वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 4 कोटींचे साहित्य वाटप
नागपूर दि. 24 : ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून ‘वयोश्री’ योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग यांच्यामार्फत आज नागपूर येथे दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघाकरिता ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ व ‘दिव्यांग सहायता योजना’ अंतर्गत साहित्य वाटप शिबीर घेण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वयोश्री योजनेतील प्रातिनिधीक साहित्य वाटप केले. कार्यक्रमासाठी दीक्षाभूमी परिसरातील काच्छीपुरा येथील पीकेव्ही मैदानावर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण मंडळ (एलिम्को) कानपूर, नागपूर महानगरपालिका नागपूर, सीआरसी नागपूर यांच्यामार्फत कृत्रिम अवयव, चष्मा, व्हीलचेअर, श्
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दातृत्वाच्या भूमिकेतून वयोश्री सारखी अत्यंत महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी तयार केली आहे. वरिष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उत्तरार्धात सहजपणे जीवन जगता यावे, यासाठी या साहित्याची गरज असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय कल्पकतेने नागपूर शहरासाठी या योजनेची वितरण यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे दक्षिण - पश्चिम, पश्चिम नागपूर मतदार संघातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही. ज्यांना आता साहित्य मिळाले नसेल त्यांना पुढच्या वेळी नक्की साहित्य मिळेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेसाठी अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य वितरित करण्यात येत असून त्याचा दर्जा दीर्घकाळ टिकेल.
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरीय सेवा असून रंजल्या - गांजल्यांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपुरात जेष्ठ नागरिकांसाठी सुंदर बाग - बगीचे, विरंगुळा केंद्र यासोबतच जागतिक दर्जाचे दिव्यांग पार्क उभारण्यात येईल. अनुसूचित जाती व आदिवासी समुदायात मोठ्या प्रमाणात सिकलसेल रुग्ण आढळतात. अशा रुग्णांना 'बोन मॅरो ' ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अर्ध्या किमतीत उपचार उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या शिबीरात नागपूर शहर व जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना - 2021 आणि दिव्यांग सहायता योजनेतून दक्षिण - पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील 3 हजार 950 लाभार्थ्यांना 4 कोटी रुपयांच्या सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये दिव्यांग सहायता योजनेचे 372 आणि वयोश्रीचे 3 हजार 578 लाभार्थी आहे. त्यांना 30 हजार 520 उपकरणे नि:शुल्क दिली गेली.
0000
No comments:
Post a Comment