Thursday, 23 December 2021

Advice-retire person

 


Accident-caution

 


 अमृत' संस्थेसाठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा

विजेत्याला 1 लाख 101 रूपयांचे पारितोषिक

१५ जानेवारी पर्यंत अर्जाची मुदत

            मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) रचना स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस रक्कम १ लाख 101 रूपये देण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत amrutacademy.gom@gmail.com यावर ईमेल करावा.

               महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), ही संस्था १ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची (EWS) शैक्षणिक उन्नती, विकास,आणि आर्थिक विकासाबाबत उपक्रम राबविण्यात येतात.खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे करिता अभ्यासक्रम, परिषद, व्याख्याने, चर्चासत्रे हाती घेणे, आयोजित करणे, पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंध प्रकाशित करणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्रे स्थापन करणे,विविध व्यवसाय, उद्योग विकास इत्यादी क्षेत्रात कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे,तरुणांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करण्यासाठी अमृत ही संस्था काम करते. 

              अमृत या संस्थेसाठी बोधचिन्ह (Logo) आणि घोषवाक्य (Tagline) तयार करताना हा लोगो आणि बोधचिन्ह हे संस्थेची वैशिष्टये आणि उद्दिष्ट दाखविणारा असावा. संकल्पना, थीम आणि प्रतीकात्मक घटकांचे वर्णन करण्यासाठी इंग्रजी अथवा मराठीमध्ये जास्तीत जास्त शंभर शब्द असावेत. बोधचिन्ह व घोषवाक्यासाठी कीवर्ड हा महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये असा असावा.

            प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२२ आहे.प्रत्येक स्पर्धक फक्त एकदाच प्रवेश नोंदवू शकतो.जर कोणत्याही स्पर्धकाने एकापेक्षा अधिक प्रवेश नोंदवले असतील,तर त्या स्पर्धकाने नोंदविलेल्या शेवटच्या प्रवेशिकेचा विचार केला जाईल. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा ही कमीतकमी १२ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येईल. वैयक्तिक व्यक्ती, लोकांचा वैयक्तिक गट,तज्ञ,व्यावसायिक,कंपनी,खाजगी, सामाजिक संस्था या स्पर्धेत सहभागी होवू शकतात. या स्पर्धेच्या नियम आणि अटी आहेत.

            याबाबतची सविस्तर माहिती शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in (What's New) नवीन संदेश मध्ये पाहता येईल. स्पर्धेशी संबंधित सर्व बाबी, शंका किंवा विवादांसाठी या amrutacademy.gom@gmail.com वर ई-मेल करावी.                                               


*****

Wednesday, 22 December 2021

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध योजनांची

माहिती देण्यासाठी मंत्रालयात केंद्र

            मुंबई, दि. 22- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस बंद असलेले पर्यटन आता सुरू झाले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहे. या दर्जेदार सेवांची आणि सवलतींची मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मंत्रालय, मुख्य इमारत येथील प्रांगणात दिनांक 22 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत माहिती व आरक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

            या आरक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळी असलेल्या 29 पर्यटक निवासे, 30 उपहारगृहे यांच्या आरक्षणासंबंधी माहिती देण्यात येत आहे. सोबतच महामंडळाच्या जल पर्यटन विभागामार्फत कार्यान्वित केलेल्या नाशिक बोटक्लब, गणपतीपुळे बोटक्लब व तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायविंग अँड ऍक्वाटिक स्पोर्ट्स (IISDA) या संस्थेबाबत माहिती देण्यात येत आहे

            एमटीडीसीमार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना तसेच विविध कक्ष आरक्षणावर सवलत दिली जाते. यामध्ये असलेल्या जेष्ठ नागरीक सवलत, शैक्षणिक सहल सवलत, माजी सैनिक सवलत, दिव्यांग पर्यटक सवलत, अनिवासी भारतीय (NRI) सवलत, शासकीय व निमशासकीय कर्मचारी सवलत याबाबतही माहिती देण्यात येत आहे.

            सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच मंत्रालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मंत्रालय प्रांगणात उभारण्यात आलेल्या आरक्षण केंद्राला अवश्य भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी केले आहे.

 प्रश्न क्रमांक 3

ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा

- मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

            मुंबई, दि. 22 : ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा आहे अशी माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.

             नवी मुंबईतील तलाव कांदळवन म्हणून घोषित केल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत आमदार रमेशदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

            श्री.भरणे म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील १४७१ हेक्टर कांदळवन क्षेत्र शासनाने राखीव वन म्हणून अधिसूचीत केले आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या व्यवस्थापन आराखड्यामध्ये खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत बैठक घेवून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची माहिती श्री.भरणे यांनी यावेळी दिली.

Vidhanparishad

 विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

प्रश्न क्रमांक २

अकोला विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरण होणार

- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

             मुंबई, दि. 22 : अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.

            अकोला येथील विमानतळाच्या धावपटटीच्या विस्तारीकरणाचे काम प्रलंबित असल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, शशिकांत शिंदे, विक्रम काळे व संजय दौंड यांनी सहभाग घेतला होता.

            श्री.भरणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकोला विमानतळाच्या विकासाकरिता आढावा बैठक दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली. या बैठकीत अकोला विमानतळाच्या विकासाबाबत व विस्तारीकरणाबाबत व्यवहार्यता अभ्यास अहवाल करण्यास सुचविले होते. तसेच या कामाबाबत वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत. हे काम मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनासोबत लवकरच बैठक घेतली जाईल अशी माहिती श्री.भरणे यांनी दिली.

 दिव्यांगांसाठी स्वतंत्र्य निवासी महाविद्यालयाबाबत

मंत्रीमंडळ उपसमिती गठीत

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 22 : दिव्यांग विद्यार्थ्यांना इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेता यावे यादृष्टीने त्यांचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील करणार असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र्य निवासी महाविद्यालय निर्मितीसाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात बृहद आराखडा एका महिन्यात तयार करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत लक्षवेधीस उत्तर देताना दिली.

            सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे म्हणाले, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. देशातले पहिले ऑटिझम पार्क लातूर येथे उभे करण्यात आले असून, एक हजार विद्यार्थी उपचारामुळे पूर्णत: बरे झाले आहेत.

            दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्र शासनाच्या कायद्याच्या धर्तीवर राज्य शासनाचा कायदा तयार करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.मुंडे यांनी दिली. जे विद्यार्थी सर्वसाधारण महाविद्यालयात शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील उच्च शिक्षणाच्या शासकीय व अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये प्रवेशासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर ५ वी ते १० वी सलग शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी ५ टक्के निधी दिव्यांगासाठी देण्याबाबत अंमलबजावणी करण्याबाबतही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

            या लक्षवेधी चर्चेत सदस्य राहुल पाटील यांनी सहभाग घेतला.

०००

Featured post

Lakshvedhi