अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात
लवकरच ‘एमआरआय’ मशीन
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. ५ : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन खरेदीसाठी २४.९७ कोटी रुपयांना नवीन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेतून लवकरच हे मशीन उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ‘एम आर आय ३ टेस्ला’ मशीन खरेदीबाबत विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘एमआरआय’ मशीन खरेदीसाठी औषध महामंडळमार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मशीन खरेदीस विलंब झाला. हाफकिन महामंडळामार्फत खरेदीची व्यवस्था बंद करण्यात आली असून औषधी व वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. ‘एमआरआय ३ टेस्ला’ मशीन अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यामुळे अचूक निदान होऊन योग्य उपचार मिळण्यास रुग्णाला मदत होते. राज्यात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) पद्धतीचा अवलंब करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआय मशीन खरेदी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ९०० जागा राज्याला दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे. परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकामासंदर्भात निविदा प्रकिया राबविण्यात येत असून लवकर काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य हरिष पिंपळे, विजय वडेट्टीवार, डॉ. राहुल पाटील, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.
0000
No comments:
Post a Comment