, ओळखपत्र (पासपोर्ट आधारकार्ड/संबंधित पत्र) आवश्यक आहे.


     याबाबत अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे


0000



 

Featured post

Lakshvedhi