Thursday, 17 March 2022

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांची मुलाखत.

          मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक सुनील लिमये यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरूवार, दि. 17 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

                राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात झालेली वाढ,त्याची कारणे आणि अशा घटना रोखण्यासाठी वन विभागातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजना, व्याघ्र व त्यांचे व्यवस्थापन, संवर्धन, राज्यात गेल्या दोन वर्षात नव्याने घोषित करण्यात आलेले संवर्धन राखीव,संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी अभयारण्य यांचे व्यवस्थापन अशा सर्व निर्णयांची व विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती श्री. सुनील लिमये यांनी 'जय महाराष्ट्र ' या कार्यक्रमातून दिली आहे.

00000



 आर्थिक शिस्त आणि समतोल विकासाच्या अर्थसंकल्पासह राज्य अग्रेसर

- वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई.

            मुंबई, दि. 16 : मागील दोन वर्षापासून कोविडसारख्या महामारीचा सामना करीत असताना राज्याची आर्थिक स्थिती अडचणीत आली असतानाही आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसवली आहे. वित्त विभागाने नियोजन करुन, आर्थिक शिस्त लावून सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्याद्वारे राज्य समतोल विकासाच्या दृष्टिने पाऊल पुढे टाकत आहे, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेवर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री श्री. देसाई बोलत होते.

            वित्त राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. 2020-21 मध्ये कोविडची परिस्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर झाला. विविध योजनासाठी जवळपास 60 ते 70 टक्के निधी देण्यात आलेला आहे. कुठल्याही योजनेच्या निधीमध्ये कपात करण्यात आली नसल्याचे सांगून श्री.देसाई म्हणाले की, इतर राज्यांच्या तुलनेत 2.64 टक्के कर्ज कमी घेवून राज्याने अर्थव्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे केंद्र सरकारकडील वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) चे 26 हजार 500 कोटी रुपये येणे बाकी आहेत. कररुपाने वाटा उचलणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे.     

            कोविडकाळात नागरिकांच्या पाठिशी ठाम उभे राहून कोविडच्या कामासाठी कुठेही सरकारच्यावतीने पैसा कमी पडू दिला नाही. राज्यात अनेक ऑक्स‍िजन प्लांट, रुग्णालये, उभारले. तसेच प्रत्येक जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट उभारुन राज्याला स्वयंपूर्ण बनविले. करचुकवेगिरीला आळा घालून अधिक उत्पन्न वाढ कशी होईल, यासाठी प्रयत्न केले. राजकोषीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

            उद्योग विभागामध्ये आतापर्यंत 98 सामंजस्य करार करण्यात आले असून चार लाख कोटी रुपये गुंतवणूकीच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी चालना देण्यात आली आहे. सद्यस्थितीत 98 प्रकल्पापैकी 5 प्रकल्प प्रलंबित असून उर्वरित सर्व प्रकरणे मार्गी लागली आहेत.

            सारथी, बार्टी आणि महाज्योती या तीनही महामंडळाचा निधी मागणीप्रमाणे नियोजनामध्ये प्राप्त करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मद्यतस्करी रोखण्यासाठी विदेशी मद्यावरील कर कमी करण्याचा प्रायोगिक तत्वावर शासनाने निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या उत्पनामध्ये वाढ झाली.

            सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले. रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाल्यावर संग्रहालयाला सर्व निधी देवून संग्रहालयाचे काम मार्गी लावले जाईल.

            कृषि क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्यांच्यासाठी तीस टक्के वाटा होता. तो वाढवून 50 टक्के ठेवला जाईल. 2022-23 च्या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही. कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, विभागीय असमतोल होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही वित्तराज्यमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.

            मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी व मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात असून चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. तसेच त्याचे उपकेंद्र नवीमुंबई येथे उभारण्यात येणार आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास विभागाच्या योजना शहर व महानगरासह ग्रामीण भागात घेवून जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोविड परिस्थ‍ितीमुळे मागील कालावधीत ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले होते. आता ते ऑफलाईन सुरु केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली असून कौशल्य विकास विभागाला अधिक गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री.देसाई यांनी सांगितले.

            गृहविभागाला सीएसआर फंडाच्या माध्यमातून पोलीसांसाठी गाड्या उपलब्ध करुन देण्यात आल्या.

            रोजगार हमी योजनेचे प्रस्ताव प्राप्त होतील त्याप्रमाणे निधीचे वितरण केले जाईल. वाईच्या पाठशाळेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी स्थळाचा आरखडा तयार केला असून याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आरखड्यासाठी आधिकचा वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.

            सन 2022-23 च्या अर्थसंकल्पावर सर्वसाधारण या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, विनायक मेटे, शशिकांत शिंदे, डॉ.परिणय फुके, संजय दौंड, निरंजन डावखरे, निलय नाईक, डॉ.रणजित पाटील, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर, विक्रम काळे, रामदास आंबटकर, अनिकेत तटकरे, महादेव जानकर, कपिल पाटील, प्रसाद लाड, श्रीमती प्रज्ञा सातव आदींनी सहभाग घेतला होता.

000000

वृत्त क्र. 892

दोन वर्षपूर्तीनिमित्त आयोजित चित्रमय प्रदर्शन  

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा आरसा

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत.

            मुंबई, दि. 16 : राज्य शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आयोजित चित्रमय प्रदर्शन माहितीपूर्ण आणि आकर्षक असून महाविकास आघाडी सरकारनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासाची घोडदौड यात प्रतिबिंबित होत असून हे प्रदर्शन शासनाच्या विकासकामांचा आरसा आहे अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात शासनाने सामान्य जनतेला मदतीचा हात देण्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रात लोकाभिमुख निर्णय घेऊन काम केले. शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देणाऱ्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात आयोजन केले आहे.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रदर्शनास भेट दिली. आणि डिजिटल स्वरूपातही जिल्ह्यातील विकासकामांचा समावेश करून प्रत्येक जिल्ह्यात प्रदर्शन आयोजित करावे अशा सूचना केल्या.

            प्रदर्शनातील सर्व विभागांच्या फलकांजवळ थांबून त्यांनी पहाणी केली, त्यावर सविस्तर चर्चा केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागची भूमिका आणि संकल्पना यांची माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर उपस्थित होत्या.

            या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 360 डिग्री व्हिडीओ सेल्फी पॉईंटबद्दल कौतुकाने चौकशी करून श्री.पाटील यांनी उत्साहाने व्हीडिओ सेल्फी काढून घेतला.

            या प्रदर्शनात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केलेल्या कामगिरीबरोबरच आरोग्य, मदत व पुनर्वसन, कृषी, उद्योग आदी विविध विभागांच्या निर्णयांच्या फलकांची आणि संबंधित छायाचित्रांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आवर्जून पाहणी केली.

            कोरोनासारख्या संकटावर मात करत महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू ठेवली. अशी प्रतिक्रियाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.

0000



Wednesday, 16 March 2022

 वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा.

            मुंबई, दि. 16 :- “समाजातील दुष्प्रवृत्तींचे होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण साजरा करताना समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांनाही आपल्या आनंदात सहभागी करुन घ्या. वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या गावखेड्यात, विशेषत: कोकणात साजरा होणारा होळीचा सण यंदाही आनंदात, उत्साहात साजरा होऊ दे. समाजातील अज्ञान, अस्वच्छता, अनिष्ट रुढी, परंपरांचा विनाश होऊ दे. राज्यातल्या घराघरात, मनामनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे. होळी व धुलीवंदन साजरी करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगाचा वापर करावा. डोळे व त्वचेला इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षित होळी साजरी करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

0000000



 होळी सणानिमित्त कोकणात एसटीच्या १०० विशेष गाड्या.

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांची माहिती.

प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करणार.

            मुंबई, दि. १६ : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, तसेच एसटी संपाचा गैर फायदा घेवून खासगी बसेसनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे आकारु नये, याबाबत प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दोषींवर परिवहन आयुक्त यांनी कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिले.

            होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी अद्याप सुरु असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधीक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री ॲड.परब यांनी दिले.

            गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे सांगून सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही ॲड.परब यांनी केले आहे.

००००



 बाल संगोपनगृहात वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत संगोपन

राज्यात बाल संगोपन गृहांची संख्या वाढवणार

- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 16 : राज्यातील निराधार आणि बेघर बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात ठेवले जात होते, मात्र, वयाच्या २३ वर्षापर्यंत बाल संगोपन गृहात मुलांना राहण्याची परवानगी देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. ११.४३ कोटी रूपयांची तरतूद आर्थिक संकल्पात करण्यात आली असून, बाल संगोपन गृहांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितले.

            रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, बेघर तसेच दिवसभर रस्त्यावर राहून नजिकच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रस्त्यावरील बालकांच्या सर्वेक्षणाचे काम वेळोवेळी करण्यात येते, राज्यात सुमारे १९५ हॉटस्पॉट शासनाने शोधले असून, या ठिकाणी असलेल्या मुलांच्या सुटकेकरिता आणि त्यांच्या संगोपनाकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे तयार केलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा बचाव आणि पुनर्वसनासाठीच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण करताना आढळून आलेल्या बालकांची चौकशी करून त्यांना सर्वप्रथम त्यांचे पालक किंवा नातेवाईकांकडे दिले जाते तसेच त्यांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. बालकांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्यास अशा पालकांना बालकल्याण समितीच्या समोर आणून आवश्यकतेनुसार बालगृहात दाखल करण्यात येते. राज्यात ३२६ बालगृहे कार्यरत असून महानगरपालिका क्षेत्रात बालकांसाठी ४३ खुली निवारागृहे असल्याची माहितीही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सभागृहाला दिली.

            शहरातील सिग्नलवर सुरू असलेल्या डे केअर सेंटर साठी सीएसआरमार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्यात विविध बालगृहांमध्ये असलेल्या बालकांचे संगोपन २३ वर्षांपर्यंत केले जात आहे. याचबरोबर वेश्या वस्तीतील मुलांसाठी अंगणवाड्या व शाळा आहेत. सूचना असल्यास त्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.



 पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करू या

- मुख्यमंत्री

· मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा

            मुंबई दि. 16 : पर्यावरणपूरक होळीचे आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            होळीमध्ये वाईट विचार आणि कृतीचे दहन केले जाऊन सुविचारांची पेरणी केली जाते. हीच परंपरा आपण विविध स्वरूपात पुढे नेत असतो. २१ मार्च हा दिवस आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आपण ज्याला वातावरणीय बदलाचे परिणाम म्हणतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर भाष्य करतो तेंव्हा त्याची सगळी उत्तरे आपल्याला “वनात” मिळतात. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेंव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

            आपण झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश देतो. हा संदेश खऱ्याअर्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यासाठी ठोस कृती करण्यासाठी होळीसारखा दुसरा सण असूच शकत नाही. आता दृष्टीआड सृष्टी असं न म्हणता, जागरूकदृष्टीने या “सृष्टी”कडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. असेही मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात.

...



 प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे

वेतन तत्काळ अदा करणार

- आरोग्य मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि 16 : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात येणार आहे. भविष्यात वेतन थकणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

            विधानसभेत सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकांच्या मानधनासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हरिभाऊ बागडे, बाळासाहेब देशमुख, प्रकाश आबिटकर, कैलास पाटील, महेश लांडगे यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. राज्यात दोन सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून, त्या अनुषंगाने कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३६ कोटीचे वितरण तत्काळ करण्यात येणार आहे. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार वेतन दिले जात नसेल, तर संबंधित कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

            शववाहिका आणि रूग्णवाहिकेच्या डिझेलचा खर्चही शासन देणार असून जननी शिशुंसाठी असलेली 102 क्रमांकाची रूग्णवाहिका सर्व ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे. अपघातासाठी 108 क्रमांकाच्या जुन्या एक हजार रूग्णवाहिका बदलण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.



Featured post

Lakshvedhi