Saturday, 24 September 2022

समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस

 समृद्धीप्रमाणे 'नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग ' होणार : देवेंद्र फडणवीस

'नरेडको'च्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची माहिती

 

        नागपूर दि.२४ : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग प्रमाणे नागपूर गोवा एक्सप्रेस मार्ग बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

            नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेमार्फत नागपूर येथील ली -मेरिडियन हॉटेल येथे बांधकाम व्यावसायिक आणि विकासक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा विविध गटातील उपलब्धीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुरस्कार सोहळा पार पडला.

            या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमदार सर्वश्री परिणय फुके, मोहन मते,  विजय दर्डा, उपमुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, नरेडकोचे अध्यक्ष राजन बांदेळकर, उपाध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी, विजय दर्डा, महारेराचे संस्थापकीय प्रमुख गौतम चॅटर्जी, विदर्भ नरेडकोचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रीजमोहन तिवारी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते.

            नागपूर हे शहर 'लॉजिस्टिक हब ' म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात 'लॉजिस्टिक सपोर्ट ' तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये ५ हजार किलोमीटरचे 'एक्सप्रेस 'महामार्ग तयार करण्याचे सुतोवाच केले आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर ', म्हणून विकसित होणार आहे. यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर 'तयार होत आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर- दिल्ली आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर,नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येणार आहेत. त्यामुळे हरितपट्ट्यांचा बचाव करत नवीन शहरे वसवली पाहिजे. याकडे बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी लक्ष वेधावे, असे आवाहन त्यांनी केले.

             महारेरा सारख्या कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिक व विकासक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. विश्वासार्हता वाढली. रेरामुळे बांधकाम विकासक क्षेत्रात महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत अग्रेसर राज्य झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेल्या भरारीचे कौतुक केले आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे झपाट्याने विकसित होत आहेत. बांधकाम व्यावसायिक व विकासकांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे  त्यांनी सांगितले.

            बांधकाम व्यावसायिकांनी सामान्य नागरिकांना परवडणारी घरे आणि हरित पट्टे सांभाळात तयार होणारी विस्तारित शहरे बनविण्याकडे लक्ष द्यावे,असे आवाहन फडणवीस यांनी केले. या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मान्यवरांना विविध गटात यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.

00000

                                     

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi