Wednesday, 29 June 2022

ग्रामपंचायत निवडणूक

 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

            मुंबई, दि. 29 (रानिआ) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. 

            श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.


            विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6. धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6. अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3. पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2. सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4. सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1. सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2. बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5. लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4. उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3. एकूण- 271.       


-0-0-0-



 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३ जुलै रोजी

            मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जुलै २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण / पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जय महाराष्ट्र गणेश मैदान, महापालिका शाळा क्र.२, चिराग नगर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, पारशीवाडी, घाटकोपर (पश्चिम), मुंबई येथे ०३ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर व मुंबई शहर यांचेवतीने करण्यात आले आहे.


00000



 प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी

27 चित्रपटांना 8 कोटी 65 लाख रुपये

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख .

            मुंबई, दि. 29 : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण 23 चित्रपटांसाठी तसेच 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर 2 चित्रपट अशा एकूण 27 चित्रपटांकरिता प्राथमिक टप्प्यात 8 कोटी 65 लाख रुपये इतक्या रकमेचे अनुदान संबंधित निर्माते/ निर्मितीसंस्था यांना धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी दिली आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे मराठी चित्रपट निर्मात्यांना देण्यात येणारे अनुदानाचे वाटप याबाबतचा विषय महामंडळाच्या संचालक बैठकीत घेण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी संबंधितांना अनुदान वाटपासंदर्भातील सूचना दिल्या. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत महामंडळाकडे अर्थसहाय्यासाठी प्राप्त झालेल्या चित्रपटांपैकी 55 चित्रपटांचे परिक्षण 5 जानेवारी 2022 ते 8 जानेवारी 2022 या काळात, 10 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2022 आणि 17 जानेवारी 2022 ते 21 जानेवारी 2022 या काळात शासनाने गठित केलेल्या चित्रपट परिक्षण समितीकडून पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी मुंबई येथे करण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेनुसार "अ" दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता 40 लाख रुपये इतके अनुदान आणि "ब" दर्जा प्राप्त चित्रपटांकरता 30 लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना 71 च्या पुढे गुण असतील त्यांना "अ" दर्जा व 51 ते 70 गुण असणाऱ्या चित्रपटांना "ब" दर्जा देण्यात येतो. ज्या चित्रपटाला 51 पेक्षा कमी गुण मिळतील तो चित्रपट अपात्र असेल व त्यास कोणतेही अर्थसहाय्य अनुज्ञेय राहणार नाही असे निकष ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार / आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परिक्षणाशिवाय आपोआपच "अ" दर्जा बहाल होतो मात्र चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता होत असल्यास त्यास "अ" दर्जा प्रमाणे अर्थसहाय्य लागू होते.

            27 नोव्हेंबर 1997 च्या शासन निर्णयानुसार दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या मूळ शासन निर्णयामध्ये 30 ऑक्टोबर 2013 आणि 8 ऑगस्ट 2018 अन्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. 30 ऑक्टोबर 2013 आणि 3 मे 2013 रोजी किंवा त्यानंतरच्या दिनांकास जे मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्ड प्रमाणीत होतील अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी एक हजार रुपये किंवा वेळोवेळी शासन निश्चित करेल एवढे शुल्क जमा केल्यानंतर अर्थसहाय्याचा विहीत नमुन्यातील अर्ज महामंडळाकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. 3 मे 2013 पूर्वी सेन्सॉर बोर्ड प्रमाणित होणारे मराठी चित्रपट जुन्या योजनेप्रमाणे म्हणजे 11 ऑक्टोबर 2005 अन्वये पात्र राहतील.


                                           

मतदार यादी

 महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

            मुंबई, दि. 29 (रानिआ) : विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

            बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ‘ट्रू-व्होटर’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

            महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ‘ट्रू- व्होटर’ मोबाईल ॲप ‘प्ले स्टोअर’वरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. ‘व्होटर लीस्ट’ सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी ‘व्होटर लीस्ट ऑबजेक्शन’ यावर क्लिक करून ‘व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022’ निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.

            विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

-0-0-0-



तेथे कर माझे जुळती

 " येथे कर आमुचे जुळती ". जेव्हा डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनी कुन्नूरला भेट दिली होती. तेथे पोचल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की, फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅ हे येथील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये भरती आहेत. राष्ट्रपतींच्या त्यादिवशीच्या शासकीय अधिकृत दिनचर्येमध्ये सामाविष्ट नसतानाही डॉक्टर अब्दुल कलामांनी सॅम यांची भेट घेण्याचे ठरवले. तशी ताबडतोब व्यवस्थाही करण्यात आली. सॅम यांच्या रुग्णालयातील बेड शेजारी कलामांनी पंधरा मिनिट बसून सॅम यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निघताना कलामांनी त्यांना विचारले की, आपण व्यवस्थित आहात का? आपणास कशाची आवश्यकता आहे का? आपली काही तक्रार आहे का? मी आपणास काही मदत करू शकतो का? यावर सॅम म्हणाले, 'हो महामहिम, माझी एक तक्रार आहे'. कलामांना हे ऐकून धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ विचारले, कोणती तक्रार आहे? सॅम म्हणाले, 'सर मी उठून उभा राहू शकत नाही आणि माझ्या प्राणप्रिय देशाच्या आदरणीय राष्ट्रपतींना मी सॅल्युट करू शकत नाही हीच माझी एकमेव तक्रार आहे.' कलामांनी भावनावेगाने त्यांचे दोन्ही तळवे हातात घेतले आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू तरळून गेले. या भेटीच्या दरम्यान कलामांना माहिती मिळाली की सॅम यांना फिल्डमार्शल या या पदाची गेल्या वीस वर्षापासून पेन्शन मिळालेली नाही. कलामांनी दिल्लीला पोचल्याबरोबर एका आठवड्यात त्यांची सर्व थकबाकी सह पेन्शन मंजूर केली आणि 1.25 कोटीचा चेक त्यांनी संरक्षण खात्याच्या सचिवांमार्फत विशेष विमानाने वेलिंग्टन,ऊटी येथे पाठवला. त्यावेळेस तेथे सॅम उपचार घेत होते. हे कलामांचं मोठेपण होतं. पण नंतर सॅम यांनी त्या चेक ची रक्कम आर्मी रिलीफ फंडामध्ये दान केली. आपण नतमस्तक कुणासमोर व्हायचे? दोघेही महानच आहेत 🌼🌼🌼

, मंदिर

 *Fact today*

*चिदंबरम रहस्यम*

*गुगल मुळे आपल्या लक्षात आले की भारतातील ५ प्राचीन शिवमंदिरे एका अक्षात उभी आहेत. यातील एक आहे चिदंबरम शिवमंदिर.*

*दहाव्या शतकात चोल राजांनी पाषाण आणि सुवर्ण वापरून या मंदिराची निर्मिती केली होती. श्री. थिरुमुलर या कवी आणि शास्त्रज्ञाने ५००० वर्षांपूर्वी "थिरुमंदिरम्" हा ग्रंथ लिहिला होता. यात मंदिर निर्माण करण्यासाठी शास्त्र सांगितले आहे. ते सांगताना नटराज रुपात शिवाच्या उजव्या पायाचा अंगठा नेहमी पृथ्वीच्या सर्वात जास्त चुंबकीय प्रभाव असलेल्या भागावर असतो हे नमुद केले आहे.*

*चिदंबरम मंदिर बांधताना थिरुमंदिरम् या ग्रंथाचा आधार घेतला गेला.*

*१. हे मंदिर सर्वोच्च चुंबकीय क्षेत्र असलेल्या अक्षावर बांधले गेले.*

*२. या अक्षावरची पाच मंदिरे ही पंचमहाभूतांची स्थाने आहेत. चिदंबरम म्हणजे आकाश तत्वाचे मंदिर, कलाहस्ती हे वायू तत्वाचे मंदिर, कांची एकांबरेश्वर हे पृथ्वी तत्वाचे मंदिर ४९ डिग्री, ४१ मिनिटे रेखांश वर आहेत.*

*३. या मंदिराला ९ दरवाजे आहेत जे मानवी शरीरातील ९ दरवाजे दाखवतात.*

*४. या मंदिराच्या गोपूरासाठी २१६०० सोन्याचे पत्रे वापरले गेले. मनुष्य एका दिवसात २१६०० वेळा श्वास घेतो.*

*५. हे सुवर्ण पत्रे बसवण्यासाठी ७२००० सोन्याचे खिळे वापरले गेले. मनुष्याच्या शरीरात ७२००० नसा असतात.*


*६. या मंदिराचे सभापटल म्हणजे पोनंबलम् आणि या तामीळ शब्दाचा अर्थ सुवर्णाचा हॉल. हेच नाव पुरुषांचे देखील असते. या मंदिराचे सभापटल डाव्या बाजूला आहे (मधोमध नाही) कारण मनुष्याचे ह्रदय डाव्या बाजूला असते.*

*७. या सभागृहात जाण्यासाठी ५ पायऱ्या आहेत. याला पंचाक्षर पदी म्हणतात. शि. वा. या. न. मः.*

*८. या मंदिराच्या दरबाराला कनघासाबाई म्हणतात. याचा अर्थ सुवर्ण दरबार. कनघ् म्हणजे सुवर्ण, साबाई म्हणजे दरबार. हा चार खांबांवर उभा आहे. चार खांब चार वेद आहेत. वेद म्हणजे ज्ञान. शिवाचा दरबार देखील ज्ञानाच्या आधारावर उभा आहे.*


*९. पोनंबलम् वर २८ खांब आहेत जे २८ आगम् दर्शवितात आणि या खांबांवर ६४ आडव्या बीम आहेत ज्या ६४ कला दर्शवितात.*

*१०. सुवर्ण पत्र्यांचे गोपूरावर ९ कळस आहेत जे उर्जेचे ९ प्रकार दाखवतात.*

*११. अर्थ मंडप चे ६ खांब हे ६ शास्त्रे दाखवतात.*

*१२. अर्थ मंडपाशेजारी आणखी एक मंडप आहे ज्याला १८ खांब आहेत, जे १८ पुराने दाखवतात.*

*एवढी सगळी माहिती तेथील सांगणाऱ्या कडून लिहून घ्यावी लागली कारण ती लक्षात राहणे अशक्य होते.*

*आपले शरीर हेच मंदिर आहे आणि आत्मा हाच शिव आहे असेच चिदंबरम मंदिर सांगतो, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल हेच सर्व विद्वान सांगत आहेत. कोणीतरी एकाने असे सांगितले आहे असे मुळीच नाही.*👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

अधिवेशन


विधानसभेचे विशेष अधिवेशन ३० जूनला

 सर्व सदस्यांना सूचना जारी.

            मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या गुरूवार, दिनांक ३० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता विधान भवन, मुंबई येथे अभिनिमंत्रित करण्यात आले आहे. सर्व विधानसभा सदस्यांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयामार्फत सूचित करण्यात आले असून सर्वांनी सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. राज्यपाल यांच्या निदेशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


0000


 



Featured post

Lakshvedhi