मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा 3 नोव्हेंबरपासून
मुंबई, दि. 16 :- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली असून 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. 2025-26 मध्ये हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमांसह राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
अभियानाची व्याप्ती
या अभियानासाठी शाळांची विभागणी (अ) शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि (ब) उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर राबविण्यात येईल.
अभियानाची उद्दिष्टे
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
अभियानाचा कालावधी
या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी असेल. 3 नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. तर, 31 डिसेंबर 2025 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. 1 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.
अभियानाचे स्वरूप
अभियानात सहभागी होऊन स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा- 38 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी- 101 गुण आणि शैक्षणिक संपादणूकसाठी- 61 गुण असे एकूण 200 गुण असतील.
No comments:
Post a Comment