Wednesday, 22 December 2021

Antarnaad,manntramugadh

 


 औद्योगिक संबंध संहिता नियम -2021 च्या मसुद्याबाबत

 हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा शासनाने 3 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केला आहे. या मसुद्याबाबत हरकती व सूचना 45 दिवसांच्या आत सादर कराव्यात, असे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com वर स्विकारण्यात येतील.

            या अधिसूचनेवर नमूद केलेला कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारूपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनामार्फत विचारात घेण्यात येतील, असे कामगार आयुक्त यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

 दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर     

            मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

            यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.


000

 चलो अॅप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

            मुंबई, दि. 21 : चलो अॅप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला.

            यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती सदस्य सर्वश्री अनिल कोकीळ, सुनिल अहिर, बबन कनावजे, राजेश ठक्कर, अनिल पाटणकर, दत्ता नरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, पी. वेलरासू आणि बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते.

            पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, बेस्ट उपक्रम तांत्रिकदृष्ट्या एक पाऊल पुढे आहे. ‘पुढे चला’ हा मंत्र घेऊन वाटचाल करणाऱ्या बेस्टचे काम अभिमानास्पद आहे. आज पर्यायी इंधनाचा विचार करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            प्रास्ताविकात बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, 386 पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात असून सन 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात शंभर टक्के पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे ‘डिजिटल बेस्ट 2.0’ उपक्रमांतर्गत मायक्रो बॅंकिंग, ई-कॉमर्स ट्रेड अशा विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर म्हणाले, बेस्ट पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देत आहे. दुमजली पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करताना अॅपमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी बटण देखील कार्यान्वित करावे, अशी सूचना त्यांनी केली.             

            यावेळी सर्वश्री रवी शेट्टी, सुनील जाधव,व्हिक्टर नागावकर, कृष्णा पोपेरे या वाहतूक विभागातील अधिकारी तसेच अविनाश सापळे आणि दिनेश गारगोटे या बेस्टच्या वाहकांना सन्मानित करण्यात आले.

००००



  हस्ते सैन्य दलातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना धनादेश प्रदान

विविध क्षेत्रातील शहीद - ए- आझम प्रेरणा पुरस्कार प्रदाn

            मुंबई, दि. 21 : देशासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना तसेच कारगिल युद्धात अपंगत्व आलेल्या वीर सैनिकांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

            जन्नत फिल्म्स संस्थेचे प्रमुख रईस खान यांच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींना शहीद - ए - आझम प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. इंग्लंड येथील समाज सेविका डॉ परिन सोमाणी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.  

            हुतात्म्यांच्या योगदानाची तुलना कशाशी करता येत नाही. आपापल्या क्षेत्रात देशासाठी केलेले निःस्वार्थ काम ही देखील देशसेवाच असते असे सांगून गरीब, उपेक्षित व दिव्यांग व्यक्तींसाठी केलेले कार्य हे देखील देशप्रेमच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी हुतात्मा दुर्लभ सिंह, हुतात्मा यश दिगंबर देशमुख, हुतात्मा विजय बापू सोनावणे व हुतात्मा परमवीर अब्दुल हमीद यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला, तसेच सीमेवर लढताना अपंगत्व आलेले दिव्यांग सैनिक कमांडो सुनील जोधा, कमांडो मनिष पीव्ही व नायक दीपचंद यांचा सन्मान करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते पार्श्वगायक उदित नारायण, गायिका डॉ जसपिंदर नरूला, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेते अश्मित पटेल यांसह ४० व्यक्तींना शाहिद ए आझम प्रेरणा पुरस्कार देण्यात आले.

**

Maharashtra Governor honours families of Martyrs and War Heroes

            ‘Shahid –E – Azam Motivational Awards’ presented to Udit Narayan, Jaspinder Narula, Kainaat Arora, Ashmit Patel and others

            Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated family members of martyrs of Kargil War and War Injured Jawans at a programme held at Raj Bhavan, Mumbai on Tuesday (21 Dec). 

            The Governor also presented the ‘Shahid – E – Azam’ Motivational award to 40 well known personalities on the occasion.

            Family members of martyrs Durlabh Singh, Martyr Yash Digambar Deshmukh, Martyr Vijay Bapu Sonawane, Param Veer Abdul Hamid were given cheques by the Governor, while Commando Sunil Jodha, Commando Manesh PV and Nayak Dipchand were felicitated by the Governor.

            Playback singer Udit Narayan, Dr Jaspinder Narula, actress Kainaat Arora, actor Ashmit Patel and others were presented the Shahid E Azam awards by the Governor.

            The programme was organised by Rais Khan, Chairman of Jannat Films. UK based social worker Dr Parin Somani was also present.


0000



 हिवाळी अधिवेशनात 26 विधेयके व अध्यादेश मांडणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

      

            मुंबई, दि. 21 : मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. पत्रकारपरिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरातनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.  

             या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.

            ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

            एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  श्री. पवार यांनी केले.

            देशातील इतर राज्यांशी तुलना करता राज्यात मद्यावरील 300 टक्के कर होता. तो कमी केला आहे.

            विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नसून याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

            सरकार अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि उत्तरे देण्यास तयार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून चहापानाला सर्वांना बोलावले होते, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

परीक्षा घोट्याळ्याची निष्पक्ष चौकशी करणार

            गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे.  कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

 इट राईट’ अभियानाचे मंत्रालयात फलक

सर्वांना सकस व निर्भेळ अन्न मिळावे

- अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

          मुंबई, दि. 21 : सर्वांना सकस आणि निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सातत्याने काम करण्यात येत असते. याचाच भाग म्हणून मंत्रालय प्रांगणात 'इट राईट' या केंद्र शासन पुरस्कृत अभियानाची माहिती देणाऱ्या माहिती फलकाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

            संपूर्ण पोषक द्रव्ये मिळावीत यासाठी फोर्टीफाईड तांदूळ व इतर अन्नघटक आहारात असावेत त्याचप्रमाणे तेल, साखर आणि मीठ याचा कमीत कमी वापर आपल्या आहारातून व्हावा असा संदेश देणारे हे फलक आहेत.

            अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे मिठाई विक्रेत्यांवर नियमित लक्ष ठेवले जाते. मिठाईच्या वेष्टनावर उत्पादन दिनांक टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नेहमी व सणासुदीच्या काळातही ग्राहकांना भेसळमुक्त खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात येते. भेसळयुक्त तेल, बाहेरील राज्यातून आलेला गुटखा, यासारख्या वस्तू छापे टाकून मोठ्या प्रमाणात जप्त करण्याची कारवाई सातत्याने विभागामार्फत होत असते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या निमित्ताने दिली.

Featured post

Lakshvedhi