सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्याच्या कारभाराची
विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १७ : नंदुरबार येथे सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन रस्त्यावर तहसीलदार यांच्या बंद असलेल्या निवासस्थानी अनधिकृत समकक्ष कार्यालय सुरू केले. ह्या मंडळ अधिकारी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या सहीचे व विना सहीचे दस्तऐवज तयार केले. अशा संपूर्ण प्रकरणांची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
नंदुरबार येथील प्रकरणात सदस्य डॉ. विजयकुमार गावित यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य हरीश पिंपळे यांनी सहभाग घेतला.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ४५ प्रकरणे विवादास्पद आहेत. तसेच ३८ प्रकरणे सह्या नसलेल्या आहेत. या प्रकरणी सदर मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे. उशिरा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधित तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी संबंधित सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेची चौकशी करण्यात येईल.
विभागीय आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या चौकशीचा एक महिन्याच्या आत अहवाल घेण्यात येईल. अहवालानंतर दोषी आढळल्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment