मुंबई 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'चे जागतिक केंद्र होणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व
– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
मुंबई, दि. 18 : मुंबई ही देशाची 'एंटरटेनमेंट कॅपिटल' आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'क्रिएटिव्ह इकॉनॉमी'साठी जागतिक पातळीवर पुढाकार घेण्याची घोषणा केली होती. ती घोषणा आज यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान वेव्हज् परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या वेव्हज परिषदेच्या निष्कर्ष अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) आणि एनएफडीसी कॅम्पसचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण, माहिती तंत्रज्ञान तसेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच प्रसून जोशी, साकेत मिश्रा, शेखर कपूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या वेव्हज् (WAVES) या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचे कौतुक करत, मुंबई केवळ या कार्यक्रमाचे यजमान शहर नव्हते, तर ही एक चळवळ बनली असल्याचे सांगितले. क्रिएटिव्ह इकॉनॉमीशी संबंधित वेव्हज् इंडेक्सचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या इंडेक्सची किंमत काही महिन्यांपूर्वी 93,000 कोटी होती. आता ती 1 लाख कोटींवर पोहोचली आहे. यावरून या क्षेत्राची झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात येते. क्रिएटर्स इकॉनॉमीच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ₹150 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वेव्हज् परिषद आता दरवर्षी किंवा दोन वर्षांनी मुंबईतच होईल. पुढील कार्यक्रम हा याहून भव्य असेल, याची हमी देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयआयसीटी (IICT - Indian Institute of Creative Technologies) या संस्थेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आयआयसीटी केवळ प्रशिक्षण संस्था नसून एक 'आयकॉनिक डेस्टिनेशन' ठरेल. लोक इथे शिकण्यासाठीच नव्हे, तर पाहण्यासाठीही येतील. ही संस्था पुढील पिढ्यांसाठी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनेल. तसेच, त्यांनी ‘वेव्हज्’ कार्यक्रमादरम्यान तयार करण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ही आपल्या सृजनात्मकतेच्या इतिहासाची एक सुंदर झलक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार हे पॅव्हेलियन आता गुलशन बिल्डिंगमध्ये कायमस्वरूपी स्थापन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पर्यटनस्थळांत एक नवे आकर्षण स्थळ जोडले गेले आहे.
No comments:
Post a Comment