पिण्याच्या पाण्यातील नमुन्यांमध्ये
हानिकारक घटक आढळलेल्या ठिकाणी 'शुद्धीकरण प्रकल्प'
- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. ५ : राज्य शासन पाण्याच्या स्त्रोतापासून पाण्यातील रासायनिक घटकांच्या तपासणीसाठी पाणी नमुन्यांची तपासणी करते. या नमुन्यांमध्ये शरीरास हानिकारक घटक आढळलेल्या पाणी नमुन्यांच्या ठिकाणी विविध उपायोजना करीत असते. राज्यात नांदेड जिल्ह्यात नायट्रेट बाधित पाणी नमुने आढळलेल्या ६८२ गावांमध्ये शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. बाधित पाणी नमुने आढळलेल्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्प (आर.ओ प्लॅन्ट) उभारण्याची कार्यवाही शासन करेल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
भुजलामध्ये वाढत असलेल्या नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, केंद्र शासन रँडम पद्धतीने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करीत असते. तर राज्य शासन पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतातील पाणी नमुने तपासते. राज्य शासनाच्या नमुन्यांमध्ये ११.६२ टक्के नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण आढळले आहे. नायट्रेटचे प्रमाण रोखण्यासाठी युरियाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीवर भर द्यावा लागेल. तसेच उद्योगांमधून येणाऱ्या दूषित पाण्याबाबत एचटीपी प्लांट बसविण्याच्या सूचना देण्यात येतील. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण रोखण्याबाबत उद्योग, पर्यावरण व कृषी विभाग यांची संयुक्त बैठकही घेण्यात येईल. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन विविध उपयोजनांची अंमलबजावणी करत आहे.
या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, डॉ नितीन राऊत, प्रशांत बंब, समीर कुणावर, आदित्य ठाकरे, डॉ संजय कुटे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment