Saturday, 18 December 2021

 'दिलखुलास' कार्यक्रमात

'महारेरा'चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांची मुलाखत

            मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात 'महारेरा'चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर' या अॅपवर सोमवार दि. २० आणि मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार तेजस वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराच्या स्थापनेमागचा उद्देश, रचना आणि कार्यपद्धती, आतापर्यंत महारेरा अंतर्गत नोंदणी झालेले प्रकल्प, महारेरात नोंदणी करण्याची पद्धत, ग्राहकांच्या हिताचे घेतलेले निर्णय आदी विषयांची माहिती डॉ. प्रभू यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.


0000



 कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

            मुंबई, दि 17 : कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

            या शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिध्द होतील, त्या जाहिरातींसाठी "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

            कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील "एक वेळची विशेष बाब" म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

            कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने "एक वेळची विशेष बाब" म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.

००००

 बेरोजगार उमेदवारांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

            मुंबई, दि. 17 : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत आज दि. 17 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी दिली .

            या महारोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकीत उद्योजक /आस्थापनांमध्ये रिक्त असलेली विविध प्रकारची सर्वसाधारणपणे 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच बी.ई. व इतर व्यवसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्त पदांसह राज्यभरातुन 25 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी उद्योजक/आस्थापनांमार्फत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करण्यात येत आहेत. होमपेजवरील नोकरी साधक लॉगीन मधून आपआपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे . त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन उपलब्ध असलेल्या रिकतपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवुन या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

            या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 022 22626303 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.  ‍

0000



 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून

18 जानेवारीला मतदान

            मुंबई, दि. 17 (रानिआ) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

            श्री. मदान यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

            सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.

--0-0-0-



 


Friday, 17 December 2021

 इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे

- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

            मुंबई, दि. 16 : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

            या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

            इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

            परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

०००००

 मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना

महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता -https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. हे महाडिबीटी पोर्टल 14 डिंसेबर 2021 पासून सुरू झालेले आहे.

         अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता नवीन तसेच नूतनीकरणाकरीता (Fresh/Renewal) दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता पुन्हा अर्ज करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.

         मुंबई उपनगर जिल्हा अधिनस्त कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय लॉगीनला प्राप्त झालेले विद्यार्थ्यांच्या अर्जांची योग्य ती छाननी करुन पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरी करीता तत्काळ पाठवावेत. अशी माहिती मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

000

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

            मुंबई, दि. 17 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत तीन शासकीय वसतिगृह, वरळी येथे कार्यरत आहेत. या वसतीगृहातील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन मुंबई शहरचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

              मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-118, वरळी, मुंबई-18 या वसतीगृहाकरिता एकूण 95 जागा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18 या वसतीगृहाकरिता 33 जागा, संत मिराबाई मुलींची शासकीय वसतीगृह, वरळी, बी.डी.डी.चाळ-116, वरळी, मुंबई-18 करिता एकूण ८१ जागा आहेत.

          ज्या प्रवर्गासाठी जागा रिक्त आहेत अशाच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वसतीगृहातून विनामुल्य प्रवेश अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपूर्ण अर्ज भरुन वसतिगृहात जमा करणे आवश्यक आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज 03 ही वसतिगृहांमध्ये तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर कार्यालय, चेंबूर, मुंबई येथे विनामुल्य उपलब्ध आहेत.

         शासकीय वसतीगृहाचे सन 2021-22 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या व बी.ए. / बी. कॉम./बी.एससी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका/पदवी आणि एमए/एम.कॉम/एम.एस.सी.असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रमाकरिता (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021 इतका आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. 13 जानेवारी 2022 रोजी दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास 20 जानेवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.

            व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 असा आहे. 06 जानेवारी 2022 रोजी पहिली निवड यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्यात येईल, पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022 पर्यंत आहेत. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 20 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 25 जानेवारी 2022 रोजी प्रवेश देण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज जागा रिक्त राहील्यास 01 फेब्रुवारी 2022 रोजी स्पॉट ॲडमिशन देण्यात येईल.

         पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्यास दिलेल्या मुदतीपर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तत्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल.अधिक माहितीसाठी गृहपाल संजय कदम (भ्रमणध्वनी क्र.8830316553) व श्री.जामनेकर (भ्रमणध्वनी क्र.8652717887) यांना संपर्क साधावा.

            सामाजिक न्याय विभागाच्या या कल्याणकारी योजनेचा लाभ वंचित घटकांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

-------–

मुंबई उपनगरातील शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 17 : मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त समाज कल्याण अंतर्गत चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा असून विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण, सहायक आयुक्त यांनी केले आहे.

            मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या वसतीगृहामध्ये केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात १०० विद्यार्थी मंजूर क्षमता असून 45 रिक्त जागा आहेत.

         राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) मध्ये केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाकरिता मंजूर विद्यार्थी क्षमता १०० असून ७० रिक्त जागा आहेत.

          महात्मा जोतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी या वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाकरिता १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ९२ रिक्त जागा आहेत.

           संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृहातल्या असून १५० विद्यार्थी संख्या मंजूर असून ११० रिक्त जागा आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी दिली आहे.

Featured post

Lakshvedhi