Thursday, 30 June 2022

 विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे

पुनर्गठीत करणार.

            राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ या तिन्ही प्रादेशिक विकास मंडळांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            ही मंडळे पुर्नगठीत करण्यासंदर्भातील विनंती केंद्र शासनाला करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येईल. सध्याच्या मंडळाचा कालावधी 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आला आहे. 



 कर्जत येथे दिवाणी न्यायालय स्थापण्यास मान्यता

            अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            या न्यायालयासाठी 16 नियमित आणि 3 बाह्य यंत्रणेद्धारे 19 पदे निर्माण करण्यात येतील. या न्यायालयाच्या स्थापनेसाठी एक कोटी 23 लाख 57 हजार 834 इतका खर्च येईल. सध्या कर्जत व जामखेड येथील प्रकरणे श्रीगोंदा न्यायालयाकडे सुरु आहे. कर्जत ते श्रीगोंदा हे अंतर 45 कि.मी. असून जामखेड ते श्रीगोंदा हे अंतर 90 कि.मी. आहे, त्यामुळे पक्षकारांची गैरसोय होते.


-

 अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या

सुधारित खर्चास मान्यता

            अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यात राज्य शासनाचा आर्थिक हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या 4 हजार 805 कोटी 17 लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास आज बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच या प्रकल्पासाठीचा राज्य शासनाचा 2 हजार 402 कोटी 59 लाख रुपयांचा 50 टक्के इतका हिस्सा केंद्र शासनास निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने देण्यात येईल.

-----०-----

हळद

 राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण

हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र

            राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            राज्यात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण निश्चित करण्यासाठी गठित केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींस तत्वत: मान्यता देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यामध्ये मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रʼ कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या केंद्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

------०------

 नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांसाठी

अधिसंख्य पदे निर्माण करणार

            निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळाल्याने बाधित झालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्र. ३१२३/२०२० मध्ये झालेल्या निर्णयामुळे बाधित उमेदवारांना संरक्षण देण्यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द केले होते.

नामकरण

 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव

करण्याबाबत मान्यता

            औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

-----०-----

नगर विकास विभाग

नवी मुंबईतील विमानतळाचे नामकरण

लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यास मान्यता

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसीत करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

            नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----०-----


 

Wednesday, 29 June 2022

 सांख्यिकी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा

- अपर मुख्य सचिव नितिन गद्रे

            मुंबई दि. 29 :- सर्व क्षेत्रात सांख्यिकी अपरिहार्य आहे. राज्यासाठी विविध योजना तयार करताना सांख्यिकीचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. शाश्वत विकासासाठी सांख्यिकी संकल्पनेस अनुसरून अचूक, विश्वासार्ह, वेळेत आकडेवारी प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी व्यक्त केले.

            अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास खादी व ग्रामोद्योग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा, कामगार आयुक्त सुरेश जाधव, संचालनालयाच्या उपमहानिदेशक सुप्रिया रॉय, संचालक विजय अहेर यांसह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            श्री. नितिन गद्रे म्हणाले, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ ही आहे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचे मुख्य स्त्रोत सांख्यिकी असते. त्यामुळे अचूक माहितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील स्त्रोतांचा अभ्यास करून नागरिकांसाठी माहिती उपलब्ध करण्यात येते. यामध्ये सांख्यिकी विभागाची भूमिका महत्त्वाची असते. कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी संकटाला न घाबरता जबाबदारी पार पाडली.

            यावेळी श्री.गद्रे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांख्यिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कौशल्याचा वापर करुन विशेष, नियोजनबद्ध कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सांख्यिकी संचालनालयामार्फत विविध सांख्यिकी अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

०००

Featured post

Lakshvedhi