सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी
सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई, दि. २० : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला.
या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, सीआयएफएफ कडून डॉ. हेमांग शाह व डॉ. अस्मिता जैन, तसेच आय पी आय कडून राघवेश राजन आणि अविधा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या भागीदारीअंतर्गत सामाजिक व वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण, पुराव्यावर आधारित व संशोधनाधारित पद्धतीने राबविले जाणार असून, समुदाय सहभाग व प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्याचा उद्देश आरोग्यविषयक वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर पोहोचविणे व त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे.
हा उपक्रम माता व बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत महत्त्वाचे आरोग्य संदेश व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.