मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व
– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी (IICT) च्या पहिल्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ही केवळ सुरुवात असून, क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी आयआयटी-आयआयएम प्रमाणे एक संपूर्ण शैक्षणिक साखळी उभी करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी कल्पना आहे.
देशातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम आहे. क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये आणि जागतिक दर्जाची साधने देण्याचा हेतू या संस्थेमागे आहे. ‘आयआयसीटी’च्या स्थापनेसाठी आतापर्यंत 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मुंबई फिल्म सिटीमध्ये पुढील मोठा कॅम्पस उभारला जाणार आहे. त्याची रचना पर्यावरण व भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच ‘आयआयसीटी’ची इमारत तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. वैष्णव म्हणाले की, या ‘आयआयसीटी’मध्ये गुगल, मेटा, एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, ॲडोबी, यांसारख्या जागतिक कंपन्यांसोबत औपचारिक भागीदारी झाली असून, न्यू यॉर्क विद्यापीठासोबतही करार झाल्याचे त्यांनी सांगितले. हे अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आखण्यात आले आहेत. यात व्हीएफएक्स, गेमिंग, एक्सआर, पोस्ट-प्रॉडक्शन, अॅनिमेशनसारख्या क्षेत्रांमध्ये प्रगत प्रशिक्षण देण्यात येईल. प्रथम वर्षी 300 विद्यार्थी व प्रशिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण देणे हे लक्ष्य ठेवण्यात आले असून, 3 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतचे विविध कालावधीचे अभ्यासक्रम असतील, असे त्यांनी सांगितले.
मुंबई ही देशाची क्रिएटिव्ह कॅपिटल आहे, आणि अशा शहरात भारतातील पहिले आयआयसीटी कॅम्पस उभारले जात आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष आभार मानले. फिल्म सिटीमध्येही जमीन तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
यावेळी प्रसार भारती आणि महाराष्ट्र फिल्म ॲण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यामध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात नाविन्यता, कौशल्यस्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्याबरोबर, ‘आयआयसीटी’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी मुंबईत झालेल्या वेव्हज् परिषदेच्या निष्कर्षाची माहिती दिली.
No comments:
Post a Comment