Thursday, 23 June 2022

अल्पसंख्यक विद्यार्थी योजना

 राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. 23 : राज्यातील 14 शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा), सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) तसेच शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे अल्पसंख्याकांसाठी विशेष तुकडी सुरु असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.


            विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी 1 हजार 155 जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित तंत्रनिकेतनमध्येही प्रवेशाचा हक्क आहे. विशेष तुकड्यांमध्ये मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटींग टेक्नॉलॉजी अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा उपलब्ध आहेत.


            विद्यार्थ्यांना वार्षिक 7 हजार 750 रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाची संधी आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचीही संधी मिळणार असून केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत तर राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी 8 लाख रूपयांपर्यंत आहे. अर्ज भरण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये तर मागासवर्गीयांसाठी 300 रुपये इतके आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कालावधी 30 जून 2022 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ https://poly२२.dte.maharashtra.gov.in तसेच ०२२- ६८५९७४३०, 8698781669, 8698742360 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००







 

 उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे


अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा.

            मुंबई, दि. 23 : खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त ठेवतात. खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडूवृत्तीने वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्याने महाराष्ट्रात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिम्पिक दिनी करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

          उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, आज जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा करत असताना, 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधवांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक महाराष्ट्राने मिळवून दिले होते. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. त्यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी, राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या क्रीडा विभागाकडून विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या प्रयत्नांना नक्कीच यश येईल. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू देशासाठी पदके जिंकतील, असा मला विश्वास आहे.


          जागतिक ऑलिम्पिक संघटना असो की महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.

०००००



जीवन ऐसे नाव

 





गोंद्या आला रे

 



 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दीपेंद्र सिंह कुशवाह यांची मुलाखत

            मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

       गुरुवार, दि. 23 जून 2022 रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

            महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात आपला स्वतःचा एक मापदंड निर्माण केला आहे. देशाच्या प्रगतीचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक स्टार्ट अप निर्माण झाले आहेत. नवीन उद्योजक तयार व्हावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत असून, सोसायटीचे कार्य, त्याचे नवउद्योजक, रोजगार निर्मितीसाठीचे प्रयत्न याविषयी सविस्तर माहिती दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.


००००


जल जिवन मिशन

 जल जीवन मिशनच्या 37 हजार 227 कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

            मुंबई, दि. २२ : मार्च, २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.


            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी एकूण रु. ३७,२२७.५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यात ३७,९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यानुसार ग्रामीण भागातील एकूण १,४६,०८,५३२ कुटूंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी या कार्यक्रमाचा रु.१५,६३३.५० कोटी खर्चाचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण २७,३६,७७५ इतक्या कुटूंबांना नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित १५,१९,१७९ कुटूंबांना सन २०२३-२४ मध्ये नळ जोडण्या देण्यात येणार आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १,०४,१६,८६८ इतक्या नळजोडण्या देण्यात आल्या आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.


            या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जल जीवन मिशन अभियान संचालक व इतर अधिकारी मंत्रालयात उपस्थित होते.


००००


 

Featured post

Lakshvedhi