पोषणमूल्य असलेली भरडधान्य आहारात असणे गरजेची
भरडधान्ये ही पिके केवळ स्थानिक ठिकाणच्या हवामानाला अनुकूल अशी असून ही शाश्वत पिके आहेत. आपल्या आहारात आढळणाऱ्या अनेक पोषणतत्त्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भरडधान्य मोलाची भूमिका बजावतात. एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त् असलेली भरडधान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी आहेत असे एमएसएसआरएफच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. कुपोषण आणि लठ्ठपणाशी लढताना, भरडधान्ये आणि इतर पिकांमधून मिळणारी आहारातील विविधता प्रभावीपणे वापरली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एमएसएसआरएफचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरडधान्ये पिकांशी संबंधित प्रमुख आव्हाने व संधी अधोरेखित करत, हवामानातील असुरक्षितता, पोषण असुरक्षा आणि उपजीविका सक्षमता यावर मात करण्यातील त्यांची क्षमता स्पष्ट केली. हैदराबाद येथील भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. तारा सत्यवती आणि बाजरी संशोधक डॉ. पी. संजना रेड्डी यांनी भरडधान्य संशोधनातील प्रगती, सुधारित वाण यांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय अर्ध-कोरडवाहू उष्णकटिबंधीय पिके संशोधन संस्था हैदराबाद येथील जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंथन मणी यांनी दीर्घकालीन सक्षमतासाठी जैवविविधता संवर्धन, स्थानिक वाण आणि जनुकीय संसाधनांचे महत्त्व अधोरेखित केले. ओडिशा मिलेट मिशनचे माजी अधिकारी दिनेश बालम यांनी ओडिशातील भरडधान्य चळवळीतील संस्थात्मक नवकल्पना आणि समुदाय-आधारित उपक्रमांमधील अनुभव सांगितले.
या चर्चासत्रात महिला शेतकऱ्यांनी भरडधान्य शेती, बाजारपेठा आणि संसाधनांपर्यंत पोहोच यासंबंधीचा वास्तव अनुभव कथन केला. संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाचा दृष्टीकोन महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत नॅशनल अॅग्रिकल्चरल रिसर्च प्रोजेक्ट कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड यांनी मांडला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत परभणीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. जी. पवार,तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एस. इंगोले यांनी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाण, संशोधन,विस्तार व शेतकरी यांच्यातील महत्वाचे घटक व प्रत्यक्ष अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले.