Saturday, 28 May 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त अभिवादन.

            मुंबई, दि. 28:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

            वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, "स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावान साहित्यिक, परखड वक्ते आणि उत्कृष्ट असे संघटक होते. उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात रान उठवले. त्यांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन."

 देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्रासह पुण्याचे महत्त्वाचे योगदान

                                             - राष्ट्रपती राम नाथ कोविंद


· कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे उद्घाटन

             पुणे, दि.27 : महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असून, यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

            कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.

            महाराष्ट्राची संतपरंपरा, छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्थापित हिंदवी स्वराज्य, राज्यातील राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक परंपरांचा आढावा घेताना राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, महाराष्ट्र मध्यकाळापासूनच यामध्ये अग्रेसर राहिला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास स्वामी आदींनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना किंवा मराठी सरदारांची अटकेपार स्वारी या अभूतपूर्व घटना होत्या.

            सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमितून शोषित, वंचितांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले, असेही श्री. कोविंद यांनी नमूद केले.

दगडूशेठ परिवाराचे योगदान

            श्री. कोविंद पुढे म्हणाले, दगडूशेठ हलवाई परिवारातर्फे स्थापित गणपती मंदिराद्वारे स्व. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळक यांच्यासमवेत गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव इंग्रज सरकारविरोधात राष्ट्रवाद तसेच सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उदयास आला. या माध्यमातून दगडूशेठ परिवाराने देशाच्या राष्ट्रीय, राजकीय क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.

            सामाजिक तसेच धार्मिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून केल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याची माहिती मिळून आनंद झाल्याचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी सांगितले. निर्धन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनाथालये तसेच वृद्धाश्रमामध्ये मोफत जेवण आदी अनेक कल्याणकारी कार्य या ट्रस्टकडून केले जाते. कोविड काळात गरजूंना भोजन वितरण तसेच मुस्लिम बांधवांकडून आपल्या जीवाची पर्वा न करता कोविडमुळे मृत्यू पावलेल्या अनेक हिंदूवर अंतिम संस्कार केल्याचे समजले. अशा कार्यामुळे सामाजिक सद्भावना आणि एकात्मतेला बळ मिळते, असेही ते म्हणाले.

            माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील म्हणाल्या, स्व. दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई हलवाई हे परोपकारी आणि सधन दाम्पत्य होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून अनेक महत्त्वाच्या बैठका त्यांच्या हवेलीमध्ये होत असत. त्यांनी स्थापन केलेले गणपती मंदिर प्रसिद्ध झाले असून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टमार्फत ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी मोफत जेवण आदी अनेक समाजउपयोगी कार्ये केली जातात असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू आणि राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पी. पाटील, बोन्साय कला आणि पर्यावरण जागृती विषयात पहिली डॉक्टरेट केलेल्या डॉ. प्राजक्ता काळे यांना लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

            ॲड. प्रताप परदेशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि दत्त मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.

            यावेळी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांच्या हस्ते 'लक्ष्मी दत्त' नावाच्या कॉफी टेबल बुकचे अनावरण होवून राष्ट्रपती श्री. कोविंद यांना त्याची प्रत देण्यात आली. यावेळी श्रीमती प्रतिभा पाटील यांना 2021 मध्ये प्राप्त झालेला मेक्सिको देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद यांना राष्ट्रपती भवनच्या संग्रहालयात ठेवण्यासाठी सुपूर्द केला.

            प्रारंभी दत्त मंदिराच्या आणि ट्रस्टच्या स्थापनेबाबतचा इतिहास, ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत चित्रफीत दाखवण्यात आली.


           

 Never be ashamed of your tears. Be proud that you are still natural. Be proud that you can express the inexpressible through your tears.


 


देशी गाय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे काम व्हावे

-उपमुख्यमंत्री अजित पवार

· देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी देणार

· उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोधन-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन

            पुणे दि.27: भारतीय समाज व्यवस्थेत गोवंशाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशी जातीच्या गोवंश संवर्धनाचे काम व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

            शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्यावतीने 27 ते 29 मे या कालावधीत आयोजित गोवंश-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरू आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातवरण आहे, यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

गोवंश जपून शेतकरी समृद्ध करण्यासाठी शासनाचे सहकार्य

            आपल्या संस्कृतीत देशी गाईला अन्यन्यसाधारण महत्व आहे. देशी गायींचे गोमुत्र, शेण, सेंद्रिय खत, तुप, दुध, खवा यांनाही वेगळे महत्व आहे. आरोग्याच्यादृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक ठरतात, शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही श्री.पवार म्हणाले.

            दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगही महत्त्वाचे आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन होते, या केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्राला भेट द्यावी. देशी गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाबाबत चांगल्या जाती, त्यांचे वैशिष्ट्य तसेच नवीन संशोधन याबाबत माहिती मिळणार आहे, शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत देशी गोवंश संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

            सकाळ-ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. यावेळी पशुपालक शेतकरी गोशाळांचे पदाधिकारी,पशुतज्ज्ञ, डेअरी संस्थांचे प्रतिनिधी तसेच कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

गोधनाची माहिती देणारे प्रदर्शन

            गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीतील गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.


            त्यासोबतच देशी गाईंचे संगोपन, व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती आणि प्रात्यक्षिके, पशुखाद्य निर्मिती तंत्र आणि यंत्राचे प्रात्यक्षिक, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यंत्रणा तसेच विक्री तंत्राची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हंगामी, बहुवार्षिक चारा लागवड प्रक्षेत्र भेट, मुरघास निर्मिती तंत्र आणि यंत्रांचे प्रात्यक्षिक, शेण, गोमूत्र स्लरी जैविक मिश्रण, गोखर खत, व्हर्मिवॉश, गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिके, शेणापासून मूल्यवर्धन, कुंड्या, पणती, मूर्ती, भेटवस्तू निर्मिती, बायोगॅस संयंत्राचे प्रकार आणि गॅस निर्मिती तंत्र, सौरऊर्जा वापराचे तंत्र याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि यंत्रेदेखील प्रदर्शित करण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्र्याकडून गोवंश प्रदर्शनाची पाहणी आणि संवाद

            सकाळी साडेसातच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच उपमुख्यमंत्री श्री. पवार प्रदर्शनस्थळी पोहचले. देशी गाईंच्या गोठा व्यवस्थापनातील बारकावे, जनावरांचे औषधोपचार, जैव मिश्रण, देशी गाईंच्या शेणखताचा उपयोग, गोमुत्राचाउपयोग, व्हमिवॉश तसेच दुग्धव्यवसायाच्या तसेच गोसंवर्धनाच्या संदर्भातील बारकाव्याबाबत त्यांनी संबंधितांना प्रश्न विचारले. ट्रॅक्टर संचलित मुरघास यंत्र, आजारी असताना जनावरे उचलणी यंत्र तसेच  नवीन अवजारांचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.

            दुधापासून पदार्थ तयार करण्यात येत असलेल्या विभागाचीही त्यांनी पाहणी केली

मजूर महिलांची विचार

            चाराकापणीचे काम करणाऱ्या छबुबाई कामठे यांच्याशी संवाद साधला. चाराकापणीचे काम कसे चालते, चारा किती दिवस टिकतो, वेतन किती मिळते, पेन्शन अशी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर मजूर महिलांचीही विचारपूस केली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आवर्जुन साधलेल्या संवादाबद्दल या महिलांनी आनंद व्यक्त केला

 000.

 ऊर्जा श्रेणीमध्ये महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’ जाहीर.

नवी दिल्लीत 18 जूनला होणाऱ्या समारंभात पुरस्कार प्रदान

        मुंबई दि. 27 : ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये महाराष्ट्राने ऊर्जा श्रेणीमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे. ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’चा एक भाग म्हणून 18 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड इन पॉवर अँड एनर्जी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ऊर्जा विभागांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रेय देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

            स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. 18 जून 2022 रोजी सिल्व्हर ओक हॉल, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.

            महापारेषणने ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी केला आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे वहिवाट मार्ग (Right of Way) समस्या कमी करण्यासाठी व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

            एचव्हीडीसी योजनेअंतर्गत एकूण 1 लाख 29 हजार 546 कृषीपंप ऊर्जान्वित केले. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण 99 हजार 744 कृषीपंप बसविण्यात आले. 24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12 हजार 102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.

            कोरोना काळात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सातत्याने ऊर्जा कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते, निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या पुरस्कारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

0


 मृद व जलसंधारण विभागाची नवीन कार्यालये सुरु होणार

- मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

            मुंबई, दि. 27 : मृद व जलसंधारण विभागाची नवीन कार्यालये सुरु होणार आहेत. यामध्ये ५ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये आणि १८ नवीन उपविभागीय कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

            मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली राज्यस्तर यंत्रणेकडे एकूण २६ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १२७ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत तर जिल्हा परिषद यंत्रणेकडे एकूण ३१ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १६८ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे.

            राज्यस्तर यंत्रणेमध्ये रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली, भंडारा अशी पाच नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

            जिल्हा जलसंधारण अधिकारी, ठाणे अंतर्गत ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र होते. म्हणून रायगड येथे नविन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण केले असून या कार्यालयाचे मुख्यालय अलिबाग येथे राहील. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, धुळे या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन नंदूरबार येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन परभणी येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, नांदेड या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे.

            राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, गोंदिया या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन भंडारा येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे.

            मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील उपविभागीय कार्यालयांच्या संख्येमध्येही बदल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात धारणी येथे, नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. तर बुलढाणा येथे नविन उपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट, तर भंडारा येथे नविन उपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल.

            सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे, नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, परभणी जिल्ह्यात सेलू आणि पाथरी, हिंगोली जिल्ह्यात वसमत, गडचिरोली जिल्ह्यात वडसा, अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि कोपरगांव, तर सातारा येथे उपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल. रायगड येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय असण्याबरोबरच अलिबाग येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे, नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे, याशिवाय हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे जिल्हा परिषदेसाठी नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे.

            या नविन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे कामकाज गतीमान होणार आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे.


००००





 





 रक्तदाब मोजणारे उपकरण विनापरवाना उत्पादन करणाऱ्या

अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई

            मुंबई, दि. 27 : मेसर्स Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे उक्त संस्थेच्या शाह इंडस्ट्रीयल इस्टेट देवनार, गोवंडी या ठिकाणी बृहन्मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून पडताळणी करण्यात आली.

            कारवाईचे वेळेस वरील संस्थेत विनापरवाना Blood Pressure Monitor या रक्तदाब मोजणाऱ्या वैद्यकीय उपकरण उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले. या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना देण्यास जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती वरील संस्थेने जून २०२१ नंतर देखील उत्पादन परवाना न घेता या उपकरणाचे उत्पादन विक्री करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे सदर ठिकाणी उपलब्ध असलेला विनापरवाना उत्पादित Beep Blood B.P. monitoring Machine या उपकरणाचा रु १०,३५, ००० साठा जप्त करण्यात आला.

            पुढील तपासात संस्थेस सदर उपकरणाच्या खरेदी विक्रीचा तपशिल व विक्री करण्यात आलेला साठा बाजारातून परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सादर करण्यात आलेल्या माहितीवरून ही उपकरणे New Era Corporationn, China या संस्थेकडून आयात करण्यात आले होते. सदर आयातीसाठी लागणारा परवाना देखीन मंजूर नसल्याचे तपासात आढळून आले में Conceptreneur Ventures व मे Apollo Pharmacy (A unit of Aplollo Hospitals Enterprises Ltd) यांच्यात करार असून सदर उपकरणाने ब्रांड नाव (Apollo Pharmacy fully automatic upper arm style Blood Pressure Monitor) हे Apollo Pharmacy च्या मालकीचे Conceptreneur Ventures ने सुमारे ८२,५१० इतक्या मोठ्या संख्येने सदर उपकरणे Apollo Pharmacy साठी बिना परवाना तयार करून त्याची विक्री केली आहे.

            या दोन्ही संस्थानी Covid-१९ या रोगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर सदर उपकरणे संगनमताने विनापरवाना उत्पादन त्याची गुणवत्ता चाचणी न करता विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. दाब मोजण्याचे उपकरण जर सदोष असेल तर त्याचा परिणाम रुग्णास देण्यात येणाऱ्या उपचारावर पडून चुकीच्या निदानामुळे रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

            या प्रकरणात औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मेडिकल डीवायसेस नियम, २०१७ से उल्लघन केल्याने तसेच संस्थेने Covid-१९ या जागतिक महामारीच्या काळात गुणवत्ता चाचणी न करता संगनमताने विनापरवाना वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन केल्याने भा.द.वी. च्या कलम ४२० व ३४ सहवाचन औषधे सौदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ (क) अंतर्गत गोवंडी पोलीस स्टेशन येथे पुढील तपास चौकशीसाठी दि. ४/५/२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे.

            मे Apollo Pharmacy Conceptreneur Ventures या संस्थाना बाजारात विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाकडून सदर उपकरणाचा साठा परत घेण्यासाठी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात नोटीस देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार Apollo Pharmacy ने विविध वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिल्याचे प्रशासनास कळविले आहे.

.........

Featured post

Lakshvedhi