Wednesday, 13 October 2021

 रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार

- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

 

मुंबईदि12 : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातीलअसे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री. टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.

 यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परबउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतरत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधवखासदार विनायक राऊतआमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणालेकोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.

रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रुग्णवाहिकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवतींचा संस्थात्मक प्रसूती होईलयाकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावेअशा सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने मिशन कवच कुंडले अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त जास्त लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावीअशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या.

लोकार्पण कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटीलजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. इंदूराणी जाखडउपाध्यक्ष उदय बनेशिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत मंणचेकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले उपस्थित होते.

0000

 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार

मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता

■ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

 

मुंबई, दि. 12 : राज्यातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहण्यास  येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुध्दा घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडदयांवर दाखवले जातात, अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.

सिनेमागृहांमध्ये काम करणारे कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुध्दा लसीकरण करणे आवययक आहे. शॉपिगमॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरिवण्यात आले असले तरी मॉलमधील  मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या  प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

सिनेमागृहे 50 टक्के आसनक्षमतेने सुरु करण्यात येणार

सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रेक्षकांची 50 टक्के आसनक्षमता असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. तसेच 50 टक्के आसनक्षमता असताना सिनेमागृहांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तिकिट काढताना आणि तिकीट खिडकीवर तिकीट काढताना ज्या खुर्च्यावर बसू नये असे मार्किंग करण्यात आले आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. सिनेमागृहांतील पार्किंगच्या ठिकाणी सुध्दा आणि सिनेमागृहांतील लिफ्टमध्ये सुध्दा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समधील सिनेमांच्या वेळा वेगवेगळया ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे. तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी डिजिटल पध्दतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात.मल्टीप्लेक्समध्ये सुध्दा फ्लोअर मॅनेजमेंट करुन गर्दी टाळण्यात यावी.

चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण जागेचे सॅनिटाईझेशन करण्यात यावे. सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाणी, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी. सॅनिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देणे, बुटस, ग्लोज्व्ह, मास्क देण्यात यावे. कोविड संसर्गाचा एक व्यक्ती आढळल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण तात्काळ करण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असून या कर्मचाऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण होऊन 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी नियमित करावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

याशिवाय सिनेमागृहांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काय करावे आणि काय करु नये याची माहिती थोडक्यात नमूद करणारे बोर्ड लावणे आवश्यक आहे. हे बोर्ड स्वच्छतागृहे, तिकीट खिडकीजवळ, सिनेमागृहांमध्ये आत येताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ लावणे आवश्यक आहे. तसेच सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना नियमांची माहिती करुन देण्यासाठी माहिती देणारा ऑडिओ संदेश देण्यात यावा. याशिवाय ठिकठिकाणी पोस्टर्स, स्टॅण्डीज यांची उभारणी करण्यात यावी. याशिवाय सिनेमा सुरु होण्यापूर्वी जनहितार्थ कोविड नियमांची माहिती तसेच इतर आवययक माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप मधून देण्यात यावी.

सिनेमागृहांमधील एअर कंडिशन, व्हेंटिलेशन हे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार असणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन 24 ते 30 सेल्सिअस टेपरेंचर इतका असावा.  ह्युमिडीटीची रेंज 40 ते 70 टक्के असावी. सिनेमागृहांमध्ये हवा येईल तसेच क्रॉस व्हेंटिलेशन होईल हे पाहण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये एक्झॉस्ट फॅन्सची सोय असावी.

 कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन

देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

 

मुंबईदि. 12 :  कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावाअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर   सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमीनी बाबत तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व प्रकल्पग्रस्तांची पात्रता, देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

00000

 'उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा' या

गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. 12 :  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पुण्याचे रविंद्र भुजबळ, कोल्हापूरचे अक्षत पाटील तर पुण्याचे रोहिदास तुपसौंदर यांना तर 11 उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचाया विषयावर 10 सप्टेंबर 2021  ते 19 सप्टेंबर 2021  या कालावधीत 'घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर आणि मुक्त पत्रकार प्रथमेश राणे आणि स्वीप कार्यक्रमाचे सल्लागार दिलीप शिंदे यांनी पाहिले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण 360 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुणे येथील रवींद्र भूजबळ यांना प्रथम पारितोषिककोल्हापूर येथील अक्षत पाटील यांना द्वितीय पारितोषिकतर पुणे येथील रोहिदास तुपसौंदर यांना तृतीय पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. प्रवीण पाटील (जळगाव)आर्यन जोशी (भुसावळ)नेमाबाई शिंदे (पंढरपूर)संतोष माहिते (सांगली)रमेश धुमाळ (रायगड)वसंतराव देशमुख (बुलडाणा)नवनाथ इथापे (मुंबई)संतोष जोशी (जालना)सुनील तवर (धुळे)जयश्री साठे (लातुर)हनमंत भोसले (मुंबई), या 11 स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत.

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये, तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त अकरा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

मताधिकार हा 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदविणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभिनव कल्पना राबविणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे या सर्व बाबींचा या स्पर्धेत विचार करण्यात आला होता.

 आदिवासीबहुल भागाच्या जलद विकासासाठी

वीज, जलसंधारणाची कामे त्वरीत पूर्ण करावी

कृषी मंत्री दादाजी भुसे

 

            मुंबई, दि. 12 : डहाणू आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पाबाबत वन हद्दीतून जाणा-या अतिउच्च वीज दाब वाहिनीस परवानगी मिळण्यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करण्यात यावी. वसई, विरार मधील चार आणि डहाणूमधील एका गावात वीज वितरणाच्या कामास मंजूरी देऊनआदिवासी भागात १०० टक्के विद्युत पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करावे. आदिवासीबहुल भागाचा विकास जलदगतीने करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

            मंत्रालयात पालघरडहाणूजव्हारवसई, विरार वीजपुरवठावीज उपकेंद्र उभारणेकिल्ल्यांची डागडुजी आदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामांची गती वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले. या बैठकीस पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळमहापारेषणचे मुख्य अभियंता पीयुष शर्मापालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिद्धाराम सालीमठमहावितरणचे अधीक्षक अभियंता किरण नागावकरवसई महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणालेपालघर जिल्ह्यातील डहाणू उपकेंद्र ते सुर्यानगर कवडास आणि जव्हार उपकेंद्र प्रकल्पासंदर्भात वन हद्दीतून जाणाऱ्या अतिउच्च वीज दाब वाहिनीच्या परवानगी संदर्भात वन विभागाने पुढील आठ दिवसात कार्यवाही करावीआणि हे उपकेंद्र उभारण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीने जलदगतीने कामे पूर्ण करावी.

            पालघर आणि जव्हार पर्यटनाच्या  माध्यमातून विकसित करावयाचे आहे. आदिवासीबहुल गाव आणि पाड्यात १०० टक्के वीज वितरण होणे गरजेचे आहे. ज्या गावात कामे सुरू आहेत त्या कामांची गती वाढवावी आणि डहाणूमधील एक गाव व वसई, विरार मधील ४ पाड्यांमध्ये वीज वितरणास संबंधित विभागाने मान्यता द्यावी, जेणेकरून आदिवासीबहुल क्षेत्रात १०० टक्के विज वितरणाचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. डहाणू आणि वसई, विरार क्षेत्रातील मंजुर आणि प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कामांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाहणी करून अहवाल सादर करावा, असेही श्री.भुसे यांनी निर्देश दिले.

            जव्हार क्षेत्रात सिमेंट नाला बांधकामास मान्यता द्यावी. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात यावीत. डहाणू येथील सिमेंट बंधारे कामाचा प्रस्ताव सादर करावा. बंधारे बांधताना शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा व्हायला हवा अशा पद्धतीने कामे करण्याचे निर्देश श्री.भुसे यांनी दिले. कोहज किल्ल्याची डागडुजी आणि सुशोभीकरणाचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.भुसे यांनी दिले.

०००

 भारनियमन केले जाणार नाहीवीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू

- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

·       ग्राहकांना वीज वापरात काटकसरीचे आवाहन

 

 मुंबईदि. 12 : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहेअशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट या विषयावर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

 राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट वीजेची कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.

  राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावायासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्याशी नियमित संपर्कात असून लवकरच या संकटावर मात करू, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.

 या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो कीसध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळी व संध्याकाळी 6 ते 10 या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी जनतेला केले.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13 हजार 186 मेगावॅट आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही महावितरण वीज खरेदी करीत असते.  कोळसा टंचाईमुळे चार आणि देखभाल दुरूस्तीमुळे तीन असे सात संच बंद असल्याने राज्याला तीन हजार मेगावॅट वीजेची तूट जाणवू लागली आहे. महानिर्मितीने कोळसा आणि वीज उत्पादन व्यवस्थापनात उत्तम समन्वय आणि संतुलन साधारणपणे पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबरपर्यंत विजेच्या मागणीत घट होत असते. परंतुऑगस्ट महिन्यात दुर्देवाने पावसाने ताण दिला व त्यामुळे वीजेची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी 18 लाख मेट्रिक टन कोळसा साठा वापरावा लागला. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे. मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती. ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोल इंडियाने आपल्या वहन क्षमतेनुसार पुरवठा करावायासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.

 या व्यतिरिक्त जो कोळसा कोल इंडियाकडून मिळतो तोही अपेक्षित दर्जाचा नाही. त्यामुळे वीजेचे उत्पादन व गुणवत्ताही अपेक्षित प्रमाणानुसार होत नाही. याशिवाय गॅसवर वीज निर्मिती प्रकल्पांसाठी करारानुसार गॅस मिळत नसून फक्त 30 टक्केच गॅस पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. या संकटात भर म्हणून ज्यांच्याशी दीर्घकालीन करार केलेल आहेत अशा सीजीपीएल आणि जेएसडल्बू या कंपन्यांनी स्वस्त वीज पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे एक हजार मेगावॅट वीजेचा पुरवठा त्यांच्याकडून केला जात नाही. या कंपन्यांनी वीज निर्मितीच बंद ठेवली आहेअशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.

 कोळसा पुरवठा वाढावा म्हणून 5 ऑगस्ट रोजीच कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवले आणि राज्याला ठरल्याप्रमाणे कोळसा पुरविण्याची विनंती केली.  24 सप्टेंबर रोजी केंद्रीय कोळसा मंत्री व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण झाले.  21 सप्टेंबर रोजी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महानिर्मितीचे सीएमडी व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची  बैठक घेतली. यावेळी सचिवांना दिल्लीत जाऊन कोळसा व ऊर्जा विभागाच्या सचिवांशी यासंदर्भात संवाद साधण्यास सांगितले. संचालकांना कोल इंडिया लिमिटेडच्या प्रमुखांना भेटून बोलायला सांगितले. तसेच जेथून कोळसा पुरवठा केला जातो त्या कोळसा खाणीत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना पाठवून कोळसा उपलब्धतेचा आढावा घेण्यास सांगितले. त्याचबरोबर आमचे संबंधित अधिकारी केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटून आले व त्यांनी पाठपुरावा सुरू केला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी (पिक डिमांड) काळात महानिर्मितीने औष्णिकवायू आणि जल विद्युत केंद्रांतून 8 हजार 119 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करून कोळश्याच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. महावितरणने सुद्धा त्यांची  मुंबई वगळता एकूण विजेची मागणी 18 हजार 123 मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी 20 हजार 870 मेगावॅट सायंकाळी 7 च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

000

 

 आपले आरोग्य आपल्या हातीस्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·       जागतिक हात धुवा दिन  १५ ऑक्टोबर,२०२१  उपक्रमांचा  शुभारंभ

 

        मुंबई,दि. 12 : स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी  हातांची स्वच्छता महत्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. स्वच्छ हात धुवून आपले  आरोग्य सांभाळले पाहिजे असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

  दि. 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडेपाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे,जिल्हा स्तरावरून सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी,गटविकास अधिकारी,ग्रामसेवक,सरपंच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले,  दरवर्षी या दिवसाची संकल्पना ठरवली जाते.  या वर्षी ‘आपले भविष्य आपल्या हातात’ अशी संकल्पना आहे. त्यासाठी सर्वजण मिळून पुढे जाऊ या'  ही संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

आपल्या हातावर असणाऱ्या असंख्य रोगजंतू आपल्या आरोग्यासाठी बाधक ठरू शकतात.  या रोगजंतूना साबणाने हात देऊन दूर केले तर सर्वांचाच भविष्यकाळ आरोग्यसंपन्न राहील. या अनुषंगाने जागतिक हात धुवा दिन निमित्ताने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात यावी.

 साबणाने हात धुण्याच्या सवयीमुळे श्वसन रोगाचा मृत्यु दर 25 टक्के कमी होऊ शकतो आणि अतिसार रोगामुळे होणारे मृत्यू सुद्धा  50 टक्के कमी होऊ शकतात. हात धुण्याच्या सवयी समाजात रुजविण्यातकरिता व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवावे.

कोरोना महामारीमुळे जवळपास 2 वर्ष  बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होत आहेत. शाळा स्तरावर देखील शालेय विद्यार्थ्यांमध्येही साबणाने हात धुण्याची सवय व्हावी याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

या जागतिक हात धुवा दिनानिमित्त पाच दिवस राज्यभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य संवर्धनाच्या कामात पुढाकार घ्यावा.

हात स्वच्छता संदर्भात तयार केलेल्या चित्रफितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi