Saturday, 15 January 2022

 महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनने

राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करावे

- उपमुख्यमंत्री अजित पवार

· महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार

· उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिअसोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाची सभा

           मुंबई, दि. 11 : राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर, सदस्य दीपक मेजारी, अभय छाजेड यांच्यासह व्हिसीद्वारे बाळासाहेब लांडगे, धनंजय भोसले, प्रकाश तुळपुळे, प्रशांत देशपांडे, स्मिता यादव, सुंदर अय्यर, उदय डोंगरे, राजाराम राऊत, सोपान कटके, निलेश जगताप, संदीप चौधरी, गोविंद मुथुकुमार, खासगी सचिव अविनाश सोलवट, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी आपण सामना करत आहोत. या कोविड संकटामुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने काम केले पाहिजे. राज्याच्या क्रीडा विकासात भरीव योगदान देण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

        ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.



 राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती

सादर करण्याचे आवाहन

            मुंबई दि, 14 : 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

            या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी उद्या दि. १५ जानेवारी, २०२२ पर्यंत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

 राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यsh

8 ‘सुवर्ण’सह एकुण 30 पदकांची युवकांनी केली कमाई

· कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडून युवक-युवतींचे अभिनंदन

            मुंबई, दि. 11 : केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक-युवतींनी 8 सुवर्ण, 4 रजत, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदके अशा एकुण 30 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने पदकसंख्येत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. पुरस्कारविजेते तरुण-तरुणी आता शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल सर्व युवकांचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनीही विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कौशल्य विकास सोसायटीमार्फत या विद्यार्थ्यांची जागतिक स्किल्स चँपीयनशीपसाठी तयारी करुन घेण्यात येत आहे.

            स्पर्धेमध्ये 10 सुवर्णपदकांसह एकूण 49 पदके पटकावून ओडीशा राज्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 8 सुवर्णपदकांसह एकुण 30 पदके पटकावून महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांकावर आले. याशिवाय केरळ 24 पदके, कर्नाटक 23 पदके, तामिळनाडू 23 पदके, आंध्र प्रदेश 16 पदके, बिहार 13 पदके, हरयाणा, गुजरात, राजस्थान व चंदीगड यांना प्रत्येकी 11 पदके, पंजाब 8 पदके अशा पद्धतीने विविध राज्यांनी कामगिरी केली आहे.   

            राज्यातून एकुण 60 पेक्षा अधिक स्पर्धक दिल्ली येथे राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यापुर्वी गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम प्रादेशिक स्पर्धेत 45 पदके पटकावून 55 टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले होते.

            कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल. राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्या तरुणांनी आता जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सुवर्ण पदक विजेते स्पर्धक

            पंकज सिताराम सिंह (३ डी डिजीटल गेम आर्ट), मोहम्मद सलमान अन्सारी (ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी), रिंकल करोत्रा (ब्युटी थेरपी), श्रीराम कुलकर्णी (फ्लोरीस्ट्री), कोपल अजय गांगर्डे (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अमित कुमार सिंह (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), ओमकार गौतम कोकाटे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी), संजीव कुमार सबावथ (वॉल अँड फ्लोअर टायलिंग)

रजत पदक विजेते स्पर्धक

            देवेज्या (फॅशन टेक्नॉलॉजी), रितेश मारुती शिर्के (इंडस्ट्रीयल कंट्रोल), लवकेश पाल (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), आदित्य दीपक हुगे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी)

कांस्य पदक विजेते स्पर्धक

            ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ (कारपेन्ट्री), स्टेनली सोलोमन (काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क), योगेश दत्तात्रय राजदेव (इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन्स), श्रीष्टी मित्रा (ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी) आदित्य बिरंगळ (मोबाईल ॲप्लीकेशन्स डेव्हलपमेंट), अश्लेषा भारत इंगवले (पेंटींग अँड डेकोरेटींग), सुमीत सुभाष काटे (प्लॅस्टीक डाय इंजिनिअरींग)

उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते

            कृष्णा लोया (डिजीटल कन्स्ट्रक्शन), जुई संतोश सपके (हेअर ड्रेसिंग), यश दिनेश चव्हाण (हेअर ड्रेसिंग), कृष्णा गिल्डा (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), दक्ष राहुल सावला (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अविनाश नवनाथ तौर (मेकॅट्रॉनिक्स), श्वेतांक भालेकर (मेकॅट्रॉनिक्स), मित्रा राव (पॅटीसरी अँड कॉन्फेक्शनरी), अर्जुन मोगरे (प्लंबिंग अँड हिटींग), शेख इब्राहीम अजीज (वेल्डींग), वेद इंगळे (सायबर सिक्युरिटी)

००००




 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा

            मुंबई, दि. 15 :- देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय संरक्षण दलांतील अधिकारी, जवान बांधवांच्या अतुलनीय धैर्य, शौर्य, त्याग, बलिदान, देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना ‘भारतीय सैन्य दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            ‘भारतीय सैन्य दिना’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 15 जानेवारी 1949 रोजी तत्कालिन लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाचे ‘कमांडर इन् चीफ’ म्हणून सूत्रे स्वीकारली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या सन्मानार्थ साजरा होत असलेला भारतीय सैन्य दिवस हा भारतीय सैन्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. देशाच्या संरक्षणासाठी रणरणत्या वाळवंटात, अंग गोठवणाऱ्या थंडीत आपले सैनिक कर्तव्य बजावत असतात. देशवासियांच्या संरक्षणासाठी स्वत:च्या प्राणांचं बलिदान देतात. त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेला तोड नाही. सैन्यदलातील अधिकारी व जवानांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आम्हाला अभिमान असून देशवासीय सदैव त्यांचे कृतज्ञ राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलांचा गौरव करुन शहीद वीरांना अभिवादन केले.

०००


 


 



 सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक

            राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

            कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

-----०-----


  


 

 


Featured post

Lakshvedhi