Sunday, 12 June 2022

ईशा फाउंडेशन




 युरोप - भारत शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत व्हावे

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत युरोप दिन संपन्न

            मुंबई, दि. 12 : युरोप भारताचा महत्वाचा भागीदार असून भारत आणि युरोपीय देशांमध्ये पर्यावरण, संरक्षण व स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात मोठे सहकार्य सुरू आहे. युरोप जगातील सर्वात मोठी व्यापारी पेठ असून भारताला देखील युरोपशी व्यापाराचा मोठा इतिहास आहे. भारत व युरोपीय देशांमधील संबंध केवळ व्यापार व गुंतवणूक या विषयांपुरते मर्यादित न राहता उभयपक्षी शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध देखील वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे आज व्यक्त केली. 

            भारत आणि युरोपीय समुदायांमधील संबंध स्थापन होण्याला ६० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कौन्सिल ऑफ युरोपियन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन इंडिया या संस्थेतर्फे शुक्रवारी मुंबईत 'युरोप दिन 2022' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

            कार्यक्रमाला युरोपिअन युनिअनच्या भारतातील व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर, युरोपिअन युनिअन चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनीष भटनागर, फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले, चेंबरच्या संचालक श्रीमती डॉ. रेणू शोम तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व उद्योग-व्यापार प्रतिनिधी उपस्थित होते. 

            महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने युरोपमधील विद्यापीठे तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये सहकार्य अधिक वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात राज्यपालांनी युरोपिअन युनिअन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या कार्याचे कौतुक केले.     

युरोपीय समुदाय भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार असल्याचे सांगून फ्रांस व भारत राजनैतीक सहकार्याची 75 वर्षे साजरी करीत असतानाच युरोपिअन युनिअन व भारत आपल्या सहकार्याची 60 वर्षे साजरी करीत आहे हा चांगला योगायोग आहे, असे फ्रान्सचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शर्ले म्हणाले. 

            भारत व युरोपीय देशांचा व्यापार 100 अब्ज डॉलर इतका असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी योग्य संधी आताच असल्याचे युरोपियन युनियनच्या व्यापार व आर्थिक शिष्टमंडळाच्या प्रमुख रेनिता भास्कर यांनी यावेळी सांगितले. डॉ रेणू शोम यांनी आभार प्रदर्शन केले.

**

Maharashtra Governor attends Europe Day celebrations on 60th anniversary of Indo - EU diplomatic relations

Mumbai, 12 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Europe Day 2022 celebrations organised to mark the 60 years of diplomatic relations between European Union and India. The Europe Day celebrations was organised by the Council of EU Chambers of Commerce in India in Mumbai on Friday (10th).

Founder President of the EU Chambers Manish Bhatnagar, Minister Counsellor - Head of Trade and Economic Affairs, Delegation of European Union to India Renita Bhaskar, Consul General of France in Mumbai Jean Mark Sere Charlet, Director of EU Chambers Dr Renu Shom and Consul Generals of various countries were present on the occasion.

Speaking on the occasion, Governor Koshyari called upon European Union countries to also enhance their cooperation in the areas of culture and education while promoting trade and investment with India.

***


 


 


 



शिक्षण हकक

 शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार.

-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

            मुंबई, दि. 12- ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. 

            नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.

            मागील काही कालावधीत कोविडमुळे शाळा अनेक दिवस बंद होत्या. या काळात स्थलांतराचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत दाखल मुले व शाळाबाह्य मुले यांचा शोध घेण्याची आवश्यकता अधिक भासू लागली. यासाठी शाळाबाह्य, स्थलांतरित, अनियमित मुलांच्या नोंदणी व शिक्षणासाठी शालेय शिक्षण विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालरक्षक’ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भातील कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या 6 ते 14 वयोगटातील बालकांची संख्या 7806 होती, ज्यामध्ये 4076 मुले आणि 3730 मुलींचा समावेश होता. तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या 17 हजार 397 होती. यामध्ये 9008 मुले तर 8389 इतक्या मुली आहेत. दोन्ही मिळून ही संख्या 25 हजार 204 इतकी आहे. यापैकी विशेष गरजाधिष्ठित असलेल्या बालकांची संख्या 1212, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या बालकांची संख्या 288 तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या 23 हजार 704 इतकी आहे.

            शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे तसेच कोविडमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली असून वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी ‘शिक्षक मार्गदर्शिका’ या पूरक शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

            शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळेत दाखल होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सहाय्य म्हणून विषयनिहाय व्हिडीओ निर्मिती करण्याचे नियोजन आहे. तर शाळाबाह्य मुलांचा शोध व त्यांना मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी बालरक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.

00000



माती वाचवा





 

माती वाचवा

 माती वाचवा अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत

                                         - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सदगुरु जग्गी वासुदेव मुख्यमंत्र्यांना भेटले.

            मुंबई दि 12 : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन 'माती वाचवा' या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयाही सांगितले. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. 

            पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सदगुरु जग्गी यांच्याकडून मोहिमेदरम्यान आलेले अनुभव यावेळी जाणून घेतले तसेच पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात व्यापक स्तरावर काम सुरू आहे असे सांगितले. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राघवेंद्र शास्त्री व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

            मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 27 देशांमधून 25000 किमीची यात्रा त्यांनी पूर्ण केली असून देशातल्या 5 राज्यांतून फिरत ते महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.


 

मिसाळ पाव

 बशीतल्या पावाला...

मिसळ म्हणाली लाजून

असा दूर का उभा तू

मी तुझ्यासाठी बसले सजून

पाव म्हणाला दुःखी होऊन

तू तर तिखटजाळ...

सांग कशी जुळायची

तुझी आणि माझी नाळ

मी असा पांढरा फटक

तू किती छान सजली

गालावरती गं तुझ्या

टोमॅटोची लाली

कोथिंबीरीचा हिरवा शालू

नवरी छान लाजली...

दंडात रुतली गं तुझ्या

कांद्याची लाल चोळी...

मिसळ म्हणे पावराजा

असं काही नसतं

एकदा प्रेम झालं की,

ते कोणावरही बरसतं...

तू किती साधा अन 

तू किती सिम्पल...

तूच माझा ऋषी अन

मी तुझी डिंपल.....

पाव म्हणाला मिसळीला

आता आपलं एकच गांव

तुला मला एकच नांव

मिसळपाव मिसळपाव.....

For all misal lovers

पू ल ते फुल्ल

 *पु.ल.देशपांडे**निधन : १२ जून,२०००*

जगभर जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे पु.ल. देखील पोचले आहेतच. अगदी दक्षिण ध्रुवावर असलेल्या दक्षिण गंगोत्री या भारतीय तळावर असलेल्या मराठी माणसांनी सोबत पुलंची पुस्तके नेली आहेत. असे भाग्य अन्य कोणाला लाभले नसावे. त्यांच्या साहित्या व्यतिरिक्त, त्यांचे किस्से ,कोट्या आणि विचार,त्याच बरोबर त्यांनी संगीत दिलेल्या आणि गायलेल्या काही गाण्यांबद्दल माहिती त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींचा जागर करताना देतो आहे.

 *कोट्या*  

*मामा नावाची गंमत*

गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’


*भारती मालवणकर*


पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.


*माणिक वर्मा*


माणिकबाईंचा विवाह फिल्म्स डिव्हिजनमधील अमर वर्मा यांच्याशी झाला. लग्नाची बातमी जेव्हा संगीत जगतात पसरली, तेव्हा काहींनी माणिकताईंचे अभिनंदन केले. काहींनी नाराजी व्यक्त केली. पण या विवाहामुळे जी खळबळ माजली होती, त्यावर पु. लं.नी केलेल्या खुमासदार कोटीमुळे धमाल उडाली . ‘अमर वर्मा यांच्याशी माणिक दादरकर यांचा विवाह होत आहे,’ असे पु.लं.ना जेव्हा सांगण्यात आले. तेव्हा पु.ल.पटकन म्हणाले, ‘माणिकने वर्मावर घाव घातला की.


*किस्से*


 *गुळाचा गणपती*


पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे 'गुळाचा गणपती' त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा,पटकथा,संवाद,गीते, संगीत आणि दिग्दर्शन,एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला. 


*प्रतिशब्द*


मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘एअर होस्टेस ला आपण ‘हवाई सुंदरी’ म्हणतो,तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘उडपी’ का म्हणू नये ?’



*संजय उवाच*


आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,'मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला’


*माझ्या बंधू आणि भगिनींनो*


पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.


भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे.


’त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,‘बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’



*द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती*


तुमचं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारल्यावर ते म्हणाले . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय, असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो, ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती


*हवाई गंधर्व*


पंडित भीमसेन जोशी यांचे साऱ्या देशभर आणि परदेशात सारखे दौरे सुरु असायचे. त्या मुळे त्यांच्या वारंवार होणाऱ्या विमानप्रवासांमुळे त्यांना पु. ल. देशपांडे यांनी गमतीने ‘हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती.



*पु. लं चे विचार*


जगा इतके की आयुष्य कमी पडेल. 

हसा इतके की आनंद कमी पडेल.


भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो.


खरं तर सगळे कागद सारखेच. फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.


काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे मी मी म्हणणारे देखील हतबल होतात.


चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते,मित्रांना नाही.




*संगीतकार पु.ल*

पुलंनी खूप गाण्यांना अतिशय सुंदर संगीत दिलं आहे.त्या मुळे ही गाणी श्रवणीय झाली आहेत.त्यांनी संगीत दिलेली काही गाणी


इंद्रायणी काठी देवाची आळंदी

कबीराचे विणतो शेले

तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग

माझे जीवन गाणे

नाच रे मोरा आंब्याच्या वनात

शब्दावाचून कळले सारे

हसले मनी चांदणे

ही कुणी छेडिली तार


*गायक पु.ल.*

पुलंनी काही गाणी देखील गायली आहेत


जा जा ग सखी जाऊन

पाखरा जा त्यजूनिया प्रेमळ शीतल छाया

बाई या पावसानं

ललना कुसुम कोमला


तुमच्या आमच्या सर्वांच्या 

पुलंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन .


🌺🙏🏻🌺

झुमका गिरा रे


 *‘मेरा साया’* हा सिनेमा १९६६ चा. *'झुमका गिरा रे बरेली के बाजार में...!’* हे या सिनेमातील अतिशय गाजलेले गाणे. या गाण्यात *बरेलीच्या बाजारात नायिकेचा झुमका हरवलाय. पण ५४ वर्षांनी तो सापडला आहे.* आता तो पहायला बरेलीलाच जावे लागेल. 


 *बरेली हे उत्तरप्रदेशातील एक शहर.* ५४ वर्षापूर्वी केवळ या गाण्यामुळे संपूर्ण भारतात प्रसिद्धिस आले. 

त्याबद्दल *बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एन एच २४ वर झीरो पॉइंट येथे एक झुमका उभा केलेला आहे. त्याची ऊंची १४ फूट व वजन आहे २०० किलोग्रॅम. पितळ व तांब्याचा हा झुमका बनवला आहे गुडगावच्या एका कारागिराने. त्याची किंमत आहे १८ लाख रुपये.*       

 या ठिकाणांचे नाव आहे *“झुमका तिराहा.”* ५४ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये झुमक्याचे हे स्मारक उभे राहिले आणि आता पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे. 

            

या गाण्याचे गीतकार आहेत *राजा मेहंदी अली खान.* गायिका *आशा*, संगीतकार – *मदन मोहन.* पडद्यावर गीत सादर केलय बहारदार नृत्य करून *दिवंगत साधनाने.*

 ‘मेरा साया’ (१९६६) हा सिनेमा मराठी ‘पाठलाग’ (१९६४) या सिनेमावरुन काढणेत आला. मूळ सिनेमाच्या कथेशी गाण्यातील बरेली या शहराचा दुरान्वयेही संबंध नाही.

 

*पण बरेली गावात झुमका पडल्याची कहाणी मात्र अगदी खरी आहे.* 

आणि त्या कहाणीचा संबंध आहे *अभिताभ बच्चन परिवाराशी.* 

अभिताभ यांचे पिताश्री हरिवंशराय बच्चन व मातोश्री तेजी ( माहेरचे आडनाव- सूरी) यांची पहिली भेट बरेलीला एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. त्यावेळी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात हरिवंशराय यांना एखादी कविता म्हणण्याचा आग्रह झाला. त्यांनी कविता अतिशय सुंदररित्या सादर केली. ती ऐकून तेजी यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. हरिवंशराय यांचे डोळे तेजी यांची ही अवस्था पाहून भरून आले. या पहिल्या *कविताभेटीचे* रूपांतर नंतर एका *प्रेमकथेत* झाले. पण त्यांच्या लग्नाची बातमी येत नसल्याने सारे मित्र नेहमी चौकशी करीत. गीतकार राजा मेहंदी दोघांचेही चांगले मित्र होते. त्यांनी पण एकदा तेजी यांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या, “मेरा झुमका तो बरेली के बाजार में गिर गया है..!” लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजी यांनी केलेले हे विधान राजा मेहंदी यांच्या अगदी डोक्यात बसले होते. 

जेव्हा मेरा साया चित्रपटाची गाणी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना तेजी यांच्या या वाक्याची आठवण झाली. त्या वाक्यावर त्यांनी हे गाणे पूर्ण लिहिले. आणि या गाण्याने बरेली शहराला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याचे उतराई होण्यासाठी बरेली गावात ५४ वर्षांनी(२०२०) हा हरवलेला झुमका उभा राहिलाय. 

         सिनेमाची कथा वेगळीच आहे. या गाण्याचा व त्या बरेली गावाचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. बरेलीमध्ये पहिली भेट झाली अभिताभ यांच्या मात्या -पित्याची. त्यांचाही या सिनेमाशी काहीएक संबंध नाही. 

*कशाचाही कशाशीही संबंध नसताना आज एका सिनेगीताचे-कलाकृतीचे असे अविस्मरणीय स्मारक उभे राहते ही आश्चर्यकारक घटना आपल्या बॉलीवुड मध्येच घडू शकते.*

 *त्यावेळचे हे प्रतिभावान कलाकार त्यांच्या स्पर्शाने कोणत्याही घटनेला व त्यावर आधारीत कलाकृतीला अजरामर करून टाकत असत. अशा अनेक उदाहरणापैकी हे एक...!🙏*

Featured post

Lakshvedhi