Monday, 24 January 2022

Fight anticurrption

 If any State Govt. employee demand bribe, call ACB Thane Toll Free No.1064, 022-20813599 - SP, Anti Corruption Bureau

 महिला धोरणाच्या मसुदा निर्मितीमध्ये

समाजातील सर्व घटकांच्या अभिप्राय व सूचनांचा विचार करणार

                   -महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

            मुंबई,दि. 21 : महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला धोरण 2014 मध्ये आवश्यक त्या सुधारणा करून सुधारीत सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार आहे. महिला धोरणाच्या मसुदा निर्मितीमधे समाजातील सर्व घटकांच्या अभिप्राय व सूचनांचा विचार होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            सुधारीत महिला धोरणाच्या मसुद्याचे सादरीकरण बैठक महिला व बाल विकास मंत्री, ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. सुधारीत चौथ्या महिला धोरणाबाबत प्रारूप मसुदा सादरीकरण व चर्चा या बैठकीत करण्यात आली.

            मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, या धोरणाच्या मसुद्याबाबत आपण नऊ समिती तयार केल्या होत्या. या समितीतील सदस्यांचे अभिप्राय आणि सूचना या मसुद्यात घेतले आहेत. शासनाच्या विविध विभागांना महिला धोरणाचा मसुदा पाठविला होता. यामध्ये बऱ्याच विभागांनी आपले अभिप्राय व सूचना कळविले आहेत. काही विभागांचे अभिप्राय अद्याप अप्राप्त आहेत, त्यांचे अभिप्राय दहा दिवसाच्या आत मागवावे असे निर्देश यावेळी मंत्री ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

            सर्वसामान्य नागरिकांच्या धोरणाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ग्रामस्तरावर हे धोरण प्रसिद्ध करावे. विभागस्तरावर याबाबत आढावा घ्यावा. सर्व राजकीय पक्ष, महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांना या धोरणाचा मसुदा पाठवावा व त्यांचे ही अभिप्राय घ्यावेत. सर्व विभागांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत आपण जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सर्वांचा यामध्ये सहभाग असणार आहे,असेही मंत्री ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

          या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे उपस्थित होते

 प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कागदी व प्लास्टीक ध्वजांचा वापर टाळाव

- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

            मुंबई, दि. 21 :- प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व योग्य मान राखण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले राष्ट्रध्वज तहसिल आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणेस सुपूर्द करण्यात यावेत. हे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांवर असेल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

          प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तर व अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे.

         राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखणे आणि अवमान होऊ न देण्यासाठी जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक व क्रिडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात-रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून आयोजित संस्थेने अथवा संघटनेने ते समितीस अथवा जिल्हास्तर यंत्रणांकडे जमा करावेत असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

0000



 विद्यापीठ आणि महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला

          - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि.21 :- कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग ऑनलाईन सुरू असून लवकरच ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कोविड-19 व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्यात कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी होत असल्याने महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे श्री. सामंत यांनी सांगितले.

 राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित


राज्य निवडणूक आयोगास पाठवावा


          मुंबई, दि. 24 (रानिआ) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

          राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता, दूरध्वनी, ई-मेल आयडी आणि विद्यमान कार्यकारणीतील सदस्यांचा तपशील राज्य निवडणूक आयोगास सादर करावा, असे आवाहन यापूर्वीदेखील करण्यात आले होते; परंतु बहुतांश राजकीय पक्षांकडून अद्याप हा तपशील प्राप्त झालेला नाही. ज्यांनी सादर केला आहे; परंतु त्यात बदल झाला असल्यास तो नव्याने द्यावा. कारण संपर्काच्या तपशिलाअभावी राजकीय पक्षांशी विविध कारणांनिमित्ताने संपर्क साधण्यात अडचणी येतात, ही बाब विचारात घेवून हे तपशील देणे आवश्यक आहे. हे तपशील राजकीय पक्षांनी प्रमाणित करूनच आयोगाच्या कार्यालयास टपालाने (राज्य निवडणूक आयोग, 1 ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.) किंवा sec.mh@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवावा, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता

38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरीत

            मुंबई, दि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

          विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरीत करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० कोटी, सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरीत करण्यात आला आहे.

0000



Turisum

 एमटीडीसी’चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प

            मुंबई, दि. 19 : विविध धार्मिक स्थळे, निसर्गाचे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपरिक संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा वैशिष्ट्यांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसून येत आहे. सध्या भारतात तसेच जगभर एक उल्लेखनीय अशी संकल्पना राबविली जात आहे, ती म्हणजे जबाबदार पर्यटन!.. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुद्धा ही संकल्पना राबवून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

            महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 47 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत 20 जानेवारी 2022 पासून महामंडळाच्या अखत्यारितील पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स तसेच अभ्यागत केंद्रांमध्ये जबाबदार पर्यटनाची आवश्यकता आणि महत्व लक्षात घेऊन या संकल्पनेची पुरेपूर अंमलबजावणी करण्याची सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

            पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवण्याकरिता तसेच नकारात्मक परिणामांना आळा घालण्याकरिता, एक साधा आणि वाखणण्याजोगा उपाय म्हणजे जबाबदार पर्यटन, जे आज जगभरात अनेक ठिकाणी स्वीकारले गेले आहे. सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्वीकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे हा या संकल्पनेचा मूळ उद्देश आहे. पर्यटनाबरोबरच आपण ज्या भूतलावर वास करतो, त्या वसुंधरेचे आणि परिसराचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी जबाबदार पर्यटन ही संकल्पना काळाची गरज बनली आहे. आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावणे ही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी आहे. पर्यटक निवासांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्याची विल्हेवाट लावण्यात येते. वेळोवेळी स्वच्छता अभियान, प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण, स्वच्छतेचे महत्व समजावून देणारे संदेश यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

            महामंडळाच्या पर्यटक निवासे, उपहारगृहांमध्ये कार्यरत कर्मचारीवर्ग हे आसपासच्या परिसरातील आणि स्थानिक आहेत. स्थानिकांना रोजगार आणि योग्य प्रशिक्षण देऊन एमटीडीसी त्यांच्या आर्थिक कल्याणास समर्थन देते आणि यातून स्थानिक नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिले जाणार असून मन तृप्त करणारे स्थानिक खाद्यपदार्थ सुचविण्यात येऊन पर्यटकांना स्थानिक पाककृतीच्या चवींचा आणि विशिष्टतेचा आनंद देण्यात येणार आहे.

            पर्यटकांची काळजी घेणे हे महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. पर्यटक निवासाच्या परिसरात ठिकठिकाणी फलक लावणे, अतिथी पर्यटक निवासामध्ये दाखल झाल्यावर सुरूवातीलाच पर्यावरण प्रेमी म्हणून काय करावे-काय करू नये याबद्दल सांगणे याबरोबरच राहण्याची सोय, चविष्ट जेवण एवढीच आदरातिथ्याची व्याख्या न ठरवता त्याला सुरक्षित, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाची जोड देण्यात येणार आहे. पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब तसेच अभ्यागत केंद्रांमध्ये जबाबदार पर्यटन ही संकल्पना राबवून विकासाच्या दिशेने एक पाऊल टाकत नवीन सुरूवात करण्यात येणार आहे.

            एमटीडीसीद्वारे आज 30 पर्यटक निवासे, 29 उपहारगृहे तसेच बोट क्लब्स आदींचे परिचालन करण्यात येते. महामंडळाच्या अखत्यारीतील महाबळेश्वर येथील पर्यटक निवासात जबाबदार पर्यटन ही परियोजना राबविण्यात येत आहे. आरोग्यास अपायकारक असे रासायनिक व कृत्रिमरित्या बनविलेले पदार्थ पर्यटकांना न देता पर्यटकांचे आरोग्य चांगले राहिल असे पदार्थ देण्याकडे महामंडळ कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे महामंडळाचे उप महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.

            महामंडळाने जबाबदार पर्यटनाच्या दिशेने यापूर्वीही पावले उचलली आहेत. तथापि पर्यटकांच्या अमूल्य योगदानाचीही आवश्यकता आहे. जबाबदार पर्यटन संकल्पनेच्या माध्यमातून वसुंधरेचे रक्षण करण्याचे एक महत्वपूर्ण काम आपल्या हातून घडणार आहे. याद्वारे पर्यावरणाप्रती जबाबदारी सुयोग्यरित्या पार पाडण्यास आपण समर्थ ठरू, असे प्रतिपादन महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

०००००



Featured post

Lakshvedhi