Saturday, 26 March 2022

हसू नका.

 *रिटायर झाल्यावर लोक काय करतात याची यादी.* 


१) गरज नसताना दूध आणायला जाणे. 

२) गेटबाहेर झाडू मारणे,सडा टाकणे. तरी बरं रांगोळी येत नाही,नाही तर ती पण काढली असती.

३) दिवसभर वॉचमन सारखे खिडकीत बसून राहाणे. 

४) प्रत्येक काम मीच करायला पाहिजे,असा उगाच तगादा लावणे आणि बाकीचे कसे बीना कामाचे आहेत हे दाखवून देणे.

५) पाण्याची टाकी भरेपर्यंत उगाच उभे राहाणे, Automatic असली तरी उगाच गच्चीवर जाऊन टाकीत डोकावणे.

६) गरज नसताना बँकेत जाऊन निरर्थक वाद घालणे आणि मी किती कामात पटाईत होतो हे पटवून द्यायचा प्रयत्न करणे.

७) मुलाचे फेकून दिलेले शर्ट, टी शर्ट,शूज उगाचच वापरायला काढणे.

८) कार जर बाहेर काढायची म्हंटले, तरी उगाच फालतू चौकश्या करणे. 

९) उगाचच चट्ट्या पट्याची हाफ पॅन्ट घालून गेटमधे किंवा मागच्या दारात उभे राहाणे. 

१०) बिनकामाचे फोन करुन उगाचच काड्या करीत बसणे. 

११) येणार्या जाणार्याला उगाचच एखाद्या नातेवाईका विषयी गा-्हाणी सांगत बसणे आणि स्वतःचे हसे करुन घेणे. 

१२) नातवांचे मित्र/मैत्रिणी दारात खेळायला आले की अंगावर खेकसणे. 

१३) कुठे बाहेर जायचे म्हंटले ,तरी कार मधे पुढे बसायचा यांचाच मान आणि परत वर Driving चे धडे. (गाडी चालवायला येत नसली तरी!) 

१४) एखादी आवडती सिरीयल/सिनेमा लागला म्हणून बघत बसले,की यांची फालतू बातम्या बघायची वेळ होते!!

१५) बजेट,संसद सभागृहातला गोंधळ समजत नसला तरी वेड्यासारखे tv वर बघत बसणे. 

१६) सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही,म्हणून रुसणे आणि विचारले असताना मला कशाला विचारता,म्हणून झटकून टाकणे. 

१७) आपल्याला मोबाईल मधले फार कळते,हे समवयीन असलेल्या म्हाताऱ्याला दाखवत काहीतरी सेटींग चेंज करणे. १८) एखादी गोष्ट नवीन करताना,उदा: घरातील फर्निचर,फॅब्रीकेशन उगाच स्वतःच्या कारागीराला बोलवून ती गोष्ट चौपट खर्च करून बनवणे आणि ती कितीही वेडी वाकडी झालेली असली,तरी जाणाऱ्या,येणाऱ्याला दाखवून हसे करून घेणे. १९) उगाचच जुने वाहन, उदा:Scooter अथवा मोटर सायकल न विकता ठेऊन देणे,कधीतरी काढून उगाच फार मोठ्ठा मेकॅनीक असल्या सारखे कीका मारत बसणे,प्लग साफ करत बसणे.

२०) लाईटबील, फोनबील जास्त येते म्हणून जाता येता लाईट बंद करणे,आपण फोनवर बोलताना रागाने पहाणे आणि स्वत: फोन वरून कोणा बरोबर तरी तासन तास कागाळ्या करीत बसणे.

२१) संध्याकाळी बागेत फिरायला जाणे आणि तासन् तास बाकडे अडवून बसून राहणे. 

२२) पिवळी गोळी, निळी गोळी अशा प्रकारे गोळ्यांची नावे लक्षात ठेवणे म्हणजे डॉक्टर तपासायला आला की वेडाच व्हावा!! 

२३) कारण नसताना सोसायटीच्या कामाचे झेंगट गळ्यात घेणे. 

*सर्व सेवा निवृत्त लोकांनी हे वाचावे व आपण यातले काय काय करतो, ते तपासणे. तुमचा स्कोर १३ पेक्षा जास्त झाला, तर अधून मधून शेगांवला गजानन महाराजांच्या किंवा वज्रेश्वरी व गणेशपुरी,अकलोली येथे दर्शनाला जात जावे!!*

 विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी;

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.

- अजित पवार.

            मुंबई, दि. 25 : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. पवार बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी दिला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही मागच्या तुलनेपेक्षा वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा या भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची मुदत नाकारली नाही. मुदत वाढविण्याबाबत शासन विचाराधीन आहे. निधीचे नियोजन करताना राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे ठरवून दिलेले सूत्र विचारात घेऊन करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्यासाठी शासनाने निधी वाटपात झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.


सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही

            राज्यातील सुपर मार्केटमध्ये मद्य (वाईन) विक्रीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मद्य (वाईन) विक्रीबाबत यथायोग्य निर्णय घेण्यात येईल. जनतेला नको असलेले निर्णय लागू करण्याची राज्य सरकारची भूमिका नाही. राज्यात मद्यावरील कर कमी केल्यामुळे उत्पन्न वाढले. मद्यावरील कर 300 टक्क्यांवरुन 150 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. हा कर कमी केल्यापासून उत्पन्नात 100 कोटीवरुन 300 कोटी रुपयांपर्यत वाढ झाल्याची माहिती देखील श्री. पवार यांनी दिली.

            वीज महामंडळाचे शासनाकडील जे देणे बाकी होते ते हक्काचे पैसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा पैसा ताबडतोब वीज महामंडळाला वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज परवडत नसल्यामुळे राज्यातील काही प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत होत होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यात उद्योग टिकून राहावे. यासाठी उद्योगांना वीज सवलतीही राज्य शासनाने दिल्या असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

            पदभरती प्रक्रियेत विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सभागृहात केल्या होत्या. त्याला उत्तर देताना श्री. पवार यांनी भरती प्रक्रियाही शासनाने ठरवलेल्या चक्राकार पद्धतीनेच होतील याकडे जातीने लक्ष दिले जाईल. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले. 

            या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, अमित साटम, अबु आजमी, अतुल भातखळकर, प्रशांत ठाकुर, रईस शेख, कालीदास कोळंबकर, श्रीमती मनिषा चौधरी आदींनी सहभाग घेतला होता.

०००००


 

 


रानमेवा हावाहवासा


 



 





 

 पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्यास तक्रार करावी.

- छगन भुजबळ.

            मुंबई, दि. 25 : पात्र शिधापत्रिकाधारंकाना धान्य मिळत नसल्यास त्यांनी महाफुड किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी, अशी माहिती विधानसभेत अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

            जळगाव जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांवर बारा अंकी बारकोड क्रमांक नसल्यामुळे धान्याचा लाभ मिळत नसल्याचा प्रश्न विधानसभा सदस्य शिरीष चौधरी यांनी उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाग घेतला.या प्रश्नाला उत्तर देताना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तहसील स्तरावर शिधापत्रिकेची डाटा एंट्री शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये करून ती संगणीकृत झाल्यावर शिधापत्रिकेस संगणक प्रणालीव्दारे बारा अंकी विशीष्ट क्रमांक दिला जातो. जर ही कार्ड प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी गटामध्ये असतील तर यामध्ये ग्रामीण भागासाठी ४४,०००/- व शहरीभागासाठी ५९,०००/-रूपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. शहरी भागात ५९,००० रूपये पेक्षा जास्त उत्पन्न असेल्याला लाभार्थीला कार्ड असूनही लाभ मिळत नाही.तर ग्रामीण भागात ४४,००० रूपये वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळत नाही.कोरोना कालावधीत सरकारने विशेष सवलत देऊन तात्पुरत्या स्वरूपात प्राधान्य कुटूंबातील लाभार्थीमध्ये बसत नव्हते तरी अशा लाभार्थींनाही अन्नधान्य वाटप केले होते. तसेच तीन हजार कार्ड नेमकी कोणत्या गटातील आहेत याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. तसेच पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारंकाना धान्य मिळत नसल्यास त्यांनी महाफुड किंवा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी अशा तक्रारी तपासून संबधितावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

******

राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

-- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

            मुंबई,दि.25 : राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

            राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने ०७ एप्रिल २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व शाळांना दिलेल्या आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ६५६८६ शाळांपैकी १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले आहेत उर्वरीत सीसीटीव्ही लवकरात लवकर बसवावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे अशी माहिती, मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

००

वाहतूक पोलीसांकडून नियमानुसारच कारवाई

- शंभूराजे देसाई

            मुंबई,दि.25 : नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्ती ही नियमानुसार करण्यात आली असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

             नाशिक परिक्षेत्रात वाहतूक पोलीसांकडून हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दंड आकारणी होत असल्याबाबत विधानसभा सदस्य शांताराम मोरे व प्रकाश आबीटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.याला उत्तर देताना गृह राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, व्दारका चौकात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूकदारांकडून ६३ हजार ४०० रूपये दंड वसूल केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश सर्वच राज्यांना दिलेले होते. त्यानुसार वाहतूक पोलीसांनी नियमानुसारच कारवाई केली तसेच नाशिक मध्ये १८ जानेवारी ते ११ मार्च दरम्यान विनाहेल्मेट प्रवास करणा-या ८,४७२ लोकांकडून ४२ लाख ३६ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे हा दंड नियमानुसारच केला आहे. अशी माहिती माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली.

            यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाठ यांनीही हेल्मेटसक्ती आणि नियमबाह्य दंडआकारणी याबद्दल गृह विभागाने आलेल्या तक्रारींदेखील तपासून पहाव्या अशा सूचना केल्या.

                                                              ****

विधानसभा प्रश्नोत्तरे/४१६६९

मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत

- गुलाबराव पाटील

            मुंबई, दि.25 : जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.

             विधानसभा सदस्य संजय सावकारे यांनी जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा अंतर्गत उद्भव विहीर व पाईप लाईन कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेसाठी १४ लाख ६७ हजार ७६० या कामाकरिता मंजूर करण्यात आले होते.या विहिरीचे काम पूर्ण झाले आहे या कामामध्ये समावेश असलेला उद्भव विहिर व पाईप लाईनमध्ये बदल केला असला तरी त्याला शासनाची मान्यता घेण्यात आली आहे.या गावात नियमित पाणी पुरवठा सुरू आहे. तरीही या कामाबाबत काही तक्रारी असल्यास त्याची चौकशी करू अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत दिली.

                                                            *****

विधानसभा प्रश्नोत्तरे/४३६८२

धान भरडाईचे अंतिम हिशोब करण्यात आलेल्या

मिलर्सना देय रक्कम अदा

- छगन भुजबळ

            मुंबई, दि. 25: हंगाम २००८-०९ ते २०२० -२१ मध्ये धान भरडाईचे अंतिम हिशोब करण्यात आलेल्या सर्व संबधित मिलर्सना मार्केटिंग फेडरेशनकडून अनामत रक्कमा व देय भरडाई मोबदला देण्यात आला आहे, अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

            विधानसभा सदस्य विजय रहांगडाले यांनी गोंदिया व नाशिक जिल्ह्यात मार्केटींग फेडरेशन व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्याकडून मिलर्सना २०१७-१८ ते २०२०-२१ चा मोबदला देण्यात आला नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले,मार्केटिंग फेडरेशमार्फत हंगाम २००८-०९ ते २०१९-२० खरीप व रब्बी तसेच पणन हंगाम २०२१-२२ खरीप मधील धान भरडाईच्या खर्चाच्या रकमा मिलर्सना देण्यात आलेल्या आहेत. पणन हंगाम २०२०-२१ रब्बी मधील धान भरडाईची रक्कम अदा करणे बाकी आहे ती देखील अदा करण्यात येईल.

           महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत ज्या मिलर्सनी NEML या पोर्टलवर गिरणीमध्ये आवक धान,शासकीय पुरवठा गोदामात जावक तांदळाच्या नोंदी घेतल्या आहेत,अशा मिलर्सना मोबदला देण्यात येत आहे.तसेच २००८-०९ ते २०१६-१७ मधील भरडाई देयके देखील अदा करण्यात आली आहेत.पणन हंगाम २०१७-१८ ते २०२०-२१ मधील एकूण ५६.६१ कोटी भरडाई खर्चाच्या रकमेपैकी ३२.१८ कोटी अदा करण्यात आले असून २४.४३ कोटी इतकी रक्कम मिलर्सनी नोंदी पूर्ण न केल्याने अदा करणे बाकी आहे. मिलर्सनी जुना बारदान परत न केल्यास ३४ रूपये प्रति नग प्रमाणे वसुल करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

                                                            ****

अमली पदार्थांची तस्करीकरणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करावी

- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई.

                मुंबई, दि. 25 : मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.   

                विधानभवन येथे राज्यातील अंमली पदार्थांची विक्री व सेवन याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीस श्री. संजय सक्सेना, प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, श्री. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक, का. स. सु., व अन्य अधिकारी उपस्थित होते.

                गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाचे प्रमाण विशेषत्वाने आढळून येत असून ही बाब गंभीर असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरूद्ध सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखून संबंधितांवर कडक कारवाई करावी. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. यासंदर्भातील कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल. अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनापासून तरूण पिढीला दूर ठेवण्याची गरज असून यासंदर्भात शाळा व महाविद्यालयांतही प्रबोधन करण्याचे निर्देशही श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

                मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणांमध्ये काही परदेशी नागरिक आढळून आले असून यांची ओळख पटविण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यादृष्टीने अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणेद्वारे त्यांची ओळख पटवून या समस्येवर मात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.    

---000----


 



Featured post

Lakshvedhi